आम्ही कसं जगायचं साहेब?
आम्ही या जंगल-जलसंपत्तीचे मालक आहोत असे फक्त बोलण्यात सांगितले जाते. पण प्रत्यक्षात आमच्या स्वातंत्र्यवीरांनी आणि आमच्या लढाऊ महिला शेरण्यांनी दिलेला लढा फक्त कागदावरच राहिला आहे.
भगवान बिरसा मुंडा यांना उगाच “भगवान” म्हणून संबोधले जात नाही. आमच्या राघोजी भांगरे यांचा इतिहास पाहा.जुन्नर किल्ल्यावर जो लढा झाला, तिथे आमचे श्रद्धास्थान आहे. सातशे लोकांनी लढा दिला होता, साहेब.
असे कितीतरी स्वातंत्र्यवीर आणि महिला आहेत, ज्यांची नावे आपल्याला माहीतही नाहीत. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा कधी शासनाने योग्य सन्मान केला नाही. आदिवासी समाज कायम दुर्लक्षित राहिला.
आमचं रक्त गरम होतं, कारण आम्ही या देशासाठी काय नाही केलं? जमीन वाचवली, पाणी दिलं, जंगल दिलं… पण आमची किंमत शून्य ठेवली गेली.
फक्त आमचा वापर केला आणि नंतर आम्हाला बाजूला फेकून दिलं. आमचे काही पुढारीही त्यामध्ये गेले, हे थोडं स्पष्ट आहे; पण ते लपवता येणार नाही. लेखकाने वस्तुस्थिती सांगितली नाही तर तो खरा लेखक ठरत नाही.
कितीतरी पिढ्या आम्ही जंगल, वनस्पती, जमीन आणि पाण्याची काळजी घेतली. बियाण्यांपासून औषधी वनस्पतींपर्यंत अनेक गोष्टी आम्ही जपल्या.
निसर्गावर प्रेम करणारी, साधी, भोळी, प्रामाणिक आणि समाधान मानणारी अशी आमची माणसं आहेत. लुबाडणूक न करणारी आणि कष्ट करून जगणारी ही माणसं आहेत.
जरी काही मिळालं नाही तरी समाधानाने राहणारा हा समाज आहे. पद्मश्री मिळवलेल्या अनेक व्यक्तींच्या भाषणातूनही या समाजाबद्दल बरंच काही सांगितलं जातं.
आम्ही जमिनीत राबलो, कष्ट केले. त्या काळात आम्ही डोंगर-दऱ्यांमध्ये राहिलो. कुडावना, कुदळ, कोयता, नांगर, टिकाव, कुदळ, इरनं, घोंगडी—कधी पोतं,घोंगडी घेऊन जमिनीची मशागत केली. मग बांध घातले, जमीन सपाट केली, काटे काढले, गवत काढले. किती कष्ट केले हो साहेब!
पण कष्ट करून तयार केलेल्या त्या जमिनीचे मालक आम्ही होतो, आणि आज आम्हालाच त्या जमिनीवरून बाहेर फेकलं जात आहे.
जमिनी आमच्या होत्या हो साहेब. पण आता परिस्थिती बदलली. अचानकपणे अनुसूचित जमातीच्या जमिनी इतर लोकांच्या सातबारावर दिसू लागल्या. हे कसं घडलं? याचा न्यायनिवाडा कोण करणार? आमच्यात ती ताकद नाही, साहेब.
आता तर असंही होत आहे की आमच्या जातीमध्ये इतर लोक घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. काल-परवा बातमी आली की अनुसूचित जमाती मध्ये इतर लोकांना घुसवण्यासाठी समिती करण्यात आली आहे.
मुळात आम्हाला दिलेले अधिकार आणि योजना आम्हाला मिळाल्या का, याचा अभ्यास न करता आमच्यावरच प्रतिघात होत आहे.आमची लोकसंख्या सात ते नऊ टक्के असताना कोणताही सखोल अभ्यास न करता असे निर्णय घेतले जात आहेत.
मग आम्ही जगायचं कसं साहेब?
काही दिवसांनी आमचे हक्कही हिरावून घेतले जातील, आमच्या जमिनीही लाटल्या जातील. आमच्याकडे आर्थिक, सामाजिक, बौद्धिक आणि लढण्याची ताकद कमी आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे हक्क दिले, ते काढून घेणे योग्य नाही.
आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम आदिवासी समाजातील आहेत. पण त्या फक्त खुर्चीपुरत्या आहेत असे वाटते. कदाचित मी जास्त बोलत असेन, पण हे सत्य आहे आवाज दाबला जात आहे.
भरपूर शाळा-कॉलेज उघडली, पण तिथली परिस्थिती काय आहे? न्याय कुठे आहे? मंत्री आमचे आहेत, पण प्रत्यक्षात काय बदल झाला?
स्वातंत्र्याला 75-80 वर्षे झाली, तरीही नंदुरबार, डहाणू, धुळे, नाशिक, रायगड, पुणे, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, पालघर, ठाणे या भागांमध्ये आजही परिस्थिती जैसे थे आहे. अजूनही अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, पाणी नाही, दवाखाने नाहीत. मग विकास गेला कुठे?
आमची विनंती आहे फक्त कागदावर योजना दाखवू नका. आमच्या विभागासाठी तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा प्रामाणिक आयएएस अधिकारी द्या. मग आम्हाला कसं आणि का योजना मिळत नाहीत ते आम्ही स्वतः पाहू.
हे सर्व मी एक लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रखरपणे मांडत आहे. समाजाला आवडलं तर याचा नक्की विचार करावा. नाहीतर दादांनो, आपण गप्प बसलो तर लोक आपली मानगुटी पिळून निघून जातील आणि आपल्या घरातही आपल्याला राहण्याचा अधिकार राहणार नाही.
म्हणून आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. समाजात सामाजिक विचार ठेवला पाहिजे. ही सर्वांना नम्र विनंती.
धन्यवाद.
आपला,
सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा