लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज
पूर्वी मुलं-मुली बघायला जाणं सोडा साधा फोटोही पाहायला मिळायचा नाही. कारण त्यावेळेस सुविधा नव्हत्या. माझ्या आजोबाने सांगितलेली हकीगत.
एकदा माझा आजोबा बोलला.
ये तुक्या? तुझ्या पहिल्या मुलाचं म्हणजे भाग्याचं लग्न करायचय ना?
दोन-तीन वर्षांपूर्वी मी घोटवडीला गेलो होतो. तिथे गेलो तेव्हा तेथील माझा मित्र गंग्या पारधी बोलला.
हे कृष्णा.(कृष्णा म्हणजे माझा पंजोबा) अरे, तुझ्या भाग्याच्या पोराला पोरी बघतोय असं माझ्या कानावर आलंयं.
हा बघतोय. त्याच्या जोडातली एखादी मिळाली तर. हाये का कुठे तुझ्या पाहण्यात.?
अरे मग कशाला इकडे तिकडे मुलगी बघतो?
माझ्या नातवाची पोर हाये ना. आताच तुला तिने पितळी मध्ये चहा आणून दिला नाही का. आणि खंदील तुझ्या बाजूला केला. ती पोरगी हाये बघ.
थोडी बारीक आहे पण दोन एक वर्षानी उपवर होईल.
आणि त्याच दिवशी लग्नाची बोलणे पक्के झाले.
घरी आल्यावर आजोबाने ही सर्व हाकिकत मामाला म्हणजे भाग्याला सांगितली. आणि अखेर पंजोबांनी घडवलेलं लग्न ना त्याच्या मुलाला ना नातवाला मोडवता आले.
केवळ एका शब्दासाठी नातवाचं आणि मित्राच्या शब्दाला मान देऊन दुसऱ्या मित्राने त्याच्या नातवाची पोर पणजोबाच्या नातवाला दिली.
साधारण हा काळ 80 ते 90 वर्षांपूर्वीचा होता. केवळ घर आहे शेतीवाडी आहे पोर सुकली खाईल कष्ट करील.
घरी गुरु ढोरं आहेत. बैल जोडी आहे. खटल्याचं घर आहे. माणसं खाऊन पिऊन सुखी आहेत. विशेष म्हणजे माणसं चांगली आहेत. एवढेच काय ते बघितलं जायचं.
पूर्वीच्या मोठ्या आणि जाणकार माणसाच्या शब्दाला मोठं वजन असायचं. एकदा मोठा व्यक्ती बोलला म्हणजे झालं. गावातील कमिटी मध्ये किंवा बैठकीमध्ये गावातील विषय चालले असतील आणि एखादा कोणी बोलत असेल आणि समजा एखादा जुना जाणता जानकर माणूस बोलला तर सर्व गाव शांत बसायचा. व त्याने दिलेली सूचना मान्य करायची.
यामधून मोठ्या माणसाला गावाने दिलेला आदर यामध्ये स्पष्ट दिसून येई.
पुढे काळ बदलला. आधुनिकरण झालं. लॅपटॉप, मेजर, दूरध्वनी, फोन, टीव्ही आयफोन आणि मग त्याच्यातील वेगवेगळी फंक्शन आले. मग काय सारं ओपन झालं.
पूर्वी दूर लांब असलेल्या एखाद्याला बोलवायचे असेल तर मोठ्याने हाक मारावी लागायची. दूर गावाला किंवा शहरात राहत असलेल्या नातेवाईकांना पत्र पाठवली जायची. त्यावेळी साधे पोस्ट कार्ड आंतरदेशीय अशी पत्र असत.
शेजारच्या गावातील कोणाला काही महत्त्वाचा निरोप सांगायचा असेल तर डोंगरावर जाऊन दुसऱ्या गावाच्या लोकांना आवाज दिला जायचा. आता तसं काही राहिलं नाही.
आताही आधुनिक यंत्रणा आल्यामुळे कम्युनिकेशन करणं, संपर्क करणं अगदी सोपं झाले. सोपं झालं जरी असलं तरी माणसांचा भेदभाव वाढत चाललाय. माणसं तुटत चाललीत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याला लोक खटल्याचं घर म्हणायचे. परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणात विभक्तीकरण होऊन छोटे कुटुंब बनण्याची लाट आली. आता मी आणि माझी बायको आणि मुले एवढेच पाहिले जाते. बाकीच्यांचा विचार केला जात नाही.
आता कुटुंब फुटलेली आहेत. केवळ अहंकारामुळे व मिळालेल्या पैशामुळे शेजारचा माणूस एखादे संकट आले तर मदतीला धावून जायचे सोडाच साधे विचारत देखील नाही.
आता जुन्नर मध्ये एका गावी एक घटना ऐकायला आली. ती म्हणे बांधलेलं घर वरती चढून देत नाही त्याला प्लास्टर करून देत नाही. अशी परिस्थिती.
असो. असं बरच काही ना सांगता येत, ना बोलता येत. जागरूक मंडळी जागरूक आहेत. त्यांना कळावं अशी अपेक्षा आहे.
आता मोबाईल मुळे संपर्क लगेच होतो. बायोडाटा, इंस्टाग्राम, व्हाट्सअप टाकल्यावर मुला, मुलींचे सर्व डिटेल लगेच कळतं. तरीही लग्न जुळत नाहीत. आणि ह्या आती आधुनिकपणामुळे नाहक नकळत माहिती किंवा नसलेली माहिती डिस्प्ले केली जाते. किंवा दुसऱ्या मार्फत जाणून बुजून कळवली जाते. पर्यायाने कुटुंब कलह वाढत जातात. आणि होऊ घातलेली किंवा होणारी लग्न आता जुळत नाही ही वास्तव्य सध्या आहे.
मुलगा चांगला शिकलेला आहे पण घरची गरिबी आहे, थोडं फार कमवतोय तरीही बापाने मुलगी दिली नाही.अखेर मुलीने निर्णय घेतला मुलगा चांगला आहे.
मी त्याच्याशीच लग्न करणार असेही प्रसंग झाले पाहिजेत. आणि उलट मुलगा मोठा आहे उच्च शिक्षित आहे. परंतु मुलगी गरीब आहे, ती जास्त शिकली नाही, ती कामाला नाही किंवा तो कामाला नाही ह्या गोष्टी चाचपडून चाचपडून शेवटी चोथा होतो. हाती काही मिळत नाही. शेवटी डोक्याला हात लावायला लागतो. आणि यांना त्या कारणामुळे आता मुलांची लग्न लांबत चालली आहेत हे सत्य आपल्या सर्व वडील मंडळींना का ध्यानात येत नाही.
म्हणून माझी विनंती आहे की मंडळी समाज कार्य करणारी मंडळी समाज कार्य करत आहेत. ते चांगल्या स्वरूपाचं ज्ञान देत आहे. चांगले मुला मुलींचे फोटो दाखवत आहेत. आपण जागृत व्हा, आणि मुलांचे संसार मार्गी लावा. त्यांच्या खांद्यावर जोखड टाकून द्या आणि त्यांचा प्रपंच त्यांना सुखी करण्याचा आशीर्वाद देऊया.
सुदाम मदगे (किवळे वडगाव मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा