तेवढा तरी लेकराला जमिनीचा तुकडा राहू द्या.

पूर्वी वानर होती आणि वानरासारखीच काही माणसे होती, म्हणून त्यांना आदिमानव असे संबोधले जाई. 

रामायणकाळात भगवान श्रीरामाच्या वनवासाचे वर्णन येते. त्या काळात भिल्ल, पारधी, कोळी तसेच डोंगर-दऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाने श्रीरामांना मोलाची मदत केली. 

म्हणूनच रावणानेही श्रीरामांना वनवासी असे संबोधले होते.

हे वनवासी म्हणजेच जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचे खरे मालक म्हणजेच मूळ आदिवासी समाज.

भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक तसेच महिला क्रांतिकारकांनी आदिवासींच्या जमिनी व पिकांच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले.

त्यांच्या बलिदानामुळे जागरूकता निर्माण झाली आणि “जिथे कुळ तिथे जमीन” या तत्त्वावर आदिवासी समाज जमिनीचा मालक ठरला.

परंतु कालांतराने आधुनिक विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बदल घडले. धरणे बांधली गेली, जलसाठे निर्माण झाले, रस्ते झाले, जंगलतोड झाली. 

या सर्व तथाकथित विकासात सर्वाधिक भरडला गेला तो आदिवासी समाज. तुटपुंजा मोबदला देऊन त्यांना पुन्हा डोंगरदऱ्यांत हुसकावून लावण्यात आले आणि काबाडकष्ट करण्यास भाग पाडले गेले.

ज्या थोड्याफार जमिनी शिल्लक राहिल्या, त्या त्यांच्या अडाणीपणा, भोळेपणा, प्रामाणिकपणा, भीती व विश्वासाचा गैरफायदा घेऊन लुटल्या गेल्या. 

नातेवाईक असल्याचे भासवून, दारू-पार्टी देऊन, कुटुंबे फोडून जमिनी विकायला लावल्या गेल्या. 

आज तेच आदिवासी लोक त्यांच्याच कारखान्यांत, वीटभट्ट्यांवर, शेतात व गोठ्यांत मजूर म्हणून राबताना दिसतात.

पालघर-ठाणे जिल्ह्यातील कातकरी समाज, नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील ठाकर व पारधी समाज आज कुठे आहेत? त्यांची गावे, जमिनी नामशेष झाल्या. 

काहीजण दरड कोसळून मृत्युमुखी पडले, पण त्यांच्याकडे पाहणारा कोणीच नव्हता. कित्येक पिढ्यांनी हा अन्याय सहन केला आहे.

आज अनेक जण राष्ट्रपती, मंत्री झाले; पण दुर्गम आदिवासी भागातील अन्याय अजूनही संपलेला नाही. हे कटू सत्य आहे. आपल्या पुढाऱ्यांना ते माहीत आहे, पण ते बोलत नाहीत.

अशीच एक हृदयद्रावक घटना 

एका कुटुंबाकडे कसाबसा अर्धा एकर जमिनीचा तुकडा शिल्लक होता. कर्जाच्या ओझ्याखाली सावकाराने तो तुकडाही बळकावण्याचा प्रयत्न केला. जो जल-जंगल-जमिनीचा खरा मालक होता, तो आज उघड्यावर आला. राहायला घराचीही जागा उरली नाही.

शेवटी तो सावकाराच्या पाया पडला, जमिनीवर लोळण घेत म्हणाला,

“अहो साहेब, तेवढा तरी लेकरासाठी जमिनीचा तुकडा राहू द्या…”

तो ढसाढसा रडत होता.

पण सावकाराच्या मनात जराही दया आली नाही. जमीन हिरावून घेऊन त्यालाच शेतमजूर म्हणून ठेवण्यात आले.

अशी असंख्य उदाहरणे आज आपल्या सभोवती आहेत. त्यामुळे आता आपण एकत्र येणे गरजेचे आहे. 

अशा अन्यायकारक प्रसंगांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा विचार केला पाहिजे. समाजासाठी लढणाऱ्या प्रामाणिक समाजसेवकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे.

याच निर्धाराने माझे हे भाष्य संपवतो.

धन्यवाद!

सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)

टिप्पण्या

  1. ज्या ज्या आदिवासी लोकांकडे जमिनी आहेत.. त्यांनी तरी.. विकल्या नाही पाहिजेत....🙏🙏 साहेब.. 🙏🙏
    मच्छिंद्र दगडे मावळ केसरी पहिलवान माळेगाव

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था