पोटाची खळगी – पूर्वजांचा संघर्ष, कष्ट आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी कथा



पूर्वीच्या पिढ्यांचा विचार केला, तर किती पिढ्या आल्या आणि किती गेल्या हेच कळत नाही. अनेकांना शहर कसं असतं याची कल्पनाही नव्हती. 

त्यांचं अख्ख आयुष्य दगड-माती, शेतीची कामं, बांध घालणं, विहिरी खणणं, लाकूड-फाटा गोळा करणं, गुरंढोरं वळणं अशा कष्टांमध्येच गेलं. 

पण त्या काळातील अन्न कसदार, दमदार आणि चविष्ट होतं. आजही ७०-८० वर्षांचे अनेक ज्येष्ठ लोक तरुणांना लाजवतील इतकं काम करतात.

आज पैसा आला, गाड्या-घोडे आले; पण कसदार अन्न दूर झालं. भाजीपाला, दूध, दही, तूपही पूर्वीसारखं चवदार मिळत नाही. 

पूर्वी साधनसामग्री नव्हती, पण माणसं सुखी, समाधानी आणि आनंदी होती. “देवाने दिवस दाखवला” या भावनेतून मिळेल त्यात दिवस काढत, पोटाची खळगी भरत आणि आनंदाने जीवन जगत.

बालपणातील आठवण

लहानपणी आम्ही कोहिंडे येथील शाळेत शिकत होतो. त्या गावातील बबन मोहन मुंबईत काम करायचा. काम कसले तर मुंबईचा “मवाली”! 

त्यांची चार-पाच जणांची टोळी वेगवेगळ्या हेराफेरीच्या कामात असायची. एखादा पुरुष साडी नेसून मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना गंडवायचा.

यात्रेच्या वेळी ते गावाला आले की आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे बघतच राहायचो. सफेद पॅन्ट, कोट, टोपी, चष्मा आणि हातात टेपरेकॉर्डर थाटच वेगळा! 

आम्ही त्यांना “बबन दादा” म्हणायचो. ते आम्हाला चार-आठ आणे द्यायचे. त्या पैशात आम्ही दोन केळी घ्यायचो आणि सालीसकट खाऊन पोटाची खळगी भरायचो.

शहराकडे वाटचाल

शहरात काम मिळतं या आशेने खेड, आंबेगाव, मावळ, जुन्नर भागातील अनेक लोकांनी शेतीसोबत जोडधंदे सुरू केले.

काहींनी डब्याचा व्यवसाय सुरू केला

काही भाजी विकू लागले

काहींनी भांडी घासणं, स्वयंपाक करणं सुरू केलं

महिलांनी घरकाम, जेवण बनवण्याची कामं घेतली

मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ती कामं करत राहिले. काहींना नोकऱ्या लागल्या, काहींनी छोटे-मोठे धंदे सुरू केले. 

श्रीमंत श्रीमंतच राहिले; पण मध्यम आणि गरीब कुटुंबांनीही आर्थिक गणित जुळवायला सुरुवात केली.

संघर्षातून उभं राहिलेलं जीवन

हमाल, भाजीवाले, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या बाया, मालिश करणारे, सुतारकाम करणारे अशा असंख्य लोकांनी पुणे-मुंबई शहरात स्थायिक होऊन आयुष्य उभं केलं.

काहींनी छोट्या खोल्या घेतल्या

काहींनी इमारतीबाहेर झोपून दिवस काढले.

काही मंडळांच्या खोल्यांत राहिले

या प्रचंड कष्टांमुळे त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं. आजची नवी पिढी उभी आहे ती त्यांच्या त्यागावर.

नव्या पिढीसाठी संदेश

आजच्या मुलांना त्या कष्टांची पूर्ण जाणीव नाही. पण जर त्यांनी आपल्या पणजोबा-आजोबांनी सोसलेला संघर्ष जाणला, तर नक्कीच बदल घडेल. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा विचार केला, तर प्रेरणा मिळेल.

श्रीमंत असो वा गरीब आजचं स्थान हे त्यांच्या कष्ट, गुण आणि पूर्वजांच्या परिश्रमांमुळे आहे. तरुणांनीही त्याच नजरेने जगाकडे पाहावं. प्रामाणिकपणे कष्ट करून नोकरी किंवा व्यवसाय केला, तर नक्की यश मिळेल.

पोटाची खळगी भरण्यासाठी लागणाऱ्या गरजेपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी सुख आपल्या कुटुंबाला मिळेल याची खात्री आहे.

सुदाम मदगे, (किवळे, आंदर मावळ)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था