अति लाडाने वाया गेलेले पोर
म्हातारा म्हातारी पडवीत बसली होती. पडवी कसली हो ती? गोठाच होता. एका बाजूला गुरे बांधण्याची जागा. व दुसऱ्या बाजूला माणसे राहायची. दोन-तीन भांडी. काही गाडगी, मडकी पाण्याचा एक हंडा, एक दोन डबे व दारात धान्य साठवण्याची कनगुली. त्यावर घडी घालून ठेवलेल्या दोन-चार गोधड्या, शेजारी जुनी घोंगडी एवढाच काय तो संसार. म्हातारा चुलीला पाठ लावून बसला होता. पडवीच्या कोपऱ्यात कुत्र्याचं एक छोटा पिल्लू बसलं होतं. आजींने माझ्या हातात नाचणीची भाकरी व नारळाच्या कवटीत ठेवलेली लसणाच्या चटणीचं बोट भाकरीवरून ओढून मला ती भाकरी खायला दिली होती. मी ती भाकरी खात असता अचानक ते लहान कुत्र्याचे पिल्लू माझ्यापाशी आलं आणि माझ्या हातातील भाकरी ओढू लागले. मला त्या कुत्र्याच्या पिल्लाचा भयंकर राग आला. मी काठी घेऊन त्याला मारू लागलो. त्यावर ते क्याव क्याव करत त्याच्या जागेवर जाऊन बसले. तेवढ्यात आजीच बोलली. अरे बाळा! आपल्याला जसा जीव असतो तसाच त्या कुत्र्याच्या पिल्लालाही जीव असतो. नको मारू त्याला. म्हातारीने लगेच दुसरा भाकरीचा तुकडा मला दिला. दुसऱ्या बाजूला माझा मामा राहत...