चहा पेक्षा किटली गरम
निवडणुकीची धावपळ सुरू झाली की काही सामाजिक कार्यकर्ते झोपेतून जागे होतात. जिकडे मिळेल तिकडे उमेदवारांच्या मागे पळू लागतात.
जिथे आपलं बस्तान बसेल तिथे बसतात, तर कधी मध्येच उठून दुसऱ्या ठिकाणी जायला कमी करत नाहीत. अशाच प्रकारचे अनुभव सध्या राजकीय नेत्यांना आणि उमेदवारांना येत आहेत.
“अरे हा काल त्या पक्षाचं काम करत होता, आज या पक्षात आला आणि इकडच्या-तिकडच्या बातम्या देत बसतो.”
कधी हे कार्यकर्ते हया वाडीत, कधी त्या गावात, कधी विरोधकांसोबत सुद्धा फिरतात; उमेदवार देखील त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जो मिळेल त्याला नमस्कार करतात, आणि अशा कार्यक्रमांमध्ये शक्यतो कोणाला नाराज करत नाहीत.
कोणाची आश्वासनं काय, कोणाचं योजना पत्र कसं – हे पाहून काही कार्यकर्ते आपली ‘चलाखी दाखवतात.
“पाच वर्षात ठरलेला कार्यक्रम असा असेल” आमचा उमेदवार असा विकास होणार, तसा विकास करणार असा देखील ते दावा करतात. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे.
गावोगावी, गल्लीबोळात फिरत असताना कोणी साड्या वाटतंय, कोणी पुस्तकं देतंय, कोणी कपडे देतोय, कोणी ब्लॅंकेट देतोय जसा काही महापौरच चाललाय! लोकही घेतात, कारण पाच वर्षातून एकदातरी काहीतरी मिळतं.
काही साहित्य, काही पैसे वाटप सर्रास होते. पण लोकांना माहीत नसतं की आज घेतलं तर पुढील पाच वर्षात पुन्हा काही मिळणार नाही. तरीपण निवडणुकीचा खर्च या भेटवस्तूंनी व्यावहारिक मर्यादेत ठेवला जातो, हे त्यांचे आर्थिक तज्ञ सांगून देतात.
कितीतरी कार्यकर्ते येतात. आणि ज्याच्या घरात जास्त मतदान आहे अशा मतदाराला “अरे मी हे करतो, मी उद्याच तुझं काम करून देतो, बघ फोन लावतोच…”
तात्या, नाना, भाऊसाहेब म्हणत आपल्या शंकररावाचं काम झालं पाहिजे म्हणून फोन करतात. कुणास ठाऊक नक्की कोणाला फोन करतात?
एकदा मीही तो आवाज ऐकून मनात विचार केला, हे शंकरराव कोण?
माहिती घेतली तर वरच्या वाडीत राहणारा शंकर. मोठी फॅमिली. साधारण वीस-बावीस मते त्याच्या घरात. म्हणून कार्यकर्त्यांनी त्याला “शंकरराव” बनवून टाकलं!
त्याच्याकडे २२–२५ मते आहेत म्हणून तो “शंकर” अचानक “शंकरराव” झाला.
त्याच्या वाडीत गाडी जाईल असा रस्ताही नव्हता. दोन दिवसात बैलगाडीचा रस्ता तयार झाला.
हा रस्ता शंकरसाठी नव्हता; उमेदवारांना जाण्यासाठी होता. पण दाखवला मात्र शंकररावाला “ही तुझ्या बैलगाडीची सोय”.
रातोरात रस्ता झाला, मंडळी येऊ लागली.
“लाईट देतो, पाणी देतो, सगळ्या योजना तुझ्या वाडीला आणतो…”
बकाबका आश्वासनं दिली गेली.
शंकररावही “हो, हो” करत बसला.
घरची माणसं म्हणाली,
“चांगल्या माणसाला मत देऊ, आपणही प्रयत्न करू.”
मतदान झालं.
निवडणूक झाली.
पण शंकररावाच्या वाडीतल्या आश्वासनातलं एकही काम पुढील पाच वर्षात झालं नाही.
उलट —
तात्पुरता रस्ता बुजून गेला,
पाण्याची लाईन तुटली,
आणि पूर्वीसारखंच शंकरराव पुन्हा डोक्यावर फाटी-काठी घेऊन पाणी वाहू लागला.
असंच चित्र आपल्याला प्रत्येक निवडणुकीत दिसतं.
स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली, पण तेच तेच आश्वासने, त्याच त्या योजना, तीच ती भाषणे…
कान किटले ऐकून अनेक पिढ्या गेल्या, पण अजूनही डोंगर-कपाऱ्यातून पाणी भरतोय; गुराढोरांना चारा नाही, शेतीला पाणी नाही.
किती सहन करायचं?
म्हणूनच म्हणतो —
चहा पेक्षा किटली गरम!
आपल्याला आवश्यक तेवढ्याच बाबींची मागणी केली पाहिजे.
आवश्यक गरजा तेवढ्या वस्तू मिळाल्या पाहिजेत.
कार्यकर्त्यांनीही त्या दिल्या पाहिजेत.
आमची मोठी मागणी नाही साहेब!
आम्हाला फक्त
मुलांना शिक्षण
आरोग्य
पाणी
रस्ता
लाईट
हेच आमचं जीवन.
आम्ही कष्ट करू आणि कष्टाचीच भाकरी खाऊ. पण मूलभूत सुविधा हव्यात.
म्हणून या ठिकाणी प्रबोधन होणं गरजेचं आहे.
धन्यवाद
सुदाम मदगे, (किवळे वडगाव मावळ)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा