जिवंत असूनही मेलेल्या अवस्थेत आई-वडील | सामाजिक वास्तवावर हृदयस्पर्शी लेख



आपणास ज्ञात आहे की मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांनी गुरुदक्षिणेसाठी वडिलांसाठी डोळा काढून दिला. 

आई-वडिलांची अपार सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा सर्वश्रुत आहे. 

भक्त प्रल्हादासाठी भगवानांनी नरसिंह अवतार धारण केला, हे भक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे.

भगवान श्रीरामांची भक्ती करणारी भिल्ल स्त्री शबरी उष्टे बोर अर्पण करते आणि राम ती भक्ती म्हणून स्वीकारतात—ही केवढी मोठी श्रद्धा!

रामाच्या वनवासात खरा वनवास कोणाचा झाला असेल, तर तो लक्ष्मणाचा झाला. भावावरील माया, श्रद्धा, भक्ती व सेवा यांची ही सर्व उदाहरणे आहेत. कथेमध्ये कधी कधी अशा उदाहरणांची आवश्यकता असते—एवढाच हा भाग.

खरी हकीगत अशी आहे—

जुन्या काळात, आमच्या गावातील दशरथला बऱ्याच वर्षांनी मूल झाले. नशीब फळाला आले होते. एक वर्षाने दोन मुलगे झाले. मग काय—दसऱ्याचा आनंद द्विगुणित झाला.

गावासाठी जे करायचे, जे नको तेही त्यांनी केले. दशरथला त्यांच्या घरात कधीच “काय आहे?” असे कोणी पाहिले नाही—फक्त आनंद, उत्साह आणि आपुलकी होती. मुलांच्या जन्मामुळे त्यांचे आयुष्य सुखात गेले.

मुलं मोठी झाली, समजदार झाली. त्या काळी फारसे शिक्षण नव्हते. मोठा मुलगा सातवी–आठवीपर्यंत शिकला. लहान मुलगा लाडाचा असल्यामुळे वायफळ गेला.

दोघांची लग्न झाली, सुना घरी आल्या. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. दशरथाने आधीच चार खणांचे घर बांधले होते—दोन खण प्रत्येकासाठी—आणि एक पडवीही बांधून ठेवली होती.

परंतु हळूहळू वाद वाढू लागले.

“ती एवढं काम करते, मी तेवढं करते,”

“म्हातारी काहीच काम करत नाही,”

“तिचे जास्त लाड करता,”

“मला सतत बोलतात, तिला काहीच नाही”

अशा तक्रारी सुरू झाल्या. नातेसंबंधांमुळे घरात सतत भांडणं होऊ लागली. त्यामुळे लहान मुलाचे डोके फिरले आणि तो व्यसनाधीन झाला.

तो थेट म्हाताऱ्या आई-वडिलांना बोलू लागला

“माझ्यासाठी तुम्ही काहीच करत नाही, सगळं थोरल्यासाठी करता.”

वाद वाढू लागले. शेवटी म्हाताऱ्याने विचारले, “काय पाहिजे तुला?”

त्यावर लहान मुलगा म्हणाला, “मला वेगळं पाहिजे.”

मोठा मुलगा थोडाफार शिकलेला होता. घरातील कटकट पाहून तो जवळच्या शहरात नोकरीस गेला. काही मंडळी जमली आणि शेवटी शेती व घर दोन्ही भावांत वाटून दिले गेले.

मोठा मुलगा शहरातून येऊन काम करायचा, जेवढं पिकलं तेवढं घेऊन जायचा, थोडंफार आई-वडिलांना द्यायचा.

दोघे भाऊ वेगळे झाल्यावर प्रश्न निर्माण झाला—म्हातारे आई-वडील कोण सांभाळणार?

मोठा शहरात, लहान स्वतंत्र. शेवटी म्हाताऱ्या आई-वडिलांना दोन खणांचे घर असताना पडवीत राहायला लावले गेले.

शहरात जाण्यापूर्वी मोठ्या सुनेने पाणी, भाकरी दिली. पण ते शहरात गेल्यावर लहान सुनेने पूर्ण दुर्लक्ष केले. नवरा तिच्या मुठीत होता.

आईच्या दागिन्यांवर डल्ला मारला गेला. व्यसनांच्या नादात मारहाण सुरू झाली. वृद्ध आई-वडील सगळं सहन करत राहिले. मोठ्या मुलाला हे सर्व कळत होते, पण त्याने डोळेझाक केली.

शेवटी त्यांच्या जवळचं सर्व संपलं.

कधी अर्धी–चतकोर भाकर मिळायची. म्हातारीला चुल फुंकताही येत नव्हती. म्हातारा जंगलातून काटक्या आणायचा, कळशीभर पाणी आणायचा. काठीच्या आधाराने दोघे कसंबसं जगत होते. जे मिळेल ते खायचे, नाहीतर उपाशी झोपायचे.

जन्मदात्या आई-वडिलांची अवस्था अशी झाली—जिवंत असूनही मृतासारखी.

येथे मी एक गोष्ट नमूद करतो

मी एवढा भाग्यवान नाही की मला आई-वडिलांची सेवा करता आली. पण आजी-आजोबांची सेवा मला करता आली आणि त्याचे सर्व फलित मला मिळाले. ही वस्तुस्थिती आहे; ही कथा नाही.

मोठा मुलगा तालुक्याला राहत होता. गावातील काही लोकांनी त्याला सर्व सांगितले.

“आई-वडील थकलेत, लक्ष दे.”


तो ऐकत नसे. फक्त पाच पन्नास किंवा शंभर रुपये पाठवून मोकळा व्हायचा.

लोक समजावून सांगायचे

“जन्मदात्या आई-वडिलांची अशी अवस्था तुम्ही कशी सहन करता?”

पण दुर्लक्षच झाले.

म्हाताऱ्या आई-वडिलांना आशा होती मोठा मुलगा चांगला आहे. एक दिवस ते त्याच्या घरी गेले. पण मोठ्या सुनेने सांगितले, “मी आईकडे चालले.”

मोठ्या मुलाने फक्त दोनशे रुपये दिले आणि त्यांना परत पाठवले.

शेवटी अंत झाला.

एक वेळचं जेवणही मिळेनासं झालं. म्हातारी भाकरी मागू लागली. म्हातारा पडूनच होता. शेजाऱ्यांनी दिलेली भाकरी–चटणी खाऊन ते दिवस काढत होते.

जिवंत असताना देखील मृत अवस्थेत जगणं हे त्यांचं नशीब ठरलं.

ही कहाणी अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहे.

समाजाने अशा घटनांची गंभीर दखल घ्यावी. जनजागृती करावी. आई-वडिलांना वृद्धाश्रमात न टाकता त्यांची सेवा करावी यातच खरे समाधान आहे.

यासाठीच मी वरील सर्व उदाहरणे दिली आहेत.

माझे लेख असेच येत राहतील—मनाला भिडणारे, मानसिकता बदलणारे, सामाजिक परिवर्तन घडवणारे. कारण मी हे सर्व अनुभवलं आहे.

सर्वांनी याचा विचार करावा आणि जन्मदात्या आई-वडिलांची—आपल्या कुळदेवांची—सेवा करावी, हीच माझी नम्र विनंती.

धन्यवाद.

आपला,

सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था