लहानपणाच्या आठवणी आणि खऱ्या देशसेवकांची ओळख



लहानपणी आजोबांच्या मागे मागे बिना चपलाच “टुना-टुना” उड्या मारत गावोगावी फिरणं, ते दिवस आजही डोळ्यांसमोर जिवंत आहेत. 

एखाद्या दुकानासमोर आजोबा मला बसवायचे आणि दुकानदार कागदात शेंगदाणे व गूळ द्यायचा. ते शेंगदाणे-गूळ म्हणजे जणू सोन्याहूनही मौल्यवान भेट असायची. ते खाताना जो आनंद मिळायचा, तो शब्दांत मांडणं कठीण आहे.

पण काळ बदलला, दिवस बदलले. पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत. पूर्वी आणि आताच्या जीवनशैलीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो.

पूर्वी गावामध्ये बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. समाजातील प्रत्येक घटकाला ठरावीक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. 

कोळी, ब्राह्मण, सावकार, मोची, शिंपी, सुतार, गवंडी, कामकरी, शेतकरी, दवंडीकार, पुजारी अशा विविध समाजघटकांनी आपापली कामे प्रामाणिकपणे पार पाडायची. 

त्या कामाचा मोबदला रोख पैशांत नव्हे, तर पिकलेल्या धान्याच्या स्वरूपात दिला जायचा. आजही ग्रामीण भागातील काही ठिकाणी या परंपरेचे अवशेष पाहायला मिळतात.

ग्रामीण भागाकडे पाहिलं तर आजही अनेक माणसं पोटापाण्यासाठी मिळेल ते काम आनंदाने करताना दिसतात. 

देशसेवा करणारा सैनिक, गावोगावी पत्र पोहोचवणारा पोस्टमन, आरोग्य सेविका, रस्त्यावर स्वच्छता करणारा सफाईगार, फुटपाथवर स्टूल टाकून कपडे शिवणारा शिंपी, इस्त्रीवाला, डबेवाला ही सगळी माणसं आपापल्या परीने समाजाचा कणा मजबूत करत असतात.

विशेष उल्लेख करावा लागेल तो डबेवाल्यांचा. डबेवाल्यांचं नियोजन इतकं अचूक असतं की अमेरिकन संशोधकांनाही त्याचे कोडे सोडवता आले नाही. 

प्रचंड गर्दीतून डोक्यावर डब्यांची पाटी घेऊन ठरावीक वेळेत ठरावीक साहेबाला डबा पोहोचवणं आणि पुन्हा तो रिकामा डबा त्याच्या घरी पोहोचवणं हे काही साधं काम नाही, ही खरी शिस्त आणि सेवा आहे.

दुसरीकडे, उच्च पदावरील अधिकारी, मंत्री, संत्री हे आरामदायी खुर्च्यांवर बसून काम करतात. मोठा पगार, ऐषआरामाचं जीवन त्यांना लाभतं. याच संदर्भात एक अनुभव आठवतो. 

उपाशीपोटी शेळ्या-म्हशी वळून, शेण काढून जीवन जगणारे आणि नव्याने निवडून गेलेले खासदार श्री रामदेव हे दिल्लीला गेले असता, त्यांनी एक प्रसंग पाहिला.

ते संसदभावनाकडे चालले असता त्यांना रस्त्यामध्ये एक मोटार कार दिसली. त्यामध्ये एका श्रीमंत माणसाचं कुत्रं एसी गाडीत बसलेलं होतं आणि थंड हवा खात होतं. 

खासदार रामदेव यांनी यापूर्वी कधीही असे दृश्य पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सहज आत मध्ये डोकावून पाहिले असता ते कुत्रं तेथून चाललेल्या खासदार रामदेव यांना म्हणालं.

माझ्याकडे बघ. मी एसी गाडीत बसून थंड हवा घेत आहे, आणि तू मात्र पायी पायी रणरणत्या उन्हात घाम पुशीत चालला आहे. माझं जेवण म्हणजे दररोज मच्छी मटन असतं. जे यापूर्वी तुला हे सुख कधीच मिळाले नाही. तुझ्यापेक्षा माझं जीवन किती आरामदायी आहे,” 

अशा आशयाचे शब्द ऐकून त्या खासदारांना समाजातील विषमतेची तीव्र जाणीव झाली. हा अनुभव त्यांनी संसदेमध्येही मांडला होता.

म्हणूनच, आपल्या देशात असलेली संपत्तीतील मतभिन्नता आणि जीवन जगण्याच्या पद्धतीतील तफावत स्पष्ट दिसते. 

जी माणसं कमी साधनांत समाधानी राहून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात, तीच खरी देशसेवा करत असतात.

गवंडी, शेतमजूर, चांभार, मांग, सुतार, कोळी, डबेवाला, सफाईगार, सैनिक, पोस्टमन, रुग्णसेविका, ग्रामीण भागातील शिक्षक, वाहनचालक, वनसंरक्षक, धरणावर ड्युटी करणारे कर्मचारी, ग्रामीण भागात वीजपुरवठा करणारे कर्मचारी ही सगळी माणसं कठीण परिस्थितीला सामोरं जात आपलं जीवन व्यतीत करतात. हेच खरे देशाचे कष्टकरी, हेच खरे देशसेवक.

त्यांच्या कर्तृत्वाला कितीही सलाम केला, तरी तो कमीच आहे. शासनाने या वर्गाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या अडचणी, वेदना समजून घेतल्या पाहिजेत. 

असं झालं, तर त्यांच्या कार्यात अधिक स्फूर्ती येईल आणि देशसेवा अधिक उज्ज्वल बनेल, यात शंका नाही.

धन्यवाद.

सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था