मंदिरातला देव माणूस
साधारण चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ असावा. तेव्हा रोजगार म्हणजे सकाळी उठून गवत कापणे, काट्यावर नेणे, जंगलातून लाकडाच्या फाट्या आणून विकणे—त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कमच घर चालवायची.माझा एक मित्र ही हकीगत सांगत होता.
त्याला मी म्हणालो, “आमचंही काही वेगळं नव्हतं. रोजगार नव्हता, शेतात मिळेल ते काम करायचं.”
ते दिवस होते आमच्या दहावीच्या वर्गाचे. शाळा संपल्यावर झाडाखाली पोत अंथरून बसायचो आणि मन लावून अभ्यास करायचो. मुलांमध्ये अभ्यासाची चढाओढ होती. जसजसं वर्ष पुढे सरकत गेलं, तसतसा अभ्यासाचा ताण वाढत गेला. दहावीचं वर्ष असल्यामुळे आम्ही गावातील मारुतीच्या मंदिरात कंदील किंवा रॉकेलची बत्ती लावून रात्री-रात्री जागून अभ्यास करायचो.
परीक्षा आली, आम्ही परीक्षा दिली. परीक्षा चांगली गेली होती. इंग्रजी थोडी कच्ची होती, पण त्यासाठीही मेहनत घेतली होती. दहावी पास होणार याची खात्री वाटू लागली आणि पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची लगबग सुरू झाली—जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला.
ही कागदपत्रे गावात किंवा ग्रामपंचायतीत मिळत नव्हती. गावात फारसे शिकलेले लोक नव्हते. तालुका म्हणजे काय, कुठे जायचं—हेही अनेकांना माहीत नव्हतं. एका अनुभवी माणसाने सांगितलं, “तालुक्याला जावं लागेल.”
आमच्या गावापासून पाच-सहा किलोमीटरवर असलेल्या माळेगावपर्यंत फक्त एकच एसटी जात असे, तीही सकाळी एकदाच. काम असलेले सगळेच लोक त्या एसटीसाठी धावपळ करायचे.
ठरल्याप्रमाणे मी आणि माझा मित्र तालुक्याला जाणार होतो. सकाळी म्हातारीने मला उठवलं. मित्राकडे गेलो, पण तो आला नाही. शेवटी एकट्यानेच जायचं ठरवलं. म्हातारीने चार-पाच रुपये हातात दिले आणि पिशवीत नाचणीची एक भाकर व चटणी दिली. माझ्या खिशात चार-पाच रुपये होते.
पहाटेच घरातून निघालो. कच्च्या रस्त्याने चालत माळेगाव गाठलं. एसटीत बसलो. तिकीट दोन-तीन रुपयांचं होतं. नऊच्या सुमारास तालुक्याला पोहोचलो. दहाला कार्यालय उघडणार होतं. काय बोलायचं, काय करायचं—काहीच सुचत नव्हतं. मनात भीती होती.
कचेरीच्या दारात उभा असताना सफेद कपड्यातील चपराशी दादांनी विचारलं,
“काय रे पोरा, कुठून आलाय? काय काम आहे?”
मी शाळेची कागदपत्रे दाखवली आणि जातीचा दाखला काढायचा आहे असं सांगितलं. ते माणूस खूपच मदतगार निघाला. त्यांनी मला एका खिडकीपाशी नेलं, फॉर्म भरायला सांगितलं. सरपंचाचा दाखला माझ्याकडे होता. दोन रुपये फी भरायला सांगितली.
“संध्याकाळी चार-पाच वाजता ये, साहेबांची सही झाली की दाखला देतो,” असं ते म्हणाले.
मी त्यांना सांगितलं, “दादा, आमच्या गावाला एकच एसटी जाते. चार-साडेचारला निघते.”
“बरं, चारच्या आत बघतो,” असं ते म्हणाले.
पण वेळ झाली, साहेबांची सही झाली नाही. माझ्या खिशात जेमतेम पाच-सहा रुपये उरले होते. गावाला परत जाण्याची सोय नव्हती. जंगलातून रात्री चालणं अशक्य होतं. पुन्हा सकाळी येणंही जमणारे नव्हते. शेवटी ठरवलं—दाखला मिळाल्याशिवाय जायचंच नाही.
