जंगलातील आठवणी एक ग्रामीण अनुभव



काल गावच्या चावडीसमोरील झाडाच्या कठड्यावर आठ-दहा माणसं बसली होती. आदल्या रात्री लव्हऱ्या व कोकात्री (जंगली कोंबडा) यासाठी लावलेल्या फास्यात काही पडलंय का, हे पाहण्यासाठी सकाळीच मी आणि शांत्या तिकडे गेलो. तर भाताचं पळंज पूर्ण खाऊन हे जंगली चतुर पक्षी निघून गेले होते. 

मात्र दुसऱ्या एका सापळ्यात एक कोकात्री अडकली होती. ती पिशवीमध्ये टाकली. तरीही आमचं समाधान झालं नाही. म्हणून शांत्या आणि मी पडीक डोंगरातील ओढ्यावर गेलो आणि तिथं गिरणी दळू लागलो. (गिरणी म्हणजे खडकावर नारळाच्या कवट्या घासून आवाज करणे) हा आवाज ऐकून खेकडे बिळातून बाहेर येतात.

गिरणी दळताना दोन-चार खेकडे मिळाले; मात्र त्या आवाजाने आमच्या समोर एक मोठा साप येऊन उभा राहिला. त्याला बहुधा वाटलं असावं की बेडूकच आहे, म्हणून तो तिकडे आला असावा. आम्ही धूम ठोकली.

आम्ही पळालो. परत त्याच ओढ्याला एक साठलेलं पाण्याचं डबकं होतं. त्या डबक्यात मासे होते. मग काय, आम्ही लगेच आजूबाजूच्या जंगलातून गोळूचा पाला व माशांना झिंगवणारा जंगलातील पाला आणला. 

साठलेल्या पाण्याच्या डोहामध्ये पाला दगडावर वाटून टाकला. दुपारी ऊन पडलं आणि त्या पाल्याच्या नशेत काही माशांनी डोकी वर काढली. दगडाच्या कपारीतून मासे बाहेर आले आणि आम्ही ते पकडले. एक-दोन किलो मासे मिळाले. ते घरी घेऊन आलो.

ओढ्यावर बसलेल्या लोकांचं बोलणं ऐकत होतो. 

“आता काय करायचं? शेतीवाडीचं काम झालं. लहान-मोठी मुलं शाळेत जातात, काही कामाला जातात. आपण जुनी जाणती लोक गुरंढोरं, शेळ्या, म्हशी सांभाळायच्या; त्यांना वैरण-पाला आणायचा; पाणी भरायचं; मोकळ्या माळावर गाई-म्हशी, बैल, शेळ्या सोडायच्या. दुपारी पडवीत आडवं पडायचं. एवढाच काय तो धंदा.” असा संवाद चालू होता.

त्यावर एक जण म्हणाला, 

“अरे, याच्यातून काय आपलं भागत नाही. आपल्या वडिलांप्रमाणे जंगलातील मजा, शिकार करायला पाहिजे.”

ठरलं. संभा, धोंडू, नामा, रामा, कुंडल्या, मारत्या, दत्या, अंत्या, बाळ्या, सुध्या, लक्ष्या, सूर्या अशी मंडळी चर्चा करू लागली. 

“वरच्या डोंगराच्या पानवठ्यावर सकाळीच डुकराचा, सांबराचा माग लागला. आता ऊन पडलंय. जनावरं झाडाखाली पडून झोप घेतात आणि संध्याकाळी पाणी-चाऱ्यासाठी बाहेर पडतात,” असं एकाने सांगितलं.

काहींनी हत्यारे घेतली, काहींनी वाघुरी घेतल्या, काहींनी कुऱ्हाड, कोयता, काठी घेतली. गावातील इतर मंडळींनाही समजलं आणि शिकारीपूर्वी सगळे एका ठिकाणी जमा झाले.

काहींना पुढच्या पॉईंटला पाठवलं, काहींना वाघुरीवर ठेवलं. पंधरा-वीस मंडळी जंगलात खोड काढण्यासाठी आत घुसली. त्यांच्या मागे दहा-बारा कुत्री होती. दाट जंगल, बारीक-सारीक खुरपाड, दगड, मोठमोठी झाडं, भरगच्च गवतातून मंडळी “हुर्र-हर्र” करत पुढे सरकत होती. दगड-गोट्यांनी जंगल पिंजून काढलं.

अचानक घनदाट जंगलातून मोठा डुरकल्या सारखा आवाज आला मोठ्या डुकराचा आणि त्याच्या कळपाचा. कुत्री भुंकू लागली. शिकाऱ्यांनी आवाज केला, “उठलं रे! डुकरे उठली! आता सोडू नका!” सर्व मंडळी सावध झाली.

मी नवीन होतो. एका जाणकार माणसाने मला सांगितलं, 

“सुध्या, तू बाहेरच्या वाटेवर बस. एखादं जनावर बाहेर आलं तर मोठ्याने आवाज दे.” 

मी बसलो. इतक्यात दोन डुकरं माझ्यासमोर आली. ती गुरगुरू लागली. मी लगेच आवाज दिला. पारध्याच्या दोन-तीन कुत्र्यांनी त्यांच्या मागे धाव घेतली.

शेवटी काही डुकरे दुसऱ्या दरीतील घनदाट जंगलात पळून गेली. मात्र कळपातील दोन-चार डुकरे पुढेच गेली आणि नेमकं आमच्या अनुभवी सुऱ्या आणि वामन यांच्या वाघुरीत एक मोठा डुक्कर अडकला. मंडळींनी त्याला पकडून आणलं आणि कार्यक्रम फिट झाला.

सर्व मंडळी शांत झाली. गोंगाट थांबला. सन्नाटा पसरला. इकडून-तिकडून सगळे जमा झाले. पुढे काय झालं ते सांगण्याची गरज नाही. हा एक छंद, एक आठवणीतील प्रसंग.

बरीच जंगलातील प्राणी शेतीचं नुकसान करतात, आलेलं पीक खातात; म्हणून ग्रामीण भागातील परंपरेनुसार हे घडतं. जंगल त्यांचं, शेती आमची. तिथलं सर्व काही त्यांचं; आमचं आमचं. 

अशा विविध अनुभवांतून वेगळं जीवन, वेगळं वातावरण दिसतं. येथे कोणी कोणाचा वैरी नसतो. एकोप्याने, मिळून-मिसळून कार्यक्रम होतात.

धन्यवाद.

सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था