यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा



माझं लहानपण आजोळी गेलं. घरची परिस्थिती बेताची होती. गावातील सर्वच मुलांवर त्या काळी लहान वयातच कामाचा बोजा पडायचा. 

गवत काढणी, भात कापणी, गुरे-ढोरे,सांभाळने, गवत कापून आणने ही सगळी कामं आमच्यासाठी रोजचीच होती. 

या कामांतूनच उपजीविकेचा थोडाफार आधार मिळायचा.

शाळेला जायचं तेव्हा तिथेच खाणंपिण मिळायचं. आश्रमशाळा होत्या, म्हणून दुर्गम ग्रामीण भागातील आम्हा मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. 

सुट्टी लागली की पुन्हा गावाकडे येऊन कामाला लागायचं. त्या शाळा नसत्या तर ग्रामीण भागातील अनेक मुलं शिकलीच नसती. 

आजही इतके दुर्गम भाग आहेत की पावसाचे चार महिने माणसाला बाहेर पडता येत नाही; तेव्हा जे मिळेल ते खाऊन दिवस काढावे लागायचे.

माझ्या मामाच्या गावातील तळपेवाडीतील आमच्यासोबत शिकलेली अनेक मुलं पुढे मोठ्या नोकऱ्यांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावली. 

लक्ष्मण दळवी, बाळू बुरसे, शांताराम वाजे, दत्तू दगडे, दत्तू तळपे, अनंता काठे, संभाजी अशी अनेक नावं आजही अभिमानाने घेतली जातात. तळपेवाडीचा मावळ परिसरात नावलौकिक आहे.

तळपेवाडीचा मावळ तालुक्यात अजूनही दबदबा आहे. तरुण मंडळ, आणि पैलवान यांनी गावाची ओळख निर्माण केली. अनेक नामांकित पैलवान येथे घडले. 

अशोक सुपे, मच्छिंद्र दगडे यांच्यानंतर आजची पिढी तालुका, जिल्हा पातळीवर नाव कमावत आहे. 

आमच्या काळात अनंता काठे, दत्तू तळपे यांसारखे पैलवान प्रेरणास्थान होते.

खेळ असो क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल किंवा विटी-दांडू, सोंगट्या, पोहणे, शिकार; या सगळ्यात तळपेवाडीतील मंडळी तरबेज होती. 

तरुण मंडळाचं ढोलपथक, रामायण, भारुड, भजन हे गावाचं सांस्कृतिक वैभव होतं. श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांची पात्रं इतकी हुबेहूब साकारली जात की पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं. 

किसन तळपे, मारुती दळवी, लक्ष्मण काठे, नथू दगडे, गोविंद काठे, नारायण काठे आणि इतर अनेक कलाकारांची कला अप्रतिम होती. 

आम्हीही कधीमधी द्वारपालाची पात्रं साकारायचो. माझी आणि बाळूची “काळू–बाळू” जोडी तर प्रसिद्धच होती.

पेटीवादक मोरमारे मास्तर, पखवाजवादक गुलाब उभे, रामदास काठे—अशा अनेक गुणी कलाकारांनी गावाचं नाव उज्वल केलं. 

तळपेवाडीची यात्रा आणि आखाडा आजही पुणे, नगर, रायगड, सातारा जिल्ह्यांतील नामांकित पैलवानांना आकर्षित करतो. 

आजही वरिष्ठ व तरुण मंडळी मिळून हे सगळं नियोजनबद्धपणे पार पाडत आहेत, याचा अभिमान वाटतो.

या वाडीतील मुलं अत्यंत हुशार होती. आज मावळ तालुक्यात सर्वाधिक शासकीय, निमशासकीय आणि उच्च अधिकारी पदांवर येथीलच मुलं आहेत. 

दळवी, मदगे, तळपे, बुरसे, वाजे, मोरमारे, लोहकरे, काठे, दगडे, सुपे अशा अनेक कुटुंबांतील मुलांनी मोठी प्रगती केली आहे.

पण जुने दिवस आठवले की कंठ दाटून येतो. त्यावेळी अत्यंत गरीब आणि दयनीय परिस्थिती होती. काम मिळेल की नाही, जे मिळेल ते खाऊन पोट भरायचं. 

लहानपणीच पोटाच्या खळगी भरण्यासाठी पळापळ सुरू होती. तरीही त्या पिढीची दखल घेतली गेली, मार्गदर्शन मिळालं, आणि आज एक पिढी दुसऱ्या पिढीला हात देत प्रगती करताना दिसते हे समाधानकारक आहे.

नदी, तळं, जंगल हेच आमचं विश्व होतं. शाळा सुटली की डोक्याला पिशवी बांधून पूर आलेल्या नदीत उड्या मारत पोहायचो. तेव्हा कसली भीती वाटत नसे. आज ते चित्र आठवलं की अंगावर काटा येतो. 

त्यावेळी वीज नव्हती, अंधारात जंगलातून फिरायचो. मी तर लहानपणी आजोबांसोबत शिकारीला जायचो—तो अनुभव मी आधीही लिहिला आहे.

विहिरीतून पाणी भरणं, तळ्यावर धुणी-भांडी करणं—असं बरंच काही अनुभवायला मिळालं. त्या सगळ्यातून आम्ही बाहेर आलो. 

आज सुविधा वाढल्या आहेत, वाहतूक यंत्रणा सुधारल्या आहेत. त्यांचा गैरवापर न करता योग्य उपयोग झाला पाहिजे. जे आहे त्यात समाधानी, आनंदी राहणं महत्त्वाचं आहे.

हा लेख म्हणजे तळपेवाडीतील तरुण पिढीसाठी एक संदेश आहे.आणि जुन्या जाणत्या मंडळींनी केलेल्या कार्याचा गौरव आहे.

धन्यवाद.

सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

आजच्या गावांची दैन्यावस्था