अनाडी सरपंच



पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले. निवडणूक आयोगाच्या अभ्यास समितीने त्या-त्या परिसराची भौगोलिक स्थिती, जातींचा वर्ग, तेथील राहणीमान यांचा सखोल अभ्यास करून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य पदांसाठी जातीनिहाय जागा जाहीर केल्या.

आमच्या गावामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याने, त्या ठिकाणी महिला गटासाठी ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सरपंच पद आरक्षित झाले.

अनुसूचित जमातीतील, डोंगर-दऱ्यात राहणारी, शेतीवाडी करणारी, लाकूड-गवत गोळा करणारी, जंगलातील फळे आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी एक अतिशय कमी शिकलेली महिला — महिला आरक्षणामुळे पुढे आली. काही राजकीय कपट असणाऱ्या, इतर वर्गातील लोकांनी तिला सरपंच करण्याचा डाव आखला.

गावातील काही लोकांनी याला होकार दिला, तर काहींनी नकार दिला. पण “कोणी तरी व्हायलाच हवे” या भूमिकेतून अखेर तिच्याशी चर्चा झाली. तिच्या घरी बोलणी झाली आणि निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने सखुबाईला सरपंच करण्याचे ठरवले.

यानंतर काही हुशार व कपटी सदस्य तिच्या घरी ये-जा करू लागले.

“तुम्ही आता सरपंच होणार आहात, त्यामुळे थोडेफार खर्च करावेच लागतात,”

“सदस्य, गावकरी, कार्यक्रम यांना काहीतरी द्यावे लागते,”

“काळजी करू नका, सरपंचीचा मान मोठा आहे, पैसा वसूल होईल,”

अशा असंख्य आश्वासनांनी तिला गोंजारले गेले.

मुळातच तिच्याकडे पैसा नव्हता. अखेर तिच्या नवऱ्याकडे असलेला थोडासा जमिनीचा तुकडा एका जमीनदाराकडे गहाण ठेवण्यात आला. त्या बदल्यात दोन-तीन लाख रुपये मिळाले. पण हे सर्व पैसे उडाणटप्पू लोकांनी खाणे-पिणे, वाटप, दारू-पाणी यामध्ये उडवले. आणि तिला सरपंच बनवले.

बैठका झाल्या, मिरवणुका निघाल्या, गावात जेवणावळी झाल्या. बकऱ्या, कोंबड्या कापल्या गेल्या. दारू-पाणी सुरू झाले.

तिचा नवरा गरीब, पाठीवर दोन लहान मुलांचा भार. मुले शिकत होती. सरपंच झाल्यानंतर तिचे राहणीमान थोडे सुधारले. इतर ग्रामपंचायत सदस्य व काही पुढारी  तिला तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. तिला माहीत नसलेले शहर, नवे जग दाखवले गेले. त्या झगमगाटात ती कधी रंगली, हे तिलाच कळले नाही.

कपटी राजकारणी तिला थोडेफार पैसे देत, “सरपंच मॅडम” म्हणून सह्या करून घेत. प्रत्यक्षात सर्व कारभार तेच करत. मॅडमला थोडे देऊन बाकी सर्व स्वतः लाटत.

ती शिकलेली नसल्यामुळे फार काही समजत नव्हते. पण शेवटी सरपंच पदाचा आणि तिच्या भोळेपणाचा फायदा उघडपणे घेतला जाऊ लागला. काही काळानंतर ती गाव सोडून बैठकांच्या नावाखाली तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी राहू लागली. खाणे-पिणे, खर्च हे सगळे राजकीय पुढारी करत आणि तिचा गैरफायदा घेत.

तिने अनेकदा विरोध केला. पण लगेच धमकी दिली जाई—

“सगळं तुझ्या घरच्यांना, नातेवाईकांना सांगू,”

भीतीपोटी ती गप्प बसत गेली. हळूहळू ती चारही बाजूंनी वेढली गेली.

एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक राजकीय व शासकीय अधिकारी तिचा फायदा घेऊ लागले. अखेर काही गोष्टींचा कळस झाला आणि ती बोलू लागली. तेवढ्यात जमीनदार पुढे आला—

“तुझ्या निवडणुकीसाठी दिलेले दोन-तीन लाख परत दे, नाहीतर जमीन जप्त करतो,”

घरावर, कुटुंबावर, जनावरांवर धमक्या दिल्या जाऊ लागल्या.

या असह्य परिस्थितीत ना सांगता येईना, ना बोलता येईना. तिच्या मनावर प्रचंड ताण आला. ती एकांतवास करू लागली. बैठका, कार्यक्रम सगळं सोडलं. नवऱ्यालाही काही सांगता येईना.

शेवटी नवऱ्याने विचारले—

“सखू, तू अशी गप्प का?”

तेव्हा तिने सगळं सत्य सांगितलं. नवऱ्याने तिला आधार दिला

“आपण यातून बाहेर पडू.”

इतर दोन-तीन जाणकार लोकांचा सल्ला घेऊन अखेर तिने सरपंच पदाचा राजीनामा दिला. पदही गेलं, जमीनही गेली. शेवटी उपासमारीची वेळ आली.

अशा काही समाजातील वृत्तीमुळे आजही या समाजावर अन्याय होत आहे. आपल्या समाजात काही शहाणी, जाणकार माणसं असूनही, ते पुढे येऊन आधार देत नाहीत, मार्गदर्शन करत नाहीत—हेही तितकंच कटू सत्य आहे.

आज परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे. मुलं-मुली शिकत आहेत, सुशिक्षित तरुण मिळत आहेत. तरीही समाजावरचं दडपण कायम आहे, हे नाकारता येत नाही.

म्हणून राजकारण जितकं सोपं वाटतं, तितकं ते सोपं नसतं. आर्थिक पाठबळ, सामाजिक समतोल, साम-दाम-दंड-भेद या सर्व बाबींची तयारी नसेल, तर राजकारणापेक्षा गचांडीच जास्त होते.

या क्षेत्रात उतरण्यापूर्वी सखोल अभ्यास, जनतेचं मन जाणून घेणं, आणि आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. जसं सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा निर्णय विचारपूर्वक घेतला, तशीच प्रगल्भता आवश्यक आहे.

समाज पुढे गेला पाहिजे.

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा व सांस्कृतिक विकास झाला पाहिजे.

यासाठी निस्वार्थी, प्रामाणिक राजकारणी घडले पाहिजेत.

अनाडी, गोरगरीब लोकांचा फायदा घेणारी मंडळी ही या क्षेत्रासाठी घातक आहेत.

म्हणून विचार करूया—

दुर्गम ग्रामीण भागातील, समाजहित जपणाऱ्या योग्य व्यक्तींनाच पुढे आणूया.

यामध्येच आपला खरा विकास आणि समता दडलेली आहे, हे नाकारता येणार नाही.

लेखक :- सुदाम मदगे किवळे, मावळ 

टिप्पण्या

  1. सत्यपरिस्थिती आहे, अशा लेखनानी तरी समाजात जागृती होईल.

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय मदगे साहेब आपण ग्रामीण जीवनशैली वर अत्यंत परखड आणि आभासपूर्वक मत मांडून ग्राम संस्कृतीचे आम्हास दर्शन घडवता आपले लेख खुप छान असतात आपण उत्कृष्ठ साहित्यक व लेखक आहात येथून पुढे पण आम्हाला आपल्या कडून असेच लेख वाचायला मिळतील हिच माफक अपेक्षा व आपणास पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा :-शंकर शिंदे सरचिटणीस शासकीय फोटोझिंको कामगार संघटना पुणे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था