साडेपाचच्या सुमारास दाखला मिळाला. पण तोपर्यंत गावाची एसटी निघून गेली होती. ओळखीचं कोणीच नव्हतं. दुपारी नाचणीच्या भाकरीतली अर्धी भाकर खाल्ली होती. आता रात्र झाली होती.
राहायचं कुठे, म्हणून रेल्वे स्टेशन गाठलं. पण तिथल्या पोलिसांनी हाकलून दिलं. आता भीती आणखीनच वाढली. हातात पिशवी, त्यात कागदपत्रे, अर्धी भाकर आणि खिशात चार-पाच रुपये.
शेवटी वडगावमधील जुने पोटोबाचे मंदिर गाठले. तिथे वडापावचा गाडा होता. पैसे खर्च नको म्हणून फक्त तळलेल्या दोन-तीन मिरच्या घेतल्या. उरलेली अर्धी भाकर खात असताना एक कुत्रं समोर आलं. शेपटी हलवत भाकर मागू लागलं. जणू पोटोबा माझीच परीक्षा घेत होता. मी त्याला दोन तुकडे दिले. भाकर संपली.
नळावर पाणी प्यायलो. आठ-साडेआठ वाजले असतील. मंदिराच्या पायरीवरच पडून राहिलो.
तेवढ्यात पुजारी आले. मला पाहून म्हणाले,
“कुठून आलाय रे?”
मी सगळी हकीगत सांगितली.
“जेवलास का?” त्यांनी विचारलं.
“अर्धी भाकर खाल्ली,” असं सांगितलं.
तो पुजारी मंदिर बंद करून घरी जाणार होता. पण त्या दिवशी काहीतरी सण होता. फोटोबाच्या दारात एक गरीब पोरगा उपाशी पडलाय—ही जाणीव त्याच्या मनाला लागली.
तो घरी गेला आणि परत आला—हातात पोत, चादर, पुरणपोळीचं जेवणाचं ताट, सारभात आणि पाण्याची बाटली घेऊन.
“आत बस, जेव आणि झोप,” असं म्हणाला.
मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला प्रचंड भूक लागली होती. सगळं जेवण मनसोक्त खाल्लं. पोत अंथरून चादर घेतली आणि “जय पोटोबा” म्हणत कधी झोपलो कळलंच नाही.
ही हकीगत केवळ माझी नाही—अशा अनुभवांतून अनेक ग्रामीण जीवन घडलेलं आहे. कधी भाजी विकली, कधी पेंटिंगचं काम केलं, कधी आंबे-करवंद विकले, कधी रोजगार हमी, तर कधी गवत-काडी-फाटी… तुटपुंज्या पैशात मिरची-भाकरीवर आयुष्य चालवलं.
पण एक गोष्ट शिकायला मिळाली—
आपण प्रामाणिक राहिलो, तर अडल्या-नडलेल्या वेळी देव माणसाच्या रूपात नक्की मदतीला येतो.
म्हणूनच अशा गरजवंत लोकांना मदत करत राहा.
निश्चितच आपलं भलं होईल.
धन्यवाद,
सुदाम मदगे किवळे, वडगाव मावळ


*खूपच छान व सुंदर लेखआपण आपला गावातील गावपण आणि गावातील जीवन या विषयावर लिहिला आहे. आदरणीय सुदाम मदगे साहेब. अतिशय आकर्षक व सुंदर शब्दसमनाने लिहिलेला आपला लेख वाचून गावातील जुनी आठवणी हृदया जिवंत झाल्या. पूर्वी शिक्षण कमी होतं पण आयुष्य जास्त होतं.. याची प्रचिती आपल्या लेखातून खास करून होते. आपले पणजोबा आजोबा यांनी सांभाळून ठेवलेली आपल्या आठवणी आपल्या शेतीवाडी याचा प्रत्येकाने सांभाळ करावा. आणि वडिलोपार्जित संपत्ती आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्या गावाची ओळख म्हणून सुरक्षित ठेवावी... खूप खूप धन्यवाद आदरणीय मित्र सुदाम मदगे साहेब..* 👏👏💐💐❤️❤️👌👌✅✅ श्री प्रवीण संके माजी नगरसेवक पालघर
उत्तर द्याहटवा