पाहणी
धोंडू नावाचा एक कष्टकरी माणूस गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. आयुष्यातील अनेक संकटे, कर्जबाजारीपणा आणि परिस्थितीच्या ताणामुळे अखेर धोंडू आणि त्याच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडते. त्या घटनेनंतर त्याचा मुलगा सुरेश याच्या आयुष्यात संघर्षाची खरी सुरुवात होते.
सुरेश शिक्षण घेतो, नोकरीच्या शोधात भटकतो; परंतु त्याला कुठेही स्थिर नोकरी मिळत नाही. अशातच तालुक्याच्या ठिकाणी त्याची एका आपतग्रस्त मुलीशी ओळख होते. ती मुलगी घरातून पळून आलेली असते आणि दोघांमध्ये ओळख वाढत जाऊन ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचा निर्धार करतात.
नोकरी मिळत नसल्यामुळे सुरेश शेवटी आपल्या गावी परत येऊन शेती करण्याचा निर्णय घेतो. मेहनतीने शेती करत असताना गावातील लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि पुढे तो गावचा सरपंच म्हणून निवडून येतो.
सरपंच झाल्यानंतर सुरेश प्रामाणिकपणे काम करू लागतो. गावात कोणी चोरीने लाकूडतोड करत असेल, सरकारी मालमत्तेचे नुकसान करत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर काम करत असेल तर तो लगेच पोलीस तक्रार करतो. त्यामुळे गावातील काही गावगुंड आणि राजकीय स्वार्थी मंडळी त्याच्यावर नाराज होतात आणि त्याला सतत त्रास देऊ लागतात.
दरम्यान, सुरेशसोबत लग्न करून आलेल्या त्या मुलीची आई तिला शोधत शोधत शेवटी सुरेशच्या गावी येते. पोलीस तक्रार झाल्यामुळे पोलीसही गावात येतात आणि चौकशी सुरू होते. वातावरण तणावपूर्ण बनते. परंतु वाद वाढण्याआधीच ती मुलगी स्वतः पुढे येते आणि संपूर्ण सत्य परिस्थिती सांगते.
ती स्पष्टपणे सांगते की तिने स्वतःच्या इच्छेने सुरेशशी लग्न केले आहे आणि आता ती त्याच्यासोबतच आयुष्य जगणार आहे. तिच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे प्रकरण शांत होते. तिच्या आईलाही शेवटी माघार घ्यावी लागते आणि पोलीसही परत जातात.
सुरेश आणि त्याची पत्नी दोघांनाही समाजकार्याची आवड असते. त्यामुळे ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करू लागतात. “पाणी वाचवा”, “झाडे लावा”, “निसर्गाची जपणूक करा”, “शेती करा आणि शेतीपूरक उद्योग सुरू करा” अशा विषयांवर ते लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या या कामामुळे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढू लागते.
परंतु त्यांच्या प्रामाणिक कामामुळे काही राजकीय स्वार्थी मंडळी त्यांच्यावर अजूनच दबाव आणू लागतात. तरीसुद्धा सुरेश आणि त्याची पत्नी आपले काम सुरूच ठेवतात. त्यांच्या समाजसेवेची दखल घेत तहसीलदार कार्यालयाकडून त्यांचा “उत्कृष्ट समाजसेवक” आणि “जागृत व सुशिक्षित समाजसेवक” म्हणून सत्कारही केला जातो.
एके रात्री मोठ्या राजकीय नेत्याची सागाच्या लाकडांनी भरलेली गाडी जंगलातून चोरीने जात असताना सुरेश तिला पकडतो आणि लगेच पोलिसांना माहिती देतो. पण त्या घटनेनंतर त्याच रात्री गावातील काही गुंड त्याच्यावर हल्ला करतात. त्याला गंभीर मारहाण होते आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्याची पत्नीही या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरी जाते.
या प्रसंगातून एक कठोर वास्तव समोर येते—पैशावाल्या आणि सत्ताधाऱ्यांसमोर गरीब आणि प्रामाणिक माणसाचे काही चालत नाही. जो सत्याच्या बाजूने उभा राहतो त्यालाच सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो.
काही दिवसांनी सुरेश बरा होऊन घरी परततो. मात्र या सगळ्या अनुभवांमुळे तो सरपंच पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो. “मला पद नको, सत्ता नको; आमची शेती आणि समाजसेवा हाच आमचा खरा मार्ग,” असे म्हणत तो पुन्हा आपल्या साध्या जीवनाकडे वळतो आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत राहतो.
मित्रहो, या “पाहणी” कथेतून गावातील राजकीय स्वार्थ, गुंडगिरी आणि विघातक प्रवृत्तीमुळे एखाद्या कुटुंबावर कशी कठीण परिस्थिती येऊ शकते हे स्पष्ट दिसून येते. आजच्या समाजात सत्य आणि प्रामाणिकपणाने जगणे अनेकदा कठीण झाले आहे. चोर आणि स्वार्थी लोक अधिक बलवान होताना दिसतात, तर खरे आणि प्रामाणिक लोक अनेकदा पराभूत होतात. खरा समाजसेवक होणे आजच्या काळात किती अवघड झाले आहे, हे या कथेतून प्रकर्षाने जाणवते.
धन्यवाद.
आपला
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा