आम्ही कसं जगायचं साहेब?
आम्ही या जंगल-जलसंपत्तीचे मालक आहोत असे फक्त बोलण्यात सांगितले जाते. पण प्रत्यक्षात आमच्या स्वातंत्र्यवीरांनी आणि आमच्या लढाऊ महिला शेरण्यांनी दिलेला लढा फक्त कागदावरच राहिला आहे. भगवान बिरसा मुंडा यांना उगाच “भगवान” म्हणून संबोधले जात नाही. आमच्या राघोजी भांगरे यांचा इतिहास पाहा.जुन्नर किल्ल्यावर जो लढा झाला, तिथे आमचे श्रद्धास्थान आहे. सातशे लोकांनी लढा दिला होता, साहेब. असे कितीतरी स्वातंत्र्यवीर आणि महिला आहेत, ज्यांची नावे आपल्याला माहीतही नाहीत. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा कधी शासनाने योग्य सन्मान केला नाही. आदिवासी समाज कायम दुर्लक्षित राहिला. आमचं रक्त गरम होतं, कारण आम्ही या देशासाठी काय नाही केलं? जमीन वाचवली, पाणी दिलं, जंगल दिलं… पण आमची किंमत शून्य ठेवली गेली. फक्त आमचा वापर केला आणि नंतर आम्हाला बाजूला फेकून दिलं. आमचे काही पुढारीही त्यामध्ये गेले, हे थोडं स्पष्ट आहे; पण ते लपवता येणार नाही. लेखकाने वस्तुस्थिती सांगितली नाही तर तो खरा लेखक ठरत नाही. कितीतरी पिढ्या आम्ही जंगल, वनस्पती, जमीन आणि पाण्याची काळजी घेतली. बियाण्यांपासून औषधी वनस्पतींपर्यंत अनेक...