भावकी : पूर्वीचे कौटुंबिक ऐक्य आणि आजची बदललेली परिस्थिती
त्या काळी घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा शब्द हा अंतिम निर्णय मानला जायचा. तो आर्थिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा वैद्यकीय—ज्येष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असायचा. “पाटील बोलला” किंवा “पंजोबा म्हणाले” म्हणजे तोच न्याय मानला जायचा.
आज परिस्थिती वेगळी आहे. आधुनिक साधनसामग्री वाढली, शिक्षण वाढले आणि लोकांची विचारसरणी बदलली. पूर्वी फार शिक्षण नसतानाही कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालायचा. परंतु शिक्षण आणि आधुनिक यंत्रसामग्रीमुळे माणसांच्या गरजा वाढल्या. जीवनशैली बदलली आणि “माझं आणि माझं मूलबाळ” एवढीच मर्यादित व्याख्या राहिली.
आई-वडिलांना दोन-तीन मुलं असतात. लहानपणी भाऊ-बहिणी एकत्र राहतात. मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते. मुलांची लग्न होतात आणि सुरुवातीला एक-दोन वर्ष सर्व ठीक चालते. पण हळूहळू स्वार्थ, मान-अपमान आणि तुलना यामुळे वाद सुरू होतात.
आजूबाजूची काही मंडळीही याला कारणीभूत ठरतात.
“त्याच्या मुलाला असं मिळालं, तुझ्या मुलाला नाही.”
“ते गाडीवर फिरतात, तुमच्याकडे का नाही?”
“शेतात तुम्हीच काम करता, ते काही करत नाहीत.”
“म्हातारा-म्हातारीचा सांभाळ मलाच करावा लागतो.”
अशा अनेक गोष्टी कुटुंबातील कलहाला कारणीभूत ठरतात. हळूहळू भाऊ-भावांमध्ये बोलणंही बंद होतं. वाद इतका टोकाला जातो की घराचे तीन खण तिघांना वाटून द्यावे लागतात, आणि शेवटी म्हातारा-म्हातारी पडवीत राहण्याची वेळ येते. हे वास्तव आजच्या आधुनिक युगात अनेक ठिकाणी दिसत आहे.
शेतीच्या वावरावरून, इस्टेटवरून, बांधावरून देखील वाद होतात.
कोणी बांध फोडला, अवतासाठी बैल दिला नाही, रान पेटवलं, गवत जाळलं—अशा घटना घडतात. भावकीतील तणाव इतका वाढतो की अनेकदा मोठे भांडण उभे राहते.
जुन्नर परिसरात घडलेली एक घटना याचे उदाहरण आहे. म्हणे, घर बांधायला जागा असूनही भावकी घर बांधू देत नाही. काही वेळा मोठा भाऊ किंवा लहान भाऊ वडिलांचं घरच खेचून घेतो आणि दुसऱ्याला बाहेर काढतो. हे सर्व स्वार्थ आणि “माझ्यासाठी मीच” या विचारसरणीचे परिणाम आहेत.
पूर्वी गावांमध्ये घर-शेतीचे वाटप शांततेने व्हायचे. जमिनीवर दोऱ्या टाकून वाटणी केली जायची. आता मात्र या भांडणात कोणी पडायला तयार नसतो. जो मोठ्याने वाद करतो तोच मोठा ठरतो. त्याला ना आई-वडिलांची फिकीर असते ना इतरांची.
आज कायद्यानुसार बहिणीलाही वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळतो. काही बहिणी मोठ्या मनाने हिस्सा घेत नाहीत. पण काही जणींकडे सर्व काही असूनही त्या हिस्सा मागतात. त्यामुळेही भावांमध्ये तणाव निर्माण होतो. पूर्वी बहिणीला चोळी-बांगडी देऊन मान दिला जायचा, आता परिस्थिती बदलली आहे.
म्हणून सर्वांनी एकत्र बसून, मनापासून विचार करून, काय दिलं-काय केलं हे शांतपणे तपासलं पाहिजे. वृद्ध आई-वडिलांचे हाल होऊ नयेत, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.
आजच्या काळात काही ठिकाणी आधुनिक सुना सासू-सासऱ्यांकडे लक्ष देत नाहीत, अशीही उदाहरणे दिसतात. सर्वांनाच दोष देणे योग्य नाही, पण काही ठिकाणी हे वास्तव आहे. नवरा-बायको नोकरीसाठी बाहेर पडतात आणि शेतीची जबाबदारी वृद्ध आई-वडिलांवर येते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मुलांना मोठं केलं, पण शेवटी त्यांच्या वाट्याला एकटेपणा येतो. म्हातारी पडवीत पडलेली असते, म्हातारा दारात बसलेला असतो—कोणी विचारपूस करत नाही. ही अवस्था म्हणजे जिवंतपणी मरणासारखीच आहे.
मित्रहो, हे सत्य आहे की आज प्रत्येकाच्या गरजा वाढल्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या संसारात गुंतला आहे. पण इतकेही बदल होऊ नयेत की स्वार्थ आणि अहंकारामुळे नाती तुटावीत.
पूर्वी कर्ज पणजोबा काढायचा आणि नातवाला फेडावं लागायचं. आज लगेच कर्ज काढायचं आणि लगेच फेडायचं अशी परिस्थिती आहे.
म्हणून जे पटण्यासारखं आहे, जे सत्य आहे ते स्वीकारा. आपल्या मनात थोडा विचार करा—आपण काय करतोय आणि समोरचा काय करतोय याचा शांतपणे विचार करा. छोट्या छोट्या गोष्टींमुळे कौटुंबिक जिव्हाळा तुटू देऊ नका.
वेगळं राहत असाल तरी सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहा. जळकुटेपणा सोडा. कोणीतरी कष्ट करून गाडी, घर किंवा बंगला बांधला असेल तर त्याला शुभेच्छा द्या. त्याच्या मुलांचं चांगलं झालं असेल तर त्यालाही आनंदाने शुभेच्छा द्या.
अडी-अडचणीच्या वेळी एकमेकांना आधार द्या. माणुसकी जपली तर आपुलकी टिकून राहते. कधी कधी फक्त आधाराचे दोन शब्दही माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम करतात.
समोरचा कसा वागतोय यावरून आपणही तसं वागू नये. आपण चांगलं वागलं तर देवही आपल्या बाजूने उभा राहतो, हा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
म्हणून चांगले आचार-विचार, स्वच्छ मन आणि माणुसकी जपत वागूया. आपलं कुटुंब आणि आपला गाव चांगल्या विचारांनी पुढे जाईल, यात शंका नाही.
धन्यवाद.
आपला
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा