गुण्यागोंदाने नांदणाऱ्या गावाची आणि धोंडूच्या आयुष्याची शोकांतिका
एकेकाळी आमचं गाव गुण्यागोंदाने नांदत होतं. दवंडीकारांनी दवंडी पेटवली की सगळं गाव चावडीवर जमा व्हायचं. त्या वर्षी गावच्या पाटलांनी जाहीर केलं होतं की, “जो शेतकरी यावर्षी सर्वांत चांगली शेती करेल, त्याला बक्षीस दिलं जाईल.” धोंडूकडे फारशी जमीन नव्हती. थोडीशीच शेती, पण त्या जमिनीवर त्याने रक्ताचं पाणी करून कष्ट केले. निसर्गानेही त्याला साथ दिली आणि शेती बहरली. कार्यक्रमात पाटलांच्या हस्ते धोंडूला बक्षीस देण्यात आलं. तो दिवस त्याच्या आयुष्यातला अभिमानाचा क्षण होता. पण गावात जळावू वृतीच्या लोकांची कमी नसते. धोंडूला मिळालेलं बक्षीस काही लोकांना सहन झालं नाही. एका उच्च वर्णातील जमीनदार आणि एका सावकाराने कपटीपणाने त्याला फसवण्याचा डाव आखला. ते धोंडूच्या घरी गेले. मनात कपट ठेवून गोड बोलू लागले. “अरे धोंडू, पाणी नसतानाही तू शेती फुलवलीस. तुझ्याकडे जर विहीर असती, तर काय कमाल केली असतीस!” धोंडू नम्रपणे म्हणाला, “दादा, एक बैलजोडी, घरी म्हातारी आई, दारुडा भाऊ… या परिस्थितीत मी विहीर कशी खोदणार?” त्यावर एक जण लगेच बोलला, “अरे, पैसे सावकार देतील ना!” धोंडू आधी नकार देत होता. “सावकार...