बदलत्या काळातील समाज, शिक्षण आणि नातेसंबंध



आजचा काळ हा झपाट्याने बदलणारा काळ आहे. वैज्ञानिक, तांत्रिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेले आपण अनुभवत आहोत. 

पूर्वी शिक्षणाची साधने मर्यादित होती. आधुनिक तांत्रिक यंत्रणा, दळणवळणाची साधने किंवा कम्युनिकेशनची माध्यमे जवळजवळ नव्हतीच. 

एखादा रेडिओ किंवा क्वचित टीव्ही एवढीच साधने होती, तीही आता कालबाह्य ठरली आहेत. आज टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली असून रेडिओ जवळजवळ इतिहासजमा झाला आहे.

पिढ्यानपिढ्यांमध्ये झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. चालीरीती, संस्कृती, राहणीमान, आचार-विचार यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. 

आज योग्य दिशा व मार्गदर्शन, वाढलेली साधनसामग्री, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि शासनाच्या विविध योजनांचा मोठा फायदा समाजाला झाला आहे. 

यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती लक्षणीय झाली. मोठमोठ्या शिक्षणसंस्था, उच्च शिक्षणाच्या डिग्र्या उपलब्ध झाल्या.

आज कोणी डॉक्टर झाले, कोणी अभियंते, कोणी एम.फिल., पीएच.डी. केली, तर कोणी आयटी क्षेत्रात नाव कमावले. काही प्राध्यापक झाले, काही पोलीस अधिकारी, तर काही शासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून उच्च पदांवर कार्यरत आहेत. 

यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळाले आणि अनेकांना यश प्राप्त झाले.

मात्र याच प्रक्रियेत काही मुलांना अपयशही आले. यशासाठी धडपड करणारी तरुण पिढी आज दिसून येते. वाढत्या अपेक्षा, सततचा कम्युनिकेशनचा भडिमार, सोशल मीडियावरील प्रदर्शन यामुळे मुला-मुलींमध्ये गैरसमजही वाढले आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमांमुळे व्यक्तिमत्त्व, सवयी, राहणीमान सहजपणे उघड होत आहेत. हे आधुनिक युग जितके उपयुक्त आहे, तितकेच काही अंशी घातकही वाटते.

पूर्वी एकदाच मुलगी पाहिली जायची आणि लग्न जमून जायचे. आज मात्र वाढलेले शिक्षण, करिअरच्या आकांक्षा, आर्थिक स्वप्ने आणि जीवनशैलीच्या अपेक्षा यामुळे निवडी कठीण झाल्या आहेत. 

गरजा वाढल्या, सुखसुविधांची सवय लागली आणि सहज श्रीमंतीचे चित्र डोळ्यांसमोर दिसू लागले. आई-वडिलांनी भोगलेले संघर्ष विसरले गेले. 

“सगळं सुखाचं आयुष्य हवं” अशी अपेक्षा वाढत गेली आणि कळत-नकळत वय पंचवीस, तीस, पस्तीस केव्हा ओलांडलं हेही लक्षात येत नाही.

पूर्वी १८ ते २१ वयात लग्न होत असे. आज शिक्षण आणि करिअरचा कालावधी किमान पंचवीस वर्षांपर्यंत जातो. 

२५ ते ४५ हा काळ कमावण्याचा, कष्ट करण्याचा मानला जातो आणि त्यानंतरचा काळ आरामाचा समजला जातो. 

मात्र या दुसऱ्या टप्प्याचा मोठा भाग सरून गेल्यानंतरही वाढलेल्या अपेक्षा, शहरातच राहण्याची इच्छा, गावाकडे न जाण्याची प्रवृत्ती आणि आरामदायी जीवनशैलीमुळे योग्य वेळी जीवनसाथी मिळत नाही, हे वास्तव आज समाजात दिसून येते.

आज उच्च शिक्षित, विचारशील आणि कमावणारी पिढी असूनही केवळ आर्थिक स्थिती, नोकरीचा दर्जा, शहर किंवा गाव, सरकारी-खासगी नोकरी अशा विविध कारणांवरून स्थळे नाकारली जातात. 

परिणामी अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आजही मोठ्या संख्येने मुलं-मुली अविवाहित राहिलेली दिसतात. ही सामाजिक स्थिती नक्कीच चिंताजनक आणि घातक आहे.

ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात मानसिक आरोग्याच्या समस्यांवर गंभीरपणे विचार करणे आवश्यक ठरेल, असे माझे मत आहे.

या निमित्ताने मी सर्व तरुण मुला-मुलींना एक विनंती करतो जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे. कष्ट केल्याचे फळ नक्की मिळते. 

कधी अपेक्षित यश मिळाले नाही, तर दुसरा मार्ग शोधा. स्वतःला कामात व्यस्त ठेवा; त्यामुळे मानसिक स्थिती सुधारण्यास निश्चितच मदत होते. जितके मिळणार आहे तितके तुम्हाला मिळेल, यात शंका नाही. 

पक्ष्याला पंख आणि चोच मिळाली की तो कुठेही अन्न शोधून आपली उपजीविका करतो. आपण तर विचारशक्ती असलेले मनुष्य आहोत.

या गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर पडून वास्तवाचा स्वीकार करा, सकारात्मक विचार करा आणि जीवनाकडे समतोल दृष्टीने पाहा, एवढेच माझे आवाहन आहे.

धन्यवाद.

आपला

सुदाम मदगे (किवळे,अंदर मावळ)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था