जळलेलं लाकूड – वृद्ध आई-वडिलांच्या वेदनांची हृदयस्पर्शी ग्रामीण कथा
तुक्याचं लग्न झालं आणि तुकाराम व त्याची बायको पारी मोठ्या आनंदाने संसार करू लागले. छोटंसं पण सुखानं भरलेलं त्यांचं घर होतं.
एक मुलगी आणि एक मुलगा दोघांमुळे घरात सतत किलबिलाट, हशा आणि उत्साह असायचा. जीवन अगदी भरून वाहत होतं. सुख, समाधान आणि माणुसकीने त्यांचं अंगण नेहमी गजबजलेलं असायचं.
तुक्याची परिस्थिती चांगली होती. कधी कोणतीच कमतरता भासली नाही. गावातील लोक आनंदाने त्याच्या दारात येऊन बसायचे. तुक्याच्या घरात आलेला माणूस चहा-पाणी घेतल्याशिवाय परत जात नसे.
दुसऱ्या गावची माणसंही इकडे-तिकडे जाताना तुक्याच्या दारातूनच जायची. कोणताही पाहुणा आला की तुका, पारी किंवा त्यांची मुलं आनंदाने विचारपूस करायची
“कुठल्या गावचे आहात? पाणी-सावनी घेऊन जा. थोडं बसा अंगणात.”
घरात चुलीवर कायम भाताचा टोप, बेसन किंवा कालवण तयार असायचंच. दोन माणसं आली तरी त्यांना भात, भाकरी, कधी दूध तर कधी कालवण घालून प्रेमाने जेवू घालायचे. ही त्यांची सवयच होती. त्यांच्या या उदार स्वभावामुळे देवानेही त्यांना कधी कमी पडू दिलं नाही.
काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. मुलीचं लग्न थाटामाटात केलं. चांगल्या शिक्षित घरात तिचं स्थळ लागलं. ती सासरी गेली. घर आता थोडंसं शांत झालं. ती वर्षातून एक-दोनदा आई-बापाला भेटायला यायची.
ती आली की म्हाताऱ्या आई-बापाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद खुलायचा. जावई आला की घरात कोंबड्या कापल्या जायच्या, पोळ्या-भाजी व्हायची, सगळं राजेशाही थाटात व्हायचं.
त्यांना एक मुलगाही होता. त्याच्यासाठी तालुक्यातील एका मुलीचं स्थळ आलं. दोघांचं प्रेम जडलं. घरदार, शेती, सगळं असूनही मुलगा त्या मुलीच्या प्रेमात इतका गुंतला की तिच्या हट्टापायी आई-वडिलांना सोडून तिच्याच घरी राहायला गेला.
घरभर अचानक शांतता पसरली. जणू काही भरलेलं आकाशच रिकामं झालं.
राजा दशरथाला जसा कैकयीने वर मागितला आणि त्याचं हृदय तुटलं, तशीच अवस्था तुक्याची झाली. लेकराच्या विरहाने त्याचं मन खचलं. शेवटी हे दुःख त्याला सहन झालं नाही. आणि एक दिवस तुकाराम या जगाला कायमचा रामराम करून गेला.
मुलगी दूर, मुलगा परक्या घरात… भरलेलं घर ओसाड झालं. पारी एकटी उरली. आनंदी संसाराला क्षणात गालबोट लागलं.
तुका गेल्यानंतर पारीच्या वेदना अजूनच वाढल्या.
“आता हे कशासाठी करायचं? कोणासाठी जगायचं?” हा प्रश्न तिला सतावत राहिला.
घराचे दरवाजे बंद व्हायची वेळ आली. ती दारात बसून कधी कधी वाट पाहायची
“माझा पोरगा येईल… माझी मुलगी येईल…”
पण दिवस गेले, महिने गेले. तिची दृष्टी कमी झाली. चालणं कठीण झालं. पाणी आणायलाही तिला त्रास होऊ लागला. एकेकाळी गजबजलेलं अंगण आता ओस पडलं होतं.
जशी जळलेल्या लाकडाची अवस्था होते. बाहेरून राख, आतून धगधगणारी वेदना तशीच अवस्था पारीची झाली.
तिने कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं. वाईट विचारही मनात आणला नव्हता. तरीही आयुष्याच्या शेवटी अशी वेळ तिच्यावर आली.
अंगणात बसून ती देवाला हाक मारायची.
“परमेश्वरा, मी काय वाईट केलं? कोणाला वाईट बोलले नाही, वाईट केलं नाही. तरी माझ्याभोवती हा वेढा का घातलास?”
काळानंतर ही गोष्ट तिच्या मुलीला कळली. पण तीही आपल्या संसारात गुंतलेली होती. मुलग्यालाही वेळ नव्हता.
आई एकटीच… दारात बसलेली… वाट पाहत.
कथेचा संदेश
ही कथा केवळ तुका आणि पारीची नाही, तर आजच्या अनेक घरांची वास्तवता आहे. आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत. जसं आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर जीव ओवाळून टाकला, तसं आपणही त्यांच्या वृद्धापकाळात दोन शब्द मायेचे बोलू या.
त्यांना संपत्ती नको, सोने-नाणी नकोत.
त्यांना हवे असतात फक्त
दोन शब्द… मायेचे… आधाराचे.
जळलेलं लाकूड जसं बाहेरून शांत दिसतं, पण आतून धगधगत असतं, तशीच अवस्था वृद्ध आई-वडिलांची असते. त्यांच्या मनातील वेदना आपण समजून घेतल्या पाहिजेत.
धन्यवाद.
सुदाम मदगे, (किवळे अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा