गुण्यागोंदाने नांदणाऱ्या गावाची आणि धोंडूच्या आयुष्याची शोकांतिका



एकेकाळी आमचं गाव गुण्यागोंदाने नांदत होतं. दवंडीकारांनी दवंडी पेटवली की सगळं गाव चावडीवर जमा व्हायचं. त्या वर्षी गावच्या पाटलांनी जाहीर केलं होतं की, “जो शेतकरी यावर्षी सर्वांत चांगली शेती करेल, त्याला बक्षीस दिलं जाईल.”

धोंडूकडे फारशी जमीन नव्हती. थोडीशीच शेती, पण त्या जमिनीवर त्याने रक्ताचं पाणी करून कष्ट केले. 

निसर्गानेही त्याला साथ दिली आणि शेती बहरली. कार्यक्रमात पाटलांच्या हस्ते धोंडूला बक्षीस देण्यात आलं. तो दिवस त्याच्या आयुष्यातला अभिमानाचा क्षण होता.

पण गावात जळावू वृतीच्या लोकांची कमी नसते. धोंडूला मिळालेलं बक्षीस काही लोकांना सहन झालं नाही. 

एका उच्च वर्णातील जमीनदार आणि एका सावकाराने कपटीपणाने त्याला फसवण्याचा डाव आखला.

ते धोंडूच्या घरी गेले. मनात कपट ठेवून गोड बोलू लागले.
“अरे धोंडू, पाणी नसतानाही तू शेती फुलवलीस. तुझ्याकडे जर विहीर असती, तर काय कमाल केली असतीस!”

धोंडू नम्रपणे म्हणाला,
“दादा, एक बैलजोडी, घरी म्हातारी आई, दारुडा भाऊ… या परिस्थितीत मी विहीर कशी खोदणार?”

त्यावर एक जण लगेच बोलला,
“अरे, पैसे सावकार देतील ना!”

धोंडू आधी नकार देत होता. “सावकारांचे पैसे नको,” असं तो म्हणत होता. पण गरिबी, अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्नं यांचा भार वाढत गेला आणि अखेर त्याला कर्ज घ्यावंच लागलं.

विहीर खोदली. पाणी लागलं. शेती फुलली. पण अर्ध्या शेतात पीक आलं असतानाच त्या कपटी लोकांनी आपला डाव उघड केला. 

धोंडूच्या जमिनीवरून जाणाऱ्या पाण्याच्या झऱ्यावर त्यांनी दुसऱ्याच शेतकऱ्याला विहीर बांधायला लावली. परिणामी धोंडूच्या शेताला पाणी कमी पडू लागलं. पीक गेलं… आणि पाणीही गेलं.

यातच नियतीचा आणखी एक घाव बसला. योगायोग म्हणा किंवा दुर्दैव त्याच वर्षी निसर्ग कोपला. अतिवृष्टी झाली. धोंडूचं उभं पीक वाहून गेलं. तो पूर्णपणे हातबल झाला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शासनाची टीम गावात आली. पण गावातील टपोरी राजकारणी पुढे सरसावले. 

तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये पार्ट्या, दारू, नाच सगळं रंगलं. अखेर पाहणी न करता ठरावीक लोकांच्या शेतांचेच पंचनामे लिहिण्याचे आदेश दिले गेले. धोंडूच्या शेतीचा पंचनामा करण्यातच आला नाही.

धोंडूला थोडीफार आशा होती “शासनाकडून मदत मिळेल.”
पण त्याच्या नशिबी एकही रुपया आला नाही.

मुलगा बाहेर दहावी-बारावीला शिकत होता. घरी म्हातारी आई, दारुडा भाऊ, बायको… आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर. सावकार दरवाज्यावर उभा राहू लागला. पैसे कसे फेडायचे, या चिंतेने धोंडू पूर्णपणे खचून गेला.

याच दरम्यान, त्या कपटी लोकांनी दारुड्या भावाला चिथावून दिलं. घरात भांडणं सुरू झाली.
“मला वेगळं द्या,” असा हट्ट त्याने धरला. म्हातारी आई नाईलाजाने धोंडूला पडवीत ठेवू लागली. आई आणि लहान भाऊ घरात राहिले.

कालांतराने लहान भाऊ दारूच्या नशेत गावभर फिरू लागला.
“मी जमीनदार आहे, मी श्रीमंत आहे,” अशी बडबड तो करायचा. गावातील लहान मुलं त्याची टिंगल करू लागली. अखेर त्याची सगळी जमीन लुबाडणाऱ्या गँगकडे गेली. 

थोडाफार पैसा आला तेव्हा त्याचं लग्न केलं गेलं, पण त्याच्या वागण्यामुळे बायको त्याला सोडून गेली. शेवटी तो वेडा-पिसा होऊन गावात भटकू लागला.

धोंडूची अवस्था तर आणखीच बिकट झाली होती. सावकाराचं कर्ज कसं फेडायचं, हाच विचार त्याच्या डोक्यात सतत घोळत होता. अखेर या सगळ्याला कंटाळून धोंडू आणि त्याच्या बायकोने रातोरात आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.

या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपण प्रामाणिकपणे काम करतो, लोकांवर विश्वास ठेवतो. पण समोरच्या माणसाच्या मनात किती कपट दडलेलं असतं, तो आपल्यावर कधी आणि कसा घाव घालेल, याची आपल्याला कल्पनाही नसते. 

काही घटना अचानक घडतात, पण त्यांच्या मागे आधीच काहीतरी शिजलेलं असतं… दडलेलं असतं. कळतं, पण बोलता येत नाही.

आजचं उदाहरण घ्या. गोरगरिबांसाठी अहोरात्र काम करणारे, प्रशासकीय कामावर दरारा असलेले, स्पष्ट बोलणारे नेते काम होणार असेल तर होईल, नाही तर नाही असं ठाम सांगणारे. तरीही अपेक्षित नसताना घटना घडतात. कशा घडवल्या जातात? आणि अखेर ते निघून जातात. 

हे वास्तव आपण नाकारू शकतो का? कोणाची भूक किती भयानक असते आणि त्या भुकेपोटी माणसं कोणत्या स्तराला जातात, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.

एका वर्षी उत्कृष्ट शेतीचं बक्षीस मिळवणाऱ्या धोंडूची पुढील दोन वर्षांत विषारी लोकांनी काय अवस्था केली, हे या कथेतून स्पष्ट होतं.

इथे माझ्या “पाहणी” कथेचा पहिला भाग संपवतो. पुढील भागात अजून अनेक वास्तव, अनेक कटू अनुभव समोर येतील. समाजासाठी विचार करायला लावणारे, वाचकांना अंतर्मुख करणारे असे ते भाग असतील, अशी मला खात्री आहे.

धन्यवाद.

सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था