चला गावाकडे
“अगं जानू, तुला मी सांगितलं होतं की आपण गावामध्ये आपल्या शेतीमध्ये राहून कष्ट करू, मिळेल त्यात समाधान मानू आणि आनंदाने जीवन जगू. पण तू माझं ऐकलं नाहीस.”
जानकी म्हणाली,
“तू मला लग्नाआधी काय सांगितलं होतंस? की तू मला शहरात ठेवशील. मी लहानपणापासून शहरात राहणारी आहे. त्यामुळे मी आता तुझ्यासोबत गावी राहणार नाही. तू जर गावाला जायचं म्हणत असशील, तर मी तुझ्यासोबत राहणार नाही.”
जानकीचे हे शब्द ऐकून प्रभाकर हवालदिल झाला. शेवटी तो आई-वडिलांना म्हणाला,
“आई-बाबा, तुम्ही शेती सांभाळा. मी शहरात जाऊन एखादी छोटी-मोठी नोकरी करतो.”
तो शहरात गेला. जानकीला शहरात राहण्याची सवय असल्यामुळे तीही त्याच्यासोबत राहायला गेली. पण शहरात नोकरी मिळत नव्हती. कसातरी त्याने एक छोटी खोली घेतली. वडिलांनी दिलेले पंधरा-वीस हजार रुपये आणि आणलेलं धान्य यावर त्यांनी काही दिवस काढले.
शेवटी त्याला वॉचमनची नोकरी मिळाली—पगार १५ ते १६ हजार. खोलीचं भाडं ३-४ हजार. तो कामावर जाऊ लागला.
इकडे जानकी घरी राहायची, पण हळूहळू ती मार्केटमध्ये फिरायला जाऊ लागली. तिला बाहेर फिरण्याची, हॉटेलमध्ये खाण्याची सवय होती. ओळखी वाढू लागल्या.
तो घरी येईपर्यंत ती बाहेर असायची.
एक दिवस तो म्हणाला,
“मी घरी नसताना तू एकटी का फिरतेस?”
ती म्हणाली,
“मला पिक्चर बघायला, फिरायला आवडतं. मला कोणी थांबवू शकत नाही. मला माझं स्वातंत्र्य आहे.”
हळूहळू तिची ओळख एका रुबाबदार मुलाशी झाली आणि ती त्याच्या मोहात पडली.
यामुळे नवऱ्याला खूप त्रास होऊ लागला. तो म्हणाला,
“या नोकरीत काही दम नाही. तुझ्या खर्चासाठी मी एवढं कमवू शकत नाही. शहरात महागाई वाढली आहे—इंधन, शिक्षण, आरोग्य सगळं महाग आहे. भाडं जास्त आहे, नोकऱ्या कमी आहेत. आपण गावी जाऊया.”
पण जानकी चिडली.
“तुला जायचं असेल तर जा, मी इथेच राहते.”
या काळात ती गरोदर राहिली, पण तिने गोळ्या घेऊन गर्भपात केला. हे कळल्यावर नवरा खूप दुःखी झाला.
तो म्हणाला,
“हीच का तुझी राहणी? मला इथे काही सुख नाही. त्यापेक्षा मी गावी जाऊन आई-वडिलांची सेवा करतो, शेती करतो.”
तो नोकरी सोडून गावी निघून गेला.
इकडे जानकी शहरात एकटी राहू लागली. हळूहळू तिचं आयुष्य बिघडू लागलं. काही काळानंतर तिला आपल्या चुका समजल्या. तिला पश्चात्ताप झाला.
ती आई-वडिलांकडे गेली, पण त्यांनीही तिला सांगितलं,
“तुला जिथे दिलंय तिथेच जा. आमच्याकडे काहीच नाही.”
शेवटी ती नवऱ्याकडे गावी आली.
“माझ्याकडून चुका झाल्या. मला माफ करा. मला पुन्हा स्वीकारा,” ती म्हणाली.
नवऱ्याने शांतपणे सांगितलं,
“शहरात काही नाही—फक्त ताण आणि दुःख. गावात आपण कष्ट करू, शेती करू, आई-वडिलांची सेवा करू. इथेच खरं सुख आहे.”
जानकीला हे पटले.
दोघेही शेती करू लागले. गायी-म्हशी पाळल्या. उत्पन्न वाढलं. कुटुंब पुन्हा एकत्र आलं. त्यांना दोन मुलं झाली. घरात आनंद पसरला.
ताजी भाजी, शुद्ध अन्न, कुटुंबाचं प्रेम—हे सगळं मिळालं.
जानकी म्हणाली,
“हेच खरं सुख आहे. कुटुंब एकत्र असणं हाच खरा आनंद आहे. आता मी कधीच तुमची साथ सोडणार नाही.”
कालांतराने त्यांचा मुलगाही प्रगतशील शेतकरी झाला. घरात सर्व सुखसुविधा आल्या.
संदेश
शहरात नोकरी नसेल, उत्पन्न कमी असेल, तर गावाकडे वळणं चुकीचं नाही.
शेती, कष्ट, आणि कुटुंब यामध्येच खरं समाधान आहे.
अहंकार बाजूला ठेवून, एकमेकांना साथ देऊन राहिलं तर प्रत्येक कुटुंब सुखी होऊ शकतं.
सुदाम मदगे (किवळे, वडगाव मावळ,)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा