मायाजाळ – नात्यांमधील अहंकार आणि स्वार्थाची हृदयस्पर्शी कथा

मित्रहो, माणूस माणसाच्या भल्यासाठी चांगल्या योजना आखतो आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व बाबींचा आधार घेऊन तो आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी झटत असतो.

ही एका कुटुंबाची हकीगत आहे…

एक चांगले कुटुंब होते. त्यांना एकुलता एक मुलगा शरद. शरद शिक्षण घेऊन मोठा झाला होता आणि एका चांगल्या खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे आई-वडिलांची इच्छा होती की शरदसाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहावी.

अखेर त्यांना सुषमा नावाची, शासन सेवेत उच्च पदावर काम करणारी मुलगी मिळाली. ती देखील एकुलती एक होती, आणि तिचे वडील नव्हते. शरद आणि सुषमा यांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला.

परंतु शरद खाजगी नोकरीत आणि सुषमा सरकारी सेवेत असल्यामुळे, शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांत तेही पंधरा-सोळा तासांच्या अंतरावर काम करत असल्यामुळे, त्यांना एकत्र राहणे शक्य होत नव्हते. शासनाच्या पती-पत्नी एकत्रिकरण धोरणाचा लाभही मिळू शकला नाही.

सुषमाला शरदच्या आई-वडिलांसोबत राहणे मनापासून पटत नव्हते, पण ती मनातील नाराजी दाबून ठेवत होती. नवीन संसार असल्यामुळे काही काळ तिने सुट्ट्या काढून एकत्र राहण्याचा प्रयत्न केला. पण एक दिवस तिने स्पष्टपणे शरदला सांगितले.

“मी तुझ्यासोबत राहायला आले आहे, तुझ्या आई-वडिलांसोबत नाही.”

हे ऐकून शरद हादरला. त्याने नकार दिला, तर सुषमा म्हणाली“ठीक आहे, तू तुझं बघ. मी माझ्या कामाला जाते.”

आणि ती दुसऱ्याच दिवशी नोकरीवर परत गेली.

शरद गप्प झाला. त्याला काही सुचत नव्हते. आई-वडिलांनी विचारल्यावर, शेवटी त्याने सर्व सांगितले. ते ऐकून आई म्हणाली “बाळा, एवढंच ना? आम्ही तुझ्या सुखासाठी तयार आहोत.”

वडीलही म्हणाले “तुझ्या आनंदासाठी आम्ही काहीही करू. गरज पडली तर आम्ही वृद्धाश्रमात जाऊ.”

आणि खरोखरच, शरदच्या आई-वडिलांनी वृद्धाश्रम गाठला…

सुषमाला ही गोष्ट कळताच ती आनंदाने शरदसोबत बोलू लागली. काही दिवसांनी ती सुट्टी घेऊन आली आणि दोघांचा संसार पुन्हा सुरू झाला.

काळ पुढे सरकत गेला. सुषमा आई होणार होती. बाळंतपणासाठी ती शरदच्या घरी आली. सुंदर मुलगा झाला. घरात आनंद पसरला.

परंतु पुन्हा तेच…

शरदचे आई-वडील तिथे राहू लागले ते सुषमाला खटकू लागले. शेवटी त्यांनी पुन्हा वृद्धाश्रम गाठला.

नातवाला जवळ असूनही त्यांनी त्याचे बालपण पाहू शकले नाही—ही वेदना त्यांना सतावत राहिली.

मुलगा मोठा झाला. चांगले शिक्षण घेतले, इंजिनियर झाला, एमटेक पूर्ण केले आणि परदेशात नोकरीला गेला. तिथेच त्याने एका परदेशी मुलीशी लग्न केले.

इकडे शरद आणि सुषमा रिटायर झाले. पण आयुष्यभर साचलेले वाद, अहंकार आणि दुरावा वाढतच गेला.

शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की दोघे वेगळे राहू लागले.

दरम्यान, शरदचे आई-वडील वारले…

मुलगा सचिन परदेशातून आला. त्याने वडिलांची अवस्था पाहिली एकाकी, खचलेले, दुःखी. त्याला सर्व कळले आणि तो व्यथित झाला.

वडील म्हणाले “बाळा, मी आयुष्यात खूप कमावलं, खूप दिलं… पण मला कधी सुख मिळालं नाही. तू मात्र आनंदी रहा.”

शेवटी सचिन परत गेला…

शरद अधिकच खचला. आजार, एकटेपणा आणि व्यसन यांत तो अडकत गेला. शेवटी काही गावकऱ्यांच्या सल्ल्याने तो दिंडीसोबत देवदर्शनाला गेला.

एक दिवस त्याने सुषमाला फोन केला, तर ती म्हणाली “परत घरी येऊ नको.”

आणि त्या शब्दांनी शरद पूर्णपणे तुटला…

दिंडी करता करता, देवदर्शनातच त्याचा शेवट झाला.

शेवटचा संदेश

मित्रहो, या कथेतून आपल्याला काय दिसते?

नाती होती… पण स्वार्थ जास्त होता.

प्रेम होते… पण अहंकार मोठा होता.

पैसा होता… पण सुख नव्हते.

ग्रामीण भागातील गरीब माणसं कमी साधनांतही एकमेकांना समजून घेतात, आधार देतात आणि आनंदाने जगतात. पण इथे सर्व काही असूनही, “मीपणा” आणि “अहंकार” यामुळे सर्व काही नष्ट झाले.

म्हणून एकच विनंती

जास्त अपेक्षा न ठेवता, एकमेकांना समजून घ्या.

आई-वडिलांचा आदर करा.

पती-पत्नीने एक विचाराने, प्रेमाने आणि सहानुभूतीने राहा.

यातच खरं सुख आहे.

धन्यवाद!

✍️ सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ, पुणे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज