मंदिरातला देव माणूस
साधारण चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ असावा. तेव्हा रोजगार म्हणजे सकाळी उठून गवत कापणे, काट्यावर नेणे, जंगलातून लाकडाच्या फाट्या आणून विकणे—त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कमच घर चालवायची.माझा एक मित्र ही हकीगत सांगत होता. त्याला मी म्हणालो, “आमचंही काही वेगळं नव्हतं. रोजगार नव्हता, शेतात मिळेल ते काम करायचं.” ते दिवस होते आमच्या दहावीच्या वर्गाचे. शाळा संपल्यावर झाडाखाली पोत अंथरून बसायचो आणि मन लावून अभ्यास करायचो. मुलांमध्ये अभ्यासाची चढाओढ होती. जसजसं वर्ष पुढे सरकत गेलं, तसतसा अभ्यासाचा ताण वाढत गेला. दहावीचं वर्ष असल्यामुळे आम्ही गावातील मारुतीच्या मंदिरात कंदील किंवा रॉकेलची बत्ती लावून रात्री-रात्री जागून अभ्यास करायचो. परीक्षा आली, आम्ही परीक्षा दिली. परीक्षा चांगली गेली होती. इंग्रजी थोडी कच्ची होती, पण त्यासाठीही मेहनत घेतली होती. दहावी पास होणार याची खात्री वाटू लागली आणि पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची लगबग सुरू झाली—जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला. ही कागदपत्रे गावात किंवा ग्रामपंचायतीत मिळत नव्हती. गावात फारसे शिकलेले लोक नव्हते. तालुका म्हणजे काय, कुठे जायचं—हेही अनेकांना म...