गेला उडत… (एक सामाजिक वास्तव)
पूर्वी असे काही माणसं होती, ज्यांच्या चांगल्या गुणांचं नाव अजूनही जिवंत आहे. त्यांनी समाजासाठी क्रांती केली, समाजाचं हित पाहिलं. प्रसंगी रक्त सांडलं, पण निस्वार्थीपणे लढत राहिले.
सामाजिक, आर्थिक आणि माणुसकीची व्यापक मानसिकता जपण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं.
त्यांच्या कार्याबद्दल ऐकलं, वाचलं की ते आपल्याला एक दिशा देणारं ठरतं. म्हणून त्यांच्या कार्याला करावा तेवढा सलाम कमीच आहे.
आपल्या गावातही अशी माणसं होऊन गेली. एक पेटी मास्तर होता चांगला गायचा, सुंदर भजन म्हणायचा. त्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न व्हायचं. त्याचबरोबर तो एक शिक्षक होता,आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील होता.
पुढे गावचा पोलीस पाटील, सरपंच म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. तो एक आदर्श, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व होता. त्याच्या शब्दांना धार होती; त्याचं बोलणं ऐकलं की माणूस विचार करायला भाग पडे.
अशा अनेक व्यक्ती आपण आपल्या परिसरात पाहिल्या आहेत. कोणी कुस्तीगीर, कोणी नाटककार, कोणी शिंपी, कुंभार, चांभार, तर कोणी व्यापारी किंवा दुकानदार. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समाजासाठी काहीतरी दिलं.
आपल्या समाजातील राघोजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. सतू मराडे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अशी अनेक बंडखोर मंडळी होती. मावळातील आमचे आजोबा तुकाराम तळपे यांचं नावही यामध्ये अभिमानाने घेतलं जातं.
या पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम केलं, समाजाला दिशा दिली. पण आज परिस्थिती वेगळी दिसते.
आज काल-परवा जन्मलेला गावातील शेंबडा पोरगा मिशी फिरवतो, एखादी दोन सिगारेटची नळकांडी फुकतो, एखादी क्वार्टर पितो. आणि गावभर फिरतो.
चौकाचौकात उभा राहून स्वतःलाच मोठं समजतो “मी म्हणजे मीच आहे, मीच इंद्र, मीच भगवान, माझ्यासारखं कोणी नाही. मी जे करीन तेच समाज करेल, मी जे सांगेल तेच घरचे करतील.”
अशा आविर्भावात तो फिरतो आणि समाजालाच चुकीच्या दिशेने नेत आहे. त्याच्यापुढे काही सांगायला गेलं, मोठ्यांनी मार्गदर्शन केलं तर तो म्हणतो “गेला उडत… गेला चुलीत… मला काही सांगायचं नाही!”
अशा सामाजिक स्थितीत प्रश्न पडतो आता कोण बोलणार? कशाला बोलणार?
पण इथेच आपण सावध झालं पाहिजे.
आपण थोरांमोठ्याचा आदर ठेवला पाहिजे. त्यांना मान-सन्मान दिला पाहिजे. त्यांचं ऐकलं पाहिजे. समाजहिताचा विचार केला पाहिजे. गुरुजनांचे, आई-वडिलांचे दोन शब्द ऐकून घेण्याची ताकद ठेवली पाहिजे. आणि ते वर्तनात आणून स्वतःमध्ये योग्य तो बदल घडवला पाहिजे.
पुढील भविष्य चांगल्या विचारांनी आणि चांगल्या आचारांनी घडवायचं असेल, तर ही जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्येच खरी माणुसकी आहे, यामध्येच प्रेम आहे, आपुलकी आहे आणि याच प्रक्रियेतून एक सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडू शकतं.
धन्यवाद
आपला
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा