आंबे-करवंद घ्या
पूर्वी अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात मिळेल त्या जंगली साधनांचा आधार घेऊन माणसं आपला गुजराण करत असत.
आम्ही आठवी-नववीत शिकत असताना, सुट्टीच्या काळात शेतीची कामं करायचो. कुणाच्या भाताची कापणी, कुणाचं गवत कापणं, तर कुणाकडे मजुरीचं काम किंवा भाजीपाला विकणे अशा प्रकारे थोडेफार पैसे जमा करून शाळेचा खर्च हलका करायचो.
त्या वयात काहीच कळत नव्हतं. सुट्टी लागली की आम्ही मुलं विहिरीत, तळ्यात, नदीवर पोहायला जायचो. दिवसभर तिथेच खेकडे, मासे पकडायचे किंवा जंगलातील जे फळ मिळेल ते खायचो आणि थोडं घरी आणायचो.
जंगलाने आम्हाला खूप काही दिलं सरपण गोळा करणे, विविध फळं जमा करणे, औषधी वनस्पती… हे सगळं म्हणजे निसर्गाचं आमच्यावर उपकारच.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र बाळू जंगलात जाऊन कच्चे आंबे आणि करवंदे गोळा करायचो. सात-आठ किलो आंबे आणि तितकीच करवंदे गोळा करून शहरात विकायला जायचो.
कधी प्रवासासाठी पैसे नसले तर तीन-तीन तास पायी चालत जायचो. काखेत आंब्यांची पिशवी, डोक्यावर करवंदांची टोपली, पाण्याची बाटली आणि आजीने दिलेली भाकरी घेऊन आम्ही रस्त्याला लागायचो. कधी तळेगाव, तर कधी कर्जतला जाऊन विक्री करायचो.
एकदा तळेगावला गेलो होतो. गल्लीबोळात फिरत “आंबे घ्या, करवंद घ्या, गोड गोड मावा घ्या…” असा आवाज देत विक्री करत होतो. चालता चालता मुख्य रस्त्यावर आलो. रेल्वेजवळून जात असताना समोरून एक मोठी मालगाडी आली. मी ती पहिल्यांदाच पाहत होतो, त्यामुळे तिच्याकडेच बघत राहिलो.
“अरे बाळू बघ, मोठी गाडी आली!” असं म्हणत चालत होतो, पण लक्ष नव्हतं. अचानक रस्त्यातील दगडाला ठेस लागली आणि मी पडलो. करवंदांची टोपली खाली पडली. काही करवंद चेंबली, पण उरलेली पुन्हा गोळा करून आम्ही पुढे निघालो.
उन्हात फिरताना भूक लागायची. मग एखाद्या झाडाखाली बसून पाणी प्यायचं, भाकरी खायची आणि पुन्हा विक्री सुरू करायची.
काही ठिकाणी टपोरी मुलं आम्हाला बोलवायची आणि आमची करवंद फुकट खायची. भीतीमुळे आम्ही काही बोलत नव्हतो.
एकदा काही कुत्री आमच्या मागे लागली. आम्ही घाबरलो. पळणार इतक्यात एक माणूस म्हणाला, “पोरांनो, पळू नका, जागेवर थांबा.” आम्ही थांबलो. कुत्री थोडा वेळ बघून निघून गेली. तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला.
करवंद एक-दीड रुपयाला आणि आंबे दोन रुपयाला तीन-चार असे विकत होतो. असं करत करत सुमारे 25 ते 30 रुपये जमा झाले की आम्ही परतीच्या प्रवासाला निघायचो.
त्या वेळी एसटीचं तिकीट दोन-तीन रुपये होतं. पैसे मिळाले की पहिल्यांदा वडापावच्या गाडीवर जायचो. 50 पैशाचा वडापाव चार-पाच वडे खाऊन पोट भरायचो.
नंतर बाजारात जाऊन तंबाखू, चहाची पत्ती, गूळ, सुकट, बोंबील, बिस्किटं, खारी, लाडू असा 20-22 रुपयांचा बाजार घ्यायचो.
सगळं टोपलीत ठेवून एसटी स्टँडला जायचो. एसटीमध्ये बसणं म्हणजे त्या काळात मोठेपणाची भावना असायची.
गावी पोहोचायला उशीर झाला की आजी एसटीची वाट पाहत उभी असायची. एसटी आली की गावातील मुलं जमा व्हायची. आम्ही उतरल्यावर आजी त्या मुलांना बिस्किटं वाटायची.
तो काळ वेगळाच होता. दुःख होतं, पण त्यातही समाधान आणि आनंद होता.
अशा अनेक संकटांना तोंड देत, अतिशय दुर्गम भागात राहूनही आम्ही शिक्षण पूर्ण केलं. पहिल्याच प्रयत्नात MPSC परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्यासोबत माझा मित्र बाळू, लक्ष्मण आणि वस्तीगृहातील अनेक मुलं आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
आमच्या या यशामुळे मावळ तालुक्यातील तळपेवाडी गावातील जवळपास 40 मुलं शासन सेवेत आणि इतर क्षेत्रात कार्यरत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.
पश्चिम घाटातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड या भागातील अनेक कुटुंबांची हीच कथा आहे. हा माझा अनुभव असला तरी तो अनेकांचे वास्तव आहे.
आजच्या पिढीला सर्व सुविधा उपलब्ध आहेत आर्थिक स्थिती सुधारली आहे, वाहतूक व संपर्क सुलभ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळेचं नियोजन करून योग्य दिशेने प्रयत्न करावेत.
जर एक मार्ग सफल झाला नाही, तर दुसरा मार्ग निवडावा. जीवन आनंदी, समाधानी आणि यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावं.
आज आपल्या समाजात गिरणी कामगाराचा मुलगा, मेंढपाळाचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा अनेक जण मोठ्या पदावर पोहोचले आहेत. हे त्यांच्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीचं फळ आहे.
चला, आपणही आपल्या परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता, सकारात्मक दृष्टीने जीवन जगूया.
धन्यवाद!
आपला,
सुदाम मदगे किवळे (अंदर मावळ, पुणे)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा