दलालांच्या जाळ्यातला शेतकरी
उन्हातान्हात शेतात राबतो कष्टकरी शेतकरी, घामाच्या धारांनी भिजते त्याची सारी काया सारी; तुम्हा-आम्हाला अन्न देतो, स्वतः मात्र उपाशी राहतो, नशिबाच्या ओझ्याखाली तो रोजच जगत राहतो. खत-पाणी, मशागत करून पिकवतो तो शेती, आशेच्या पंखांवर बांधतो सुखाची एक स्वप्नरेषा नवी; पण हातात पीक येताच भाव अचानक कोसळतो, त्याच्या कष्टांचा सारा हिशोब क्षणातच विस्कळीत होतो. "यंदा पीक चांगलं आलं!"मनात तो हसतो थोडा, कर्ज फेडून मुलीच्या लग्नाचा बांधतो गोड गोड धागा; पण बाजारात जाताच वास्तव त्याला छळतं, भावाच्या घसरणीने स्वप्नांचं घर कोसळतं. शहरात येतो आशेने पिक विकण्यासाठी, पण दलालांच्या जाळ्यात अडकतो नकळतच भारी; कमी भाव देऊन त्याला गुदमरवलं जातं, त्याच्या कष्टांचं मोल मात्र मातीमोल होतं. कधी रस्त्यावरच पीक फेकून देतो हताश होऊन, आकाशाकडे पाहत रडतो मनातच तुटून; अखेरीस नाईलाज होतो, जगणंही ओझं वाटतं, आणि कुठेतरी फास घेऊन जीवन संपतं... म्हणतात शासनाने दिलं बरंच काही, पण त्याच्या हाती काहीच आलं नाही; सर्व दलालांनी वाटून घेतलं आपापलं, आणि खऱ्या हक्कदाराला वाऱ्यावर सोडलं. आज सर्वत्र उभे आहेत मोठे दलाल, भोंदू साध...