अखेर काय? माणूस, सत्ता, संपत्ती आणि निसर्गाचा समतोल
अखेर काय?
माणसाच्या इच्छा-आकांक्षा इतक्या वाढल्या की त्या कधीच संपल्या नाहीत. अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ लागला. नातेसंबंध तुटले, माणुसकी हरवली, प्राणी-पक्ष्यांवरचे प्रेम कमी झाले. आर्थिक, सामाजिक व राजकीय गरजा वाढत गेल्या आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी माणसाने सामाजिक समतोल बिघडवला. सर्व काही असूनही मान-अपमान, तुलना आणि स्पर्धा वाढत गेली.
निसर्गावरचा अन्याय
माणसाने जंगल उद्ध्वस्त केली, प्राण्यांचे अधिवास नष्ट केले. त्यांना उघड्यावर, डोंगरकपारीत व बिळांमध्ये राहण्यास भाग पाडले. सावली नाही, पाणी नाही, सुरक्षितता नाही—असा असमतोल निर्माण झाला. आपण किती नुकसान करत आहोत, किती जाळपोळ करत आहोत, हे भानच माणसाला राहिले नाही. परिणामी निसर्ग आणि प्राणीमित्रांचा रोष आपल्यावर कोसळू लागला आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले.
वाढती विषमता
गरीब गरीबच राहिला, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला. राजकारणाचा विचार करायचा तर घराणेशाही, वाढलेल्या अपेक्षा आणि राजेशाही जीवनशैली यामुळे सामान्य माणूस फसवला गेला. वेळप्रसंगी गोड बोलून लोकांचा वापर करून घेतला गेला—हा अनुभव सर्वत्र दिसतो.
सामाजिक-आर्थिक अन्याय
आज अशी परिस्थिती आहे की कोणी अख्खे राज्य विकत घेऊ शकतो, तर कोणी केवळ आर्थिक ताकदीवर देशावर प्रभाव टाकू शकतो. हे कसे घडले? आपल्याला फसवले गेले. आपल्या हक्काची जमीन, आपल्या हक्काच्या योजना मिलीभगत करून राबवल्या गेल्या. गरीबाला फक्त आश्वासने मिळाली आणि कार्यक्रम मात्र सत्ताधाऱ्यांचे पूर्ण झाले.
असंख्य योजना आल्या, पण गरीबांपर्यंत पोहोचेपर्यंत शंभर रुपयांपैकी फक्त वीस रुपये पोहोचतात. उरलेले कुठे जातात, हा प्रश्न गंभीर आहे. नोकरदार, मजूर, कष्टकरी, आदिवासी आणि इतर दुर्बल घटक आजही दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहेत.
इतिहास आणि आजची परिस्थिती
इतिहास सांगतो—अतिरेक करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळालेच आहे. रावणाचा गर्व, मोह यांचे परिणाम त्याने भोगले. देवांच्या कथा सुद्धा सांगतात की कष्ट, अपयश, मान-अपमान यांपासून कोणीच सुटलेले नाही. मग आपण कोण?
आज अनेक करोडपती, अब्जपती झाले टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांची नावे घेतली जातात. पण पैसा असूनही त्यांना समाधान, शांत झोप मिळतेच असे नाही. उलट सामान्य माणूस, दोन वेळचे अन्न समाधानाने खातो, हेच खरे वैभव आहे.
निसर्गाचा इशारा
आपण जंगल तोडली, प्राणी हुसकावले, त्यांचा नाश केला. शेवटी निसर्ग आपत्तीच्या रूपाने प्रत्युत्तर देतो आणि सर्व काही वाहून नेतो. मग पश्चात्तापाशिवाय आपल्या हाती काहीच राहत नाही. “अति तिथे माती” हे वाक्य आज अधिकच सत्य ठरते. खऱ्याला न्याय उशिरा मिळतो, खोट्याला लगेच—आणि याच भ्रमात आपण आपले भविष्य धोक्यात घालतो.
खरे समाजसेवक
इतिहासात अनेक महापुरुष झाले संत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा फुले. त्यांनी समाजासाठी निस्वार्थपणे काम केले. आज अशा व्यक्ती बोटावर मोजण्याइतक्या उरल्या आहेत. म्हणूनच “साधी राहणी, उच्च विचार” हे तत्त्व अधिक महत्त्वाचे वाटते.
शेवटचा विचार
कोणाचे वाईट करू नका. झालेल्या चुका विसरून जा. आप्त, नातेवाईक, विरोधक सर्वांना जवळ करा. चांगले विचार ठेवा, गरिबांना मदत करा आणि आहे त्या परिस्थितीत समाधानी राहा. शेवटी काहीच आपल्या हातात राहत नाही, हे सत्य स्वीकारले पाहिजे.
भावकीच्या भावनांशी खेळू नका, कुणाचे मन दुखावू नका. प्रसंगानुसार मदत करा आणि गरज पडल्यास मदत घ्या. आपोआप जीवनात समाधान आणि शांती मिळेल यात मला शंका नाही.
धन्यवाद.
आपला,
सुदाम मदगे (किवळे,अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा