ग्रामीण जीवनाचे फिरते चक्र

आज गावाकडच्या जीवनात वर्षभर एक वेगळाच ताल दिसतो. नित्याची कामं, शेती, सण-उत्सव आणि माणुसकी यांचं एक सुंदर चक्र सतत फिरत असतं.

आता धार्मिक लग्नकार्य, जत्रा मोठ्या प्रमाणात होत असतात. काही महिन्यापूर्वी काढलेलं भात किंवा इतर धान्य दळून, कांडून कनगुलीमध्ये तर तट्ट्याने केलेले धान्य साठवण्याचे गोडाऊन दाराच्या अंगणामध्ये ठेवले जातात. हे साठ्याची वखर अंगणातच असते. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगणातच माणसं झोपतात. त्या अंगणातच गप्पा, भेटीगाठी आणि नात्यांची ऊब जपली जाते.

काही दिवसानंतर ही धार्मिक कार्य संपतात. एका बाजूला गुराढोरांसाठी वैरण साठवण्याची कामं चालू होतात, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यासाठी लाकूडफाटा जमा करणे सुरू असतं. त्याचबरोबर शेतात असलेला घेवडा, मसूर व हरभरा काढण्याची लगबग देखील चालू असते.

या काळात माणसं थोडी मोकळी असतात, त्यामुळे गावोगावी येणं-जाणं वाढतं. नातलगांच्या कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांना भेटतात. या नात्यांमध्ये माणसं आपली माणुसकी जपतात आणि आपुलकीने घरादारी उठबस करतात.

हे तात्पुरतं सुख असलं तरी आयुष्यात बरंच काही देऊन जातं.

यानंतर भाजणीचे दिवस येतात. मग गवत राब जमा करणे, पेरणीसाठी नांगरलेल्या भातशेतीमध्ये आवश्यक तेवढं जागा तयार करणे, वरच्या ढेकळ्या फोडून दाढ तयार करणे अशी कामं सुरू होतात. भाजणीसाठी माणसाची धावपळ सुरू होते आणि ती आपल्याला करावीच लागते. हे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे.

पेरणीसाठी लागणारे बी-बियाणं जमा करणं, त्यावर अभ्यास करणं ही कामं चालू असतात. पुढेमागे पावसाचा थोडा इशारा आला की मग देव-देवस्किला दिला जाणारा कोंबडा साथ म्हणून करावी लागते. मोठ्या लोकांचा सल्ला घेऊन भाताच्या पेरणीची गडबड सुरू होते.

पावसाळा वेळेत आला तर शेतकरी सुखावतो. धाड उगवायला सुरुवात होते. शेतकरी मग शेतात पाणी कसं साठून राहील याची काळजी घेतो. बांध फुटला असेल तर तो बंद केला जातो. संपूर्ण शेतात पाणी मुरल्यानंतर लावणीची तयारी सुरू होते.

साधारणपणे जून अखेर ते जुलैच्या सुरुवातीला भाताची लावणी केली जाते. यासाठी बैल आणि आऊत द्वारे चिखल केला जातो, तर काही जण ट्रॅक्टरने चिखल करतात. त्यानंतर एकमेकांच्या साथीने भलर पद्धतीने भाताची लावणी केली जाते.

लावणीच्या आधी घराच्या परसामध्येही बाया मिरच्या, काकड्या, हळद, रताळी यांची पेरणी छोट्या जागांवर करतात.

लावणी झाल्यावर पावसाचा मध्य येतो. या काळात मासे, खेकडे भरपूर मिळतात. काही दिवसांनी शेतात गवत व इतर तृण वाढतात. मग त्यासाठी निंदनी करावी लागते. निंदनी म्हणजे नको असलेलं गवत काढून टाकणं, ज्यामुळे भात एकसारखा वाढत राहतो.

पावसाळ्याचे दिवस खाण्यापिण्याचे आणि आनंदाचे असतात. एखादा गुराखी गुरं घेऊन माळावर आरामात बसतो. गुरं एका जागी चरतात आणि पोटभर चरून  घरी येतात. दूध देणाऱ्या गाई-म्हशी देखील या काळात जास्त दूध देतात.

यानंतर सणासुदीची सुरुवात होते. नागपंचमी, गणपती, बैलपोळा, दसरा आणि दिवाळी हे सण येतात. शेतकरी आपल्या शेताकडे आणि गुराढोरांकडे पाहून सणाचा आनंद घेतो.

दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान भात पूर्ण तयार होतो आणि कापणी सुरू होते. कापणीच्या वेळीही माणसं एकमेकांच्या शेतात जाऊन काम करतात आणि मदत करतात.

भात कापणी झाल्यानंतर आवश्यक असेल तेवढा भात शेतकरी लगेच झोडून घेतो. जर गरज नसेल तर तो उडवी लावून ठेवला जातो.

सर्व काम झाल्यानंतर साधारण दिवाळीनंतर गडीमाणसं घेऊन त्यांना कोंबड्या, दारू आणि पार्टी देऊन भात झोडणीसाठी गावकरी एकमेकांना मदत करतात. 

त्यानंतर भात भरडणी आणि साठा करण्याचं काम होतं. अशा प्रकारे शेतकरी वर्षाचा कार्यक्रम नेमून दिलेल्या दिवसांप्रमाणे पार पाडत असतो.

यानंतर पुन्हा फिरत्या चक्राप्रमाणे गावाच्या जत्रा, लग्नकार्य सुरू होतात आणि माणसं पुन्हा एकमेकांना भेटत राहतात.

हे सर्व खूप अप्रूपचं आहे. सुख-दुःखामध्ये माणसं एकमेकांना साथ देतात. ही ग्रामीण संस्कृती आणि राहणीमान शहरांमध्ये क्वचितच दिसते.

मदत करण्याची वृत्ती ही ग्रामीण संस्कृतीची खास ओळख आहे. एखाद्याची पडवी बांधायची असेल किंवा एखाद्याचं घर बांधून द्यायचं असेल तर आजूबाजूची चार-पाच मंडळी मदतीला धावून येतात.

हेच खरं जीवन आहे.

ग्रामीण अस्तित्व टिकवून ठेवणारी ही माणुसकी आहे.

पैशापेक्षा माणसं मोठी असतात हे वास्तव दाखवून देणाऱ्या या ग्रामीण जीवनाला माझा सलाम आहे.

माझा सलाम आहे.

धन्यवाद.

आपला

सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज