आत्महत्येची हत्या
आज आपण जिकडे तिकडे पाहतो तिकडे प्रचंड स्पर्धा दिसते. माणसाच्या गरजा कधीच कमी झाल्या नाहीत; उलट त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पक्षी, प्राणी आपल्या गरजांपुरते जगतात; परंतु माणूस मात्र अमर्याद गरजांच्या जाळ्यात अडकत चालला आहे. या वाढत्या गरजांमुळे त्याची मानसिकता ढासळत आहे. पैशाची ओढ वाढली आहे, पण समाधान, स्थैर्य आणि खरे सुख हरवले आहे. माणूस सतत पैशाच्याच मागे धावताना दिसतो. “यांनी हे मिळवलं, त्यांनी ते साध्य केलं, तो पुढे गेला आणि मी मागे का?” या तुलनात्मक विचारांनी माणूस आतून पोखरला जात आहे. सर्व काही असूनही तो असमाधानी आहे. हीच असमाधानाची भूक माणसाला कुठल्या टोकाला नेऊन ठेवते, हे आपण आज समाजात पाहत आहोत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एका वेळच्या अन्नासाठी काही लोक तडफडत आहेत. अनेक दुर्गम भागांत भूकबळी जाणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून केंद्र शासनावर ताशेरे ओढले आहेत. असाच एक माणूस प्रचंड आशावादी, काहीतरी मोठं करायची जिद्द असलेला — व्यवसायात उतरतो. पण नशिबाची साथ मिळत नाही. धंद्यात तोटा होतो, पुढे ज...