हृदयाचा टाहो
दुर्गम भागात आजही अशी अनेक गावं आहेत, जिथे गाडी पकडण्यासाठी लोकांना दहा-पंधरा किलोमीटर पायी चालत जावं लागतं.
दूध द्यायचं असो, मुलांना शाळेत सोडायचं असो, एखाद्याला दवाखान्यात न्यायचं असो किंवा बाळंतपणाची वेळ असो प्रत्येक गोष्ट ही संघर्षाचीच असते.
कधी कधी घरात भाकरीचा तुकडा असतो, पण त्याला चटणी नसते; कालवण तर दूरच राहिलं. संध्याकाळी काय शिजवायचं हा रोजचा प्रश्न असतो. जंगलातून मिळेल ते कधी खेकडे, कधी एखादी भाजी त्यावरच दिवस ढकलायचे. पाण्यासाठी तर तीन-चार कोस पायी जावं लागतं. त्या पाण्यावरच संपूर्ण दिवसाचा संसार उभा असतो.
ही केवळ कल्पना नाही; हे वास्तव आहे. असंच एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मन गहिवरून आलं. पडलेलं घर… ना व्यवस्थित छप्पर, ना अंगण. अंगणात दोन-तीन शेळ्या. आणि दारात बसलेली एक आजी तिची नजर हजारो शब्द बोलून जात होती.
माहिती घेतली तर कळलं, त्यांचा मुलगा शहरात कामासाठी बाहेर आहे. आणि ही म्हातारी जोडी डोंगरातल्या जुन्या पडवीच्या घरात आपलं उरलेलं आयुष्य घालवत आहे. त्यांचं म्हणणं ऐकून मन सुन्न झालं.
“मुलं सुखात राहिली, म्हणजे आम्हाला काही नको. आम्हाला देवाने खूप दिलंय एक शेळी आहे, एक गाय आहे, थोडं दूध मिळतं, शेतात भात येतो. फाटी, गवत, माती जमवतो. रोज शेकोटीवर जेवण बनवतो. पाणी दूर आहे, पण आम्ही आणतो. आम्ही शरीराने थकलोय… मनाने नाही.”
ही भावना खूप काही सांगून गेली. मनात एक विचित्र लहर उमटली. एवढ्या कठीण परिस्थितीतही दुःख दाबून, हसत जगणारी ही माणसं कितीतरी अब्जाधीशांपेक्षा श्रीमंत आहेत. कारण त्यांच्याकडे समाधान आहे, प्रेम आहे आणि मोठं मन आहे.
त्यांना फार काही नको असतं. फक्त एवढीच अपेक्षा त्यांच्या नातवंडांनी दोन दिवस त्यांच्या दारात खेळावं, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळावं. इतकीच त्यांची माफक इच्छा.
आपण मात्र अशा माणसांकडे दुर्लक्ष करतो. त्यांना विसरणं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाला मुकणं होय. म्हणूनच या वास्तवाकडे आपण सगळ्यांनी एकदा तरी मनापासून पाहायला हवं, विचार करायला हवा.
सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा