अजितदादा सलाम तुमच्या कार्याला
हे काय घडतंय, कळेनासं झालं आहे.
अपेक्षित असं काहीच घडत नाही. मनाची अवस्था समजत नाही आणि ती कुणापर्यंत पोहोचवावी हेही उमगत नाही. माणसं गोड असतात, नाती सुंदर असतात; पण त्या नात्यांनाही एक मर्यादा असते. इच्छा-आकांक्षा असतात, स्वप्नं असतात, पण भगवंताने आखून दिलेल्या रेषा मर्यादित असतात.
त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं की अपमान पदरी पडतो, आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप.
उगाच इकडे-तिकडे ओढाताण करत राहतो आपण.
मर्यादा ओलांडल्यानंतर हातात काहीच राहत नाही.
आबा आर. आर. नंतर तुमच्याशी ओढ निर्माण झाली.
तुम्ही एकदा आमच्याकडे आलात आणि आम्ही सगळं विसरून तुमच्या प्रेमात पडलो. आमचं प्रेम तुम्ही स्वीकारलं की नाही हे आम्हाला कधीच कळलं नाही; पण आम्ही मात्र वेडेपिसे झालो. काही मिळेल की नाही याची पर्वा न करता, आम्ही तुमच्या मागे लागलो.
ते प्रेम होतं… निखळ, निष्काम.
पण आमच्या प्रेमाला साथ मिळण्याआधीच सगळं संपलं. तरीसुद्धा आम्ही तुमच्यापासून दूर गेलो नाही. कधी भेट होईल, कधी मुलाखत होईल, कधी फक्त दर्शन मिळेल याची चिंता कधीच केली नाही. फक्त तुम्हाला पाहून आम्ही कायम आनंदी राहत होतो.
तुम्ही खूप दिलंत.
कुणाचं भलं केलं नाही असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. तुमच्याकडे जे गुण, जे कौशल्य होतं ते सर्व तुम्ही दिलंत. तेव्हा कळलं नाही; पण तुम्ही गेल्यावर खूप काही उमगलं.
आता कसं वाटतं?
एक विचित्र गारवा जाणवतो. ‘आई’ म्हणावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं; पण ते सगळं फक्त स्वप्नातच दिसतं. काकांच्या डोक्याला डोकं लावून ज्ञान घ्यावं, असं वाटतं; पण तेही स्वप्नातच.
हृदयात दरारा भरून राहिलाय.
सन्मान, मान, उंची हे सगळं असताना सुद्धा आज आमच्या कृतींना काहीच अर्थ उरलेला नाही. हातबल झाल्यासारखं वाटतं. शेवटी मात टेकवावी लागते.
सलाम तुमच्या कार्याला.
खूप काही सांगायचं होतं, पण सांगता येत नाही. ऐकणारा नाही. हृदय फाटून गेलं आहे. केवळ बोलावंसं म्हणून बोलत राहिलोय. अख्खा समाज, अख्खं राज्य शून्य झाल्यासारखं वाटतंय. पण ही भावना ऐकायला, समजून घ्यायला तुम्ही आमच्यात नाहीत.
मग सांगायचं कोणाला?
हृदयाची धडधड वाढली आहे. प्रेमापोटी काय करावं हेच सुचेनासं झालं आहे. शेवटी देवाजवळ आपली व्यथा मांडली. देव म्हणाले.
“माझ्या प्रिय भक्तांना, प्रिय माणसांना मी स्वतः बोलावून घेतो.”
आणि आम्ही निशब्द झालो.
हे खरं आहे का?
जे घडायचं असतं ते कुणालाच कळत नाही. मग असं सगळं घडतंच कसं? त्या वेळी देव कुठे असतात? आम्ही कोणाचा धावा करायचा?
मान्य आहे… सगळं मान्य आहे.
पण अपेक्षित नसताना असं सगळं घडणं, बूथ असताना, लोक असताना, आवाज असताना तरीही हातात काहीच न येणं… याचा अर्थ काय?
गोपीनाथ मुंढे गेले,विलासराव गेले, महाजन गेले, आबा गेले, हृदयसम्राट गेले…
आता दादा गेले. मग आम्ही कशासाठी राहिलो, देवा? कुणाला किती पाहिजे होतं ते त्यांनी घेतलं; पण असा आघात होण्यात काय मिळतं?
शेवटी नीतीचा खेळ कुणालाच चुकलेला नाही.
पण समोर बोलायला असताना मध्येच पक्षी उडून गेला, अशी कुजबुज कायम राहील.
सलाम तुमच्या कार्याला, दादा.
तुम्ही आमच्यापासून दूर नाहीत. देवाला एवढंच सांगतो
दादाला दादासारखंच तुमच्यात ठेवा.
हसत-खेळत, बागडत, आनंदी ठेवा.
धन्यवाद.
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा