भावकी : पूर्वीचे कौटुंबिक ऐक्य आणि आजची बदललेली परिस्थिती
पूर्वी गावाकडील समाजजीवनात कौटुंबिक एकत्रिकरण, भावकी आणि गावातील ज्येष्ठांचा मान-आदर खूप मोठा होता. काळ बदलला आणि पिढ्यानपिढ्या वाढलेल्या नातेगोतींचे स्वरूपही बदलत गेले. पूर्वी ५० ते १०० लोकही एका घरात राहत असत. आज मात्र असे चित्र फारच दुर्मिळ झाले आहे. त्या काळी घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा शब्द हा अंतिम निर्णय मानला जायचा. तो आर्थिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा वैद्यकीय—ज्येष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असायचा. “पाटील बोलला” किंवा “पंजोबा म्हणाले” म्हणजे तोच न्याय मानला जायचा. आज परिस्थिती वेगळी आहे. आधुनिक साधनसामग्री वाढली, शिक्षण वाढले आणि लोकांची विचारसरणी बदलली. पूर्वी फार शिक्षण नसतानाही कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालायचा. परंतु शिक्षण आणि आधुनिक यंत्रसामग्रीमुळे माणसांच्या गरजा वाढल्या. जीवनशैली बदलली आणि “माझं आणि माझं मूलबाळ” एवढीच मर्यादित व्याख्या राहिली. आई-वडिलांना दोन-तीन मुलं असतात. लहानपणी भाऊ-बहिणी एकत्र राहतात. मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते. मुलांची लग्न होतात आणि सुरुवातीला एक-दोन वर्ष सर्व ठीक चालते. पण हळूहळू स्वार्थ, मान-अपमान आणि तुलना यामुळे वाद स...