सरकार, आता थांबा… (एक वेदनादायी हाक)

अहो सरकार,

आज मी तळमळीने आणि मनाच्या खोल वेदनेतून बोलतो आहे…

ही जल, जमीन आणि जंगल — ही आमची नाहीत, पण आम्हीच त्यांचे खरे राखणदार आहोत. पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांची काळजी घेतली, मायेसारखी जपणूक केली. या निसर्गानेही आम्हाला कधीच कमी पडू दिले नाही. उपजीविकेसाठी फळे, फुले, औषधे, पाणी, धान्य — सर्व काही त्याने मुक्तपणे दिले.

या डोंगरांनी आम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. नद्या-नाल्यांनी पाणी दिले. जमिनीने अन्न दिले. कधीच त्यांनी आपल्याकडून काही मागितले नाही.

पाण्याने कधी पैसे मागितले का?

झाडांनी दिलेल्या श्वासासाठी भाडं मागितलं का?

जमिनीने कधी तक्रार केली का की “माझ्यावर जखमा करू नका”?

नाही… कारण हा निसर्ग म्हणजेच खरी देवता आहे.

पण आज आपण काय करतोय?

झाडे तोडतोय, नद्या बुजवतोय, विहिरी गाडतोय, सुपीक जमीन नष्ट करतोय…

ज्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवले, त्यालाच आपण नष्ट करायला निघालो आहोत.

पूर्वी माळरानावर, डोंगरदऱ्यांत, खुल्या हवेत राहणारे आम्ही… आज उघडे पडलो आहोत.

पशु-पक्षी सैरभैर झालेत. त्यांची घरटी उद्ध्वस्त झालीत.

त्यांच्या संसाराचा चुराडा झाला आहे.

ते कुठे जातील? कसे जगतील?

माणसांच्या इमारती वाढत आहेत… पण निसर्ग कमी होत चाललाय.

हे आपल्याला दिसत नाही का?

एकेकाळी नाशिकची पंचवटी ही किती शांत, स्वच्छ आणि पवित्र होती!

ऋषी-मुनींनीही त्या भूमीचे महत्त्व सांगितले.

भगवान श्रीरामांनीही तेथे वास्तव्य केले.

सह्याद्रीच्या कुशीत अनेक पवित्र स्थळे फुलली.

पण आज…

त्याच पंचवटीचा ऱ्हास होत आहे.

झाडे तोडली जात आहेत, जंगलं नष्ट होत आहेत.

त्या जुन्या वृक्षांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार आपण करतो का?

जर आपण हा निसर्गच संपवणार असू,

तर आपला काळ फार दूर नाही…

आज मोठमोठ्या प्रकल्पांसाठी जमीन बळकावली जाते.

नद्या-नाले, शेतजमिनी तुडवल्या जातात.

पण जर हा निसर्गच उरला नाही तर आपण राहणार कुठे?

आज जगभर युद्ध सुरू आहेत.

तेल, गॅस यांचा तुटवडा जाणवतो आहे.

आणि शेवटी माणूस कुठे जातो?

गावाकडे… निसर्गाकडे…

कारण भारतीय संस्कृती ही मुळात ग्रामीण आणि निसर्गाशी जोडलेली आहे.

गावांनीच आपल्याला औषधे दिली, स्वच्छ हवा दिली, सुखी जीवन दिले.

पण आपण जर निसर्गाचा ऱ्हासच करत राहिलो,

तर उद्या हेच पशु-पक्षी आपल्यावर हल्ला करतील.

अन्न पिकणार नाही, पाणी मिळणार नाही, हवा शुद्ध राहणार नाही.

निसर्गाचे संतुलन बिघडले,

तर आपली धन-दौलत काहीच उपयोगी पडणार नाही

म्हणूनच आज मी सरकारला हात जोडून विनंती करतो.

आता थांबा…

सह्याद्री वाचवा, जंगल वाचवा, निसर्ग वाचवा. इमारतींचा अतिरेक थांबवा. निसर्गाचा समतोल राखा. नाहीतर येणाऱ्या दहा-पंधरा वर्षांत परिस्थिती इतकी भयानक होईल की परत फिरणे अशक्य होईल.

सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज