मुक्यांची कैफियत
एकदा एका ऋषींनी त्याला विचारले, “हे पाप का करतोस?”
वाल्या म्हणाला, “माझ्या बायको-मुलांसाठी.”
तेव्हा ऋषींनी शांतपणे विचारले, “जर तुला या पापाची शिक्षा झाली, तर तुझी बायको-मुलं त्या दुःखात सहभागी होतील का?”
वाल्या आत्मविश्वासाने म्हणाला, “नक्की होतील.”
ऋषींनी त्याला सांगितले, “ठीक आहे, वेळ आली तर अनुभव घे.” आणि ते पुढे निघून गेले.
संध्याकाळी घरी जाताना वाल्याच्या हाताला विंचू चावला. तो वेदनेने तडफडत घरी गेला आणि बायकोला म्हणाला,
“या वेदनेचा अर्धा भाग तू घे.”
बायको म्हणाली, “हे कसं शक्य आहे? तुझं दुःख तूच सहन कर.”
क्षणात वाल्याला त्या ऋषींचे शब्द आठवले. त्याला सत्य समजले. तो पुन्हा त्या ऋषींकडे गेला, रामनामाचा मंत्र घेतला आणि पुढे तोच वाल्या ‘महर्षी वाल्मिकी’ झाला.
आपण माणसं आहोत. पण माणसांइतकीच समज, प्रेम आणि निस्वार्थ साथ देणारे आपले खरे सोबती म्हणजे मुके प्राणी.
कुत्रा, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, मांजर, बैल, म्हैस, गाय, गाढव हे सर्व पाळीव प्राणी माणसाच्या सुख-दुःखाचा गाडा ओढतात. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची प्रगती ही या मुक्या प्राण्यांच्या साथीनेच झालेली आहे. हे अनेक शेतकरी नकळत कबूल करतात.
वाल्या कोळ्याने केलेल्या पापाची शिक्षा त्यालाच मिळाली; त्यात कुणी सहभागी झाले नाही. पण हे मुके प्राणी मात्र आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस काम करतात. मग आपण त्यांना प्रेम का देत नाही? त्यांना वेळेवर खाऊ का घालत नाही? त्यांना योग्य विश्रांती का देत नाही?
काही ठिकाणी आपण पाहतो
कोणी चाबूक मारतो, कोणी नाकात दोर घालतो, गाढवांवर अत्याचार होतात.
कुत्र्यांना मारले जाते.
गाय-म्हशी दूध देईपर्यंत खाऊ घालतात, नंतर त्यांना उपाशी ठेवतात.
हे किती क्रूर आहे! ज्यांच्यावर आपण जगतो, त्यांचाच आपण जीव घेतोय, हे आपल्याला कळत नाही का?
अलीकडे जुन्नर परिसरात अशी बातमी आली की गायीचं वासरू ठेवायचं, पण बैलाचं वासरू जंगलात किंवा माळावर सोडून द्यायचं. मग गिधाडं, कावळे येऊन जिवंतपणी त्याच्यावर तुटून पडतात.
हे किती विद्रूप चित्र आहे! तोच बैल मोठा होऊन काम करणार होता; पण उपयोग नाही म्हणून त्याला टाकून देणं हे अत्यंत वेदनादायक आहे.
मित्रांनो, असं करू नका. जमत नसेल तर त्यांना दुसऱ्याला दान करा, गोशाळेत ठेवा; पण कसाईकडे देऊ नका. या मुक्या प्राण्यांवर दया-माया करा.
कधी कधी अतिरेक झाला तर निसर्गही बदला घेतो. साप असो वा इतर प्राणी तेही माणसाचा अंत पाहतात. म्हणून त्यांना मायेने, प्रेमाने सांभाळा. त्यांच्या डोळ्यातील भावना ओळखा. कुत्रा असो, मांजर असो, गाय-म्हैस असो किंवा गाढव हे सर्व आपली संपत्ती आहेत.
त्यांच्याकडून काम घ्या, पण अतिरेक करू नका. त्यांनाही जीव आहे, हे लक्षात ठेवा. त्यांची सेवा करा निश्चितच आपलं जीवन उदार होईल.
नाहीतर वाल्यासारखंच आयुष्य राहील; पण वाल्यासारखं वाल्मिकी होण्यासाठी योग्य मार्ग स्वीकारावा लागतो.
धन्यवाद.
आपला
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा