सांभाळून रे
काही शब्द इतके मार्मिक असतात की ते कमी बोलता बरंच काही सांगून जातात. “अभ्यास कर”, “मेहनत कर”, “खरं बोल”, “सुखी राहा”, “घाबरू नको”, “जसं आहे तसं समाधानी व निरोगी राहा”, “उगाच वाद नको”, “ताण कशाला घेतोस?”, “मोठ्यांचा आदर कर”, “गरिबाला मदत कर”, “पाणी-अन्न दे”, “बाहेर गेलास तर सांभाळून राहा रे”, “मुक्या प्राण्यांवर दया कर”, “भजन कर, देवाचं नामस्मरण घे बाळा” असा मोठ्यांचा आपल्या लेकरांना नेहमीच सल्ला असतो.
आम्ही लहान होतो तेव्हा उडानटप्पू, भिल्लरी, हातात काठी, कधी दगड-गोटे… मग काय, एका झाडावर दगड टाक, दुसऱ्या झाडावर मार, कधी सरडा मार, तर कधी आंबा पाड! सुसाट धावत सुटायचो.
घरच्यांना काळजी वाटायची“पोरं कुठं गेली, काय करत असतील?” कधी तळ्यात उड्या, कधी विहिरीत पोहायला, तर कधी शिकारीच्या मागे. या सगळ्यात कधी एखादी घटना घडायची, पण तेव्हा त्याची फारशी फिकीर नसायची.
पण काही वेळा अशाच निष्काळजीपणामुळे गंभीर प्रसंग घडतात. सुट्टी लागली की मुलं तळ्यात, नदीत पोहायला जातात आणि दुर्दैवाने काही मुलं बुडून मृत्युमुखी पडतात.
मुलांना त्या वेळी त्याचं गांभीर्य कळत नाही; पण त्याचा परिणाम खूप भयंकर होतो. म्हणूनच मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं ही मोठ्यांची जबाबदारी आहे. मुलांना पूर्णपणे मोकळं सोडणं कधी कधी घातक ठरू शकतं.
आजकाल मुलं मोठ्या शहरात, कॉलेजमध्ये किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहतात. आई-वडील “सगळं ठीक आहे” असं मानतात, पण संगतीचा परिणाम कधी कधी चुकीच्या दिशेने नेतो. नकळत काही गोष्टी घडतात आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात.
त्यामुळे प्रत्येक क्षणी जागरूक राहणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे हाच या संदेशाचा गाभा आहे.
आजच्या काळात प्रचंड स्पर्धा आहे. नोकऱ्या कमी, अपेक्षा जास्त. कोणी व्यवसाय करतो, कोणी नोकरी शोधतो. परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारलेली असली तरी मुलामुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यांची खरी परिस्थिती त्यांनाच कळत नाही, पण आई-वडील मात्र काळजीत असतात.
त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन, परिस्थितीत समाधान मानत आनंदी जीवन जगणं महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “सांभाळून राहणं”.
समाज खूप पुढे गेला आहे, पण माणसांमधील अंतर वाढलं आहे. विचारांमध्ये, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर बदल झाले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे संशय आणि हरवलेला विश्वास. नकारात्मक विचारांनी माणूस पोखरला जातो आहे.
हल्लीची पिढी वडीलधाऱ्यांचं ऐकत नाही, आणि काही मुलं व्यसनाधीन होत आहेत ही चिंतेची बाब आहे.
पूर्वी गुरुजींचा आणि पालकांचा शब्द अंतिम मानला जायचा; आज ती परिस्थिती राहिलेली नाही. एखाद्या गल्लीमध्ये लहान मुलं खेळत असताना त्यांना चांगला सल्ला दिला तर उलट उद्धट उत्तर मिळतं किंवा दादागिरी दिसते. ही सामाजिक बदलाची दिशा चिंताजनक आहे.
आजचं जलद जीवन, वाढलेलं कम्युनिकेशन, सततचे वाद-प्रतिवाद आणि सोशल मीडियाचा प्रभाव जसं की इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप यामुळे मुलं मोबाईलमध्येच गुंतून गेली आहेत. सामाजिक आणि भावनिक नात्यांपासून ती दूर जात असल्याचं जाणवतं.
हे सर्व अनुभव आपण पाहतो, वाचतो, ऐकतो. त्यामुळे समाजाच्या ऐक्यासाठी आणि सर्वांच्या हितासाठी हा छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न आहे
जीवनात कितीही बदल झाले तरी, “सांभाळून राहा” हा सल्ला कधीही जुना होत नाही.
धन्यवाद!
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा