आत्महत्येची हत्या
पक्षी, प्राणी आपल्या गरजांपुरते जगतात; परंतु माणूस मात्र अमर्याद गरजांच्या जाळ्यात अडकत चालला आहे.
या वाढत्या गरजांमुळे त्याची मानसिकता ढासळत आहे. पैशाची ओढ वाढली आहे, पण समाधान, स्थैर्य आणि खरे सुख हरवले आहे. माणूस सतत पैशाच्याच मागे धावताना दिसतो.
“यांनी हे मिळवलं, त्यांनी ते साध्य केलं, तो पुढे गेला आणि मी मागे का?” या तुलनात्मक विचारांनी माणूस आतून पोखरला जात आहे. सर्व काही असूनही तो असमाधानी आहे.
हीच असमाधानाची भूक माणसाला कुठल्या टोकाला नेऊन ठेवते, हे आपण आज समाजात पाहत आहोत.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एका वेळच्या अन्नासाठी काही लोक तडफडत आहेत.
अनेक दुर्गम भागांत भूकबळी जाणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून केंद्र शासनावर ताशेरे ओढले आहेत.
असाच एक माणूस प्रचंड आशावादी, काहीतरी मोठं करायची जिद्द असलेला — व्यवसायात उतरतो. पण नशिबाची साथ मिळत नाही.
धंद्यात तोटा होतो, पुढे जाण्याचा मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो आणि शेवटी तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो.
आज तर अगदी छोट्या छोट्या कारणांवरूनही अशा घटना घडत आहेत.
कोणी प्रेमात फसवलं, मुलगी पळून गेली, मुलगा नापास झाला, राजकारणात अपयश आलं, नकारात्मक विचारांनी ग्रासलं, सतत अपयश येत राहिलं, लग्न जुळत नाही, शेतीवाडीचे वाद, म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी आयुष्यात अशा अडचणी येणारच.
जगावरच जर कर्ज आहे, तर आपण आणि तुम्ही कोण आहोत?
महत्त्वाचं हेच आहे की या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद आपण स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. पण दुर्दैवाने याच्या उलट चित्र आपण पाहत आहोत. नको त्या घटना रोज घडत आहेत.
देवाने आपल्याला जन्म दिला आहे, तो उगाच नाही दिला. पक्ष्यांना पंख दिले, मुंगीला तिच्या क्षमतेइतकी ताकद दिली. आपण मुंगीला तिच्या तोंडात दाणं घेऊन चालताना पाहतो.
मग आपण माणसं ज्यांना विचारशक्ती, बुध्दी, श्रम करण्याची ताकद आहे आपण का खचून जावं?
भरपोट जेवण, झोपायला दोन फूट जागा यापलीकडे खरं तर माणसाला काय हवं?
जर आपण याचा शांतपणे विचार केला, समाजात योग्य जागृती निर्माण केली आणि यातून योग्य बोध घेतला, तर या देशात ना शेतकऱ्यांची आत्महत्या होईल, ना कोणत्याही सामान्य माणसाची.
समाधानाचं तत्व जर आपण स्वीकारलं, तर मी ठामपणे सांगतो.
आपल्याला “आत्महत्या” या शब्दाचीच हत्या करावी लागेल.
आणि ती हत्या नक्कीच शक्य आहे.
धन्यवाद.
सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा