वेदना
भगवान श्रीराम यांचे रामायण आपल्याला माहित आहे, आणि ज्ञातही आहे काय झालं, कसं घडलं, कशामुळे घडलं आणि काही असूनही असं का घडलं?
हे क्षत्रिय लोक म्हणजे आपलेच म्हणा. शबरी, भिल्ल, वनवासी सर्वांनी भगवान श्रीराम यांच्या वनवासात साथ दिली.
पण एखाद्या पट्टराणीने दिलेल्या शब्दामुळे आणि स्वार्थामुळे माणूस किती लाचार व्हावा? किती आज्ञा पाळाव्या? किती बंधुप्रेम ठेवावं? समाजासाठी काय करावं?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथेमध्ये दडलेली आहेत.
दशरथ राजाला श्रावणबाळाच्या घटनेनंतर मिळालेला शाप तिथून या वेदनेची सुरुवात झाली. पुढे पूजा-अर्चा करून भगवान जन्माला आले, शिक्षण झाले, ज्ञान प्राप्त झाले सर्व काही उत्तम घडलं. पण एखाद्याला दुखावल्यानंतर होणारा पश्चाताप कायम राहतो, हेही यातून दिसून येतं.
खरं प्रेम केलं, आदर केला तर भरतासारखा भाऊ मिळतो, आणि जीवाला जीव देणारा लक्ष्मण भेटतो.
सीता ही जनकाला मिळालेली कन्या तिच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण शेवटी भगवान श्रीराम यांनीच ते कार्य पूर्ण केलं.
भगवंत असूनही भगवान श्रीराम यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या हे फक्त त्यांनाच ठाऊक. ते क्षणात सर्व काही करू शकत होते, पण त्यांनी समाजाला संदेश द्यायचा होता. म्हणूनच रामायण घडलं समाजहितासाठी.
अहिल्याची कथा आपणास ज्ञात आहे.इंद्राने रूप बदलून केलेली फसवणूक, ऋषींचा शाप आणि नंतर भगवान श्रीराम यांनी केलेला तिचा उद्धार. तसेच कबंध राक्षसही श्रापामुळे त्या रूपात होता. त्याच्या मुक्तीतूनही एक संदेश मिळतो.
पुढे वानरराज वाली आणि सुग्रीव यांचं भांडण, तसेच रावण आणि विभीषण यांच्यातील मतभेद हे सर्व समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आहे.
परस्त्रीहरण, अहंकार आणि अन्याय यांचा नाश करण्यासाठीच भगवान श्रीराम यांचा अवतार झाला. दशरथ राजाच्या तीन राण्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या सर्वांनी या कथेला आकार दिला.
घटना कशा घडतात, त्याचा पश्चाताप काय असतो, उपाय काय असतो, आणि त्यानंतर येणारे सुख-दुःख हे सर्व या ग्रंथातून शिकायला मिळतं. भक्ती, श्राप, स्वार्थ, गर्व, अहंकार, श्रद्धा, प्रेम आणि शेवटी माया या सगळ्यांचा संगम म्हणजे रामायण.
समाजहित, शिक्षण आणि दैवी शक्ती यांच्या माध्यमातून अनिष्ट गोष्टींचा नाश करण्याचं हे अमृत आहे. कोणीही माणूस इतका मोठा नाही की त्याने बदल करू शकत नाही. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी चांगलं आचरण ठेवणं हीच खरी शिकवण आहे.
भगवान श्रीराम यांच्या शिकवणीचं आचरण आपण केलं पाहिजे. म्हणूनच त्यांना कोटी कोटी प्रणाम केले जातात. दशरथ राजाला सर्व काही असूनही शेवटी कर्माचं फळ मिळालं, पण त्यांच्या पोटी भगवान श्रीराम आणि भरत सारखे पुत्र जन्माला आले हे त्यांचं भाग्य होतं.
इतकंच नाही तर भगवान शंकर सुद्धा भगवान श्रीराम यांची पूजा करत होते हेही याचं महत्त्व दाखवते.
आपण यातून काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे हाच या लेखाचा उद्देश.
धन्यवाद!
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा