अंधार
अहो, आता कुठेतरी गावाला, वाड्या-पाड्याला कच्चा रस्ता आला; एक-दोन बल्ब लागले; चार-पाच खांब उभे राहिले. नाहीतर आमचं आयुष्य आयुष्यभर अंधारातच गेलं असतं.
आम्ही जंगलात राहणारे, डोंगरदऱ्यांत वसलेले. आमच्या जमिनीतून, डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्याने नद्या भरल्या आणि तेच पाणी पुढे शहरांपर्यंत पोहोचून तुमचं जेवण झालं.
आम्ही झाडं जगवली, जंगलाचं रक्षण केलं. त्यामुळेच हवा मिळाली, जीवन मिळालं.
गावातली माणसं बॅटरी नसताना, त्या काळात खंदील घेऊन, रॉकेलच्या थेंबावर रात्री इकडे-तिकडे फिरायची. गोठ्यात, घरात साप फिरायचे; जंगलात जंगली जनावरं फिरायची; पण कसलीही भीती नव्हती. सर्व देवांवर विश्वास ठेवून मंडळी जगायची.
रात्रीच्या अंधारात जत्रेला जायचो, जीवनाचा आनंद घ्यायचो. आम्ही गरीब माणसं होतो, पण देशासाठी महान होतो. तरीसुद्धा आमची दखल कुणीच घेतली नाही.
आंध्रात एका मुलाने रॉकेलच्या बाटलीच्या उजेडात अभ्यास केला होता. तो दहावी पास झाला. देशाच्या सीमेवर सेवेसाठी, बॉर्डर प्रोटेक्शन फोर्समध्ये आमच्या तालुक्यातल्या तानाजी नावाच्या मुलाची निवड झाली.
आख्या गावात आनंद उसळला. “देशासाठी आपला मुलगा गेला” याचा अभिमान होता. तानाजी प्रामाणिकपणे काम करू लागला. देशसेवा करणे, पाण्याची किंमत ओळखणे, देशाचा अभिमान जपणे — हेच त्याचं स्वप्न होतं.
सेवा सुरू झाली. आई-वडील सणासुदीला, जत्रेला बोलवायचे; पण तान्याला कधीच जमलं नाही. वय झाल्यावर आई-वडिलांनी मुलगी पाहिली. फोटो पाहून लग्न ठरलं.
पूर्वी आजोबा-वडील मुलगी पाहायचे, मुलाला काहीच कळायचं नाही, आणि लग्न ठरायचं. त्या पद्धतीनुसार मे महिन्यात तान्या सुट्टीवर आला. लग्न जमलं.
त्याच्या लग्नाच्या वेळेस गावात लाईट आली होती. अख्खं गाव आनंदात होतं. गाण्याचं लग्न झालं. लग्नानंतर आख्खं गाव नाचलं, खाऊन-पिऊन दंग झालं.
आणि अचानक वायरलेस आला. देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. सुट्टीवर असलेल्या सर्व सैनिकांची सुट्टी रद्द झाली.
नवी नवरी घरात आली होती. पण नवरीपेक्षा देशसेवा महत्त्वाची मानून तान्याने बॉर्डरवर जाण्याचा निर्णय घेतला. तो जंगलात वाढलेला मुलगा होता.
आई-वडिलांच्या पाया पडला. बायकोच्या डोळ्यातले अश्रू पुसले. “मी जातो” म्हणत धडाक्याने निघून गेला.
तानाजी फौजेसोबत बॉर्डरवर पोहोचला. प्रचंड गोळीबार, गोंधळ, युद्ध सुरू होतं. तानाजी त्या ऑपरेशनमधील प्रमुख होता. न डगमगता, न घाबरता त्याने अतिशय धोकादायक ऑपरेशन स्वीकारलं.
जिथे तुफान फायरिंग सुरू होती, तिथे जीवाची पर्वा न करता त्याने पाच-पन्नास विरोधकांचा नायनाट केला. पण त्याच्यासोबतचे सैनिक जागोजागी पडले होते.
आणि अखेर विरोधकांकडून टाकलेला बॉम्ब गोळा तानाजीवर पडला. आमचा डोंगर-कापऱ्यात वाढलेला तान्या जमिनीखाली गेला.
अखेर त्याचा शेवट झाला. इकडे गावात एक महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. नवरी नवऱ्याची वाट पाहत होती.
देशाच्या संरक्षणासाठी आमच्या गावाचा तान्या गेला. आज गावात लाईट असूनसुद्धा पूर्ण अंधार आहे. दोन-तीन दिवस आम्ही चुलीही पेटवल्या नाहीत.
किती सत्कार झाले, किती पैसे मिळाले — त्याचा काय उपयोग? आमचा मुलगा गेला, हे दुःख कोण भरून काढणार?
म्हणून मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान महोदय, विनंती आहे — देशसेवा करणाऱ्या अशा कुटुंबांसाठी काहीतरी विशेष योजना करा. साधा माणूस आहे, साध्या भाषेत बोलतोय.
ताप एवढाच आहे की, देशाची सेवा करणारी आमची माणसं जंगलात वाढली. देशासाठी पाणी, जमीन, जंगल आम्ही जपलं. पण आमचं संरक्षण कोणीच केलं नाही.
हीच आमची शोकांतिका आहे.
लक्ष द्या. सावध रहा.
संपूर्ण देशाने सावध राहायला पाहिजे.
नाहीतर सुरुवातीला अंधार…
आणि शेवटीही अंधार…
हीच आपली वेळ येणार.
धन्यवाद
सुदाम मदगे,किवळे, वडगाव मावळ

काका छान लिहला आहात. असच यापुढे या जीवनातली सत्य कथा लोकांपुढे अशा जिवंत करून मांडत रहा. शुभेच्छा
उत्तर द्याहटवा