नाही हारणार – एक सत्यकथा
व्यसनाच्या आहारी गेलेल्या माझ्या नवऱ्याने बरंच काही केलं, पण सुधारणा काहीच झाली नाही. अखेरीस तो गेला. पदरात पडलेली दोन मुलं… त्यांचा सांभाळ करायला मी कमरेला पदर बांधला. कोणाच्या घरीदारी काम करायचं, तर कोणाची मजुरी करायची. आणि ज्या जमिनीचा तुकडा आमच्या वाटेला होता, तो थोरल्या भावाने हिसकून घेतला. आम्हाला घरातून बाहेर काढून दिलं. मग ती दोन मुलं पदरी झाकून मी इकडे तिकडे काम शोधू लागले. “हार नाही मानायची” असंच मी स्वतःला सांगितलं. गावातील लहानमोठी कामं करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. अखेरीस माझ्या एका ओळखीच्या बाईच्या सांगण्यावरून मुलांना घेऊन शहरात आले. झोपडपट्टीत पत्र्याची एक झोपडी घेतली झोपडी कसली, गावातील डुकरांच्या तबेल्यासारखीच. पण साफसफाई करून त्यातच संसार सुरू केला. मुलं हळूहळू मोठी झाली. मुलगी मोठी असल्याने घरातलं काम करू लागली आणि शाळेतही जायची. मुलगा छोटा होता; त्याला बाजूच्याच सरकारी शाळेत टाकलं. दोघंही शिकू लागली. आणि मी भांडीकुंडी, झाडलोट अशी चार–पाच कामं दररोज करू लागले. सकाळी घर सांभाळून कामाला जायचं, दिवसभर धावपळ करायची, संध्याकाळी जेवण बनवायचं—हीच दिनचर्या. हळूहळू वय च...