नाही हारणार – एक सत्यकथा



व्यसनाच्या आहारी गेलेल्या माझ्या नवऱ्याने बरंच काही केलं, पण सुधारणा काहीच झाली नाही. अखेरीस तो गेला. पदरात पडलेली दोन मुलं… त्यांचा सांभाळ करायला मी कमरेला पदर बांधला. कोणाच्या घरीदारी काम करायचं, तर कोणाची मजुरी करायची.

आणि ज्या जमिनीचा तुकडा आमच्या वाटेला होता, तो थोरल्या भावाने हिसकून घेतला. आम्हाला घरातून बाहेर काढून दिलं. मग ती दोन मुलं पदरी झाकून मी इकडे तिकडे काम शोधू लागले. “हार नाही मानायची” असंच मी स्वतःला सांगितलं.

गावातील लहानमोठी कामं करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. अखेरीस माझ्या एका ओळखीच्या बाईच्या सांगण्यावरून मुलांना घेऊन शहरात आले. झोपडपट्टीत पत्र्याची एक झोपडी घेतली झोपडी कसली, गावातील डुकरांच्या तबेल्यासारखीच. पण साफसफाई करून त्यातच संसार सुरू केला.

मुलं हळूहळू मोठी झाली. मुलगी मोठी असल्याने घरातलं काम करू लागली आणि शाळेतही जायची. मुलगा छोटा होता; त्याला बाजूच्याच सरकारी शाळेत टाकलं. दोघंही शिकू लागली. आणि मी भांडीकुंडी, झाडलोट अशी चार–पाच कामं दररोज करू लागले.

सकाळी घर सांभाळून कामाला जायचं, दिवसभर धावपळ करायची, संध्याकाळी  जेवण बनवायचं—हीच दिनचर्या. हळूहळू वय चढू लागलं, अंगदुखी, गुडघेदुखी सुरू झाली. 

घरच्या लोकांकडे मदत मागायला गेले तर दिर–भावजयी दारात उभंही करत नव्हते. आधार कुठलाच राहिला नव्हता.

मग मी मनात ठरवलं—“अजून मेहनत करायची, अजून तळमळीनं काम करायचं… आणि ह्या जीवांना मोठं करायचं.” मुलं माझे कष्ट पाहत होती.

शहरात मोठ्या लोकांचे काळे धंदे चालतात. गुंडगिरी, व्यसन, मादक पदार्थ… हे कामगारांच्या कानावर येत असतं. पण रोजीरोटीच्या व्यापात कोणाकडे आवाज उठवण्याची ताकद नसते. माझ्या कुटुंबातही यामुळे झालेले नुकसान मी पाहिलं होतं, म्हणून सावध राहायचे.

एके दिवशी माझ्या मैत्रिणीनं सांगितलं. अंधाऱ्या रात्री एका ठिकाणी चरस, गांजा, अफू मिळते. तरुण पोरं जातात आणि व्यसनाधीन होतात. मला मुलांची चिंता वाटायला लागली. मी ते ठिकाण पाहिलं, आणि धैर्य एकवटून पोलीस स्टेशनमध्ये कळवलं. माझं नाव न सांगता. तो धंदा बंद झाला आणि माझ्या हातून एक समाजकार्य घडलं, याचं समाधान मला लाभलं.

एके दिवशी रात्री 10 चं काम करून घरी चालले होते. काहीतरी गडबड जाणवली. एका गाडीच्या मागे काहीतरी बॉम्बसारखं किंवा हत्यार ठेवलं जात असल्यासारखं वाटलं. ते लोक संशयास्पद हालचाल करत होते. मला भीती वाटली. तरीही मी पुन्हा पोलीस स्टेशनला गेले. मात्र यावेळी मला एकाने पाहिलं. माझ्या अंगावर काटा आला—“आता माझं काय होणार?”

त्या रात्रीच मुलांना उचललं आणि दुसऱ्या भागात जाऊन राहू लागले. कारण या शहरातील लबाडी, गुन्हेगारी, गुंडांचं राज्य… हे सरळमार्गी गरीबांच्या वाट्याला नसतं. इथे गरीब अजून गरीब, आणि श्रीमंत ट्रकभर पैसा कमावताना पाहिले आहेत.

मी अनेक घरात काम करताना त्यांच्या घरातला पैसा डोळ्यांनी पाहिला. मालकिन आम्हाला नेहमी सांगायची“कोणाला काही सांगू नका.” आम्ही गप्प बसायचो, काम करायचो, महिन्याचा पगार मिळाला की त्यातच संसार रेटायचो.

पण…

मी घाबरले नाही.

मुलं मोठी झाली.

त्यांना योग्य सल्ला दिला, मार्गदर्शन केलं.

आज ते चांगल्या ठिकाणी नोकरी करतात, चांगलं जीवन जगतात.

कारण चांगल्या कामाचं फळ आज नाही मिळालं तरी उद्या नक्की मिळतं.

ही सत्यकथा आपल्याला विचार करायला लावते—

आपण प्रामाणिक राहूया, चांगल्या मार्गाने जाऊया. देव चांगलं केल्याशिवाय राहत नाही.

धन्यवाद आपला 

सुदाम मदगे किवळे, अंदर मावळ


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था