अंगारा बुकारा – अंधश्रद्धेवर आधारित हृदयस्पर्शी कथा | समाजासाठी जागृती
दामूचं कुटुंब गाव सोडून एमआयडीसी एरियामध्ये कामाला गेलं. त्याला एक मुलगी, एक छोटा मुलगा आणि बायको असं छोटंसं कुटुंब. एका लहानशा भाड्याच्या खोलीत ते राहू लागले.
दामूला फार मोठा पगार नव्हता; आठ-दहा हजार रुपयांची नोकरी. त्यात घरभाडं, मुलांचं शिक्षण, रोजचा खर्च आणि कधी वेळ मिळाला तर गावाकडच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना दोन पैसे मदत अशा तगड्या कसरतीत त्याचं आयुष्य चाललं होतं.
गावची जत्रा आली म्हणून दामू मुलाबाळांना घेऊन गावी आला. मुलं दिवसभर इकडे-तिकडे फिरायची. म्हातारी वारंवार सांगायची, “त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊ नका, तिथं जागा बरोबर नाही.
ओढ्याच्या विहिरीजवळ जाऊ नका.” पण लहान मुलं कधी बेडक्या मारायला, कधी चिंच पाडायला सकाळ, दुपार, संध्याकाळ तिकडे जायचीच.
असंच एक दिवस दामूचा छोटा मुलगा दुपारी एकटाच चिंचेच्या झाडाखाली गेला. तिथे त्याला कसला तरी आवाज आला. तो घाबरून पळत घरी आला. म्हातारीच्या मनात लगेच शंका आली “पोराला काहीतरी बाधा झाली. सटवाईने धरलं की भूत लागलं!” घरात धावाधाव सुरू झाली. दामू आणि त्याची बायको घाबरून गेले. मुलगा तापाने फणफणत होता. काय करावं, कुणाकडे जावं त्यांना काहीच सुचेना.
झाडपाला दिला, काढे दिले, देवदेव केले; पण ताप काही उतरला नाही. तरीही डॉक्टरांकडे जायची तयारी नव्हती. “देवऋषी दाखवू,” असा सल्ला झाला. दोन दिवस मुलगा अंथरुणावर पडूनच होता. शेवटी शेजारच्या गावात एक देवऋषी रहात होता त्याच्या अंगात देवी येते, असं म्हणायचे. म्हाताऱ्यांनी मुलाला त्याच्याकडे नेलं.
त्या बुवाने अंगारा दिला. विचारलं, “काय खाल्लं? कुठं गेला होता?” मग निष्कर्ष काढला “अमुक भाजी खाल्ली म्हणून, चिंचेच्या झाडाखाली गेल्यामुळे सटवाईनं पकडलं. अंगारा लावा, झाडपाला पाणी द्या पोर बरं होईल.”
म्हातारी समाधानानं घरी आले. अंगारा लावला. झाडपाला पाजला. रात्री मुलगा थोडा वेळ झोपला. पण अचानक ताप वाढला. तापाची आकडी आली. मुलाच्या अंगातला ताप टाळूमध्ये गेला होता.
इथे प्रश्न उभा राहतो जर अंगारा धुपारा, लिंबू-नारळ, झाडपाला यानं आजार बरे होत असतील, तर दवाखाने कशाला? डॉक्टर कशाला? औषधं कशाला?
आपला समाज अजूनही या जुन्या रूढी-परंपरांमध्ये अडकलेला आहे. आधुनिक युगात आपण सावध व्हायला नको का? साप चावला तर काही लोक मंदिरात बसवतात; पण विष अंगात पसरत जातं आणि माणूस मरतो. ही अंधश्रद्धा मोडली पाहिजे.
“अंगात आलं” म्हणजे देव आला का? हा पैसा कमावण्याचा उद्योग आहे. जर खरंच त्यांच्यात शक्ती असती, तर त्यांनी स्वतःच्या मुलांना दवाखान्यात का नेलं असतं? त्यांनी रातोरात इमारती का बांधल्या नसत्या? हे आपल्याला समजत नाही का?
ही फसवणूक आहे. भोंदूगिरी आहे. कोंबडे-बोकड देऊन आपणच आपलं नुकसान करून घेतो. कोंबडं खायचं असेल तर घरी करून खा; पण उगाच कोणाच्या नावानं देऊ नका.
कोणी दारात येतो, म्हणतो “तुमच्या घरात असं-तसं आहे, मला आत घ्या, मी सांगतो.” आपण साधी माणसं त्याला आत घेतो. तो घरच्यांची ओळख काढतो, स्वभाव समजून घेतो, आणि काही दिवसांनी त्याच माहितीचा वापर करून फसवतो. घरातील वस्तू, पैसे, दागिने कशानाकशा कारणाने काढून घेतो.
म्हणून आता सावध व्हा. मुखात रामनाम ठेवा, हातात काम ठेवा. प्रसंग आला तर डॉक्टर, वकील आणि तज्ञ लोकांशी संपर्क साधा. देवावर विश्वास ठेवा; पण अंधश्रद्धेला बळी पडू नका.
मुलांना चांगलं शिक्षण द्या, संस्कार द्या. चांगले विचार, चांगले आचार ठेवा. कोणाचं वाईट करू नका. पण जुन्या प्रथा-परंपरा आंधळेपणाने पाळू नका.
अंगारा बुकारा या प्रथेला आपण बळी पडतोय हे विसरलं पाहिजे. नाहीतर त्यात आपलंच नुकसान आहे. कितीतरी भामटे येतात आणि आपल्याला लुटून जातात.
या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे आपण नक्की बदल कराल, अशी मला खात्री आहे. आपण सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी राहा हीच प्रार्थना.
धन्यवाद.
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा