अनाडी सरपंच
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले. निवडणूक आयोगाच्या अभ्यास समितीने त्या-त्या परिसराची भौगोलिक स्थिती, जातींचा वर्ग, तेथील राहणीमान यांचा सखोल अभ्यास करून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य पदांसाठी जातीनिहाय जागा जाहीर केल्या. आमच्या गावामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याने, त्या ठिकाणी महिला गटासाठी ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सरपंच पद आरक्षित झाले. अनुसूचित जमातीतील, डोंगर-दऱ्यात राहणारी, शेतीवाडी करणारी, लाकूड-गवत गोळा करणारी, जंगलातील फळे आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी एक अतिशय कमी शिकलेली महिला — महिला आरक्षणामुळे पुढे आली. काही राजकीय कपट असणाऱ्या, इतर वर्गातील लोकांनी तिला सरपंच करण्याचा डाव आखला. गावातील काही लोकांनी याला होकार दिला, तर काहींनी नकार दिला. पण “कोणी तरी व्हायलाच हवे” या भूमिकेतून अखेर तिच्याशी चर्चा झाली. तिच्या घरी बोलणी झाली आणि निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने सखुबाईला सरपंच करण्याचे ठरवले. यानंतर काही हुशार व कपटी सदस्य तिच्या घरी ये-जा करू लागले. “तुम्ही आता सरपंच होणार आहात, त्यामुळे थोडेफार खर्...