शेवटी हत्यार खाली ठेवली
आमचा सर्व कामधंदा आणि गुजराण ही जंगल-वनस्पती, डोंगर-दऱ्यांमध्येच. जे काय मिळेल तेच काही दिवसांची शिदोरी. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या आम्ही हेच काम करत आलो. नदी-नाले ओलांडले, आणि त्यामधून जे मिळेल तेच पोटाची शिदोरी.
पण हे जंगल आहे म्हणूनच आमचं गुजराण झालं. आमच्या गुराढोरांना चारा मिळाला, आम्हाला लाकडं-फाटा मिळाला, औषध मिळालं. या जल-जंगल संपत्तीने आम्हाला बरंच काही दिलं. आम्ही त्याला डोंगर देव, वाघ देव मानलं.
जंगलातले प्राणी-पक्षी हे तर आमचं शिकारीचं साधन. आम्ही बराच अत्याचार केला त्यांच्यावर. त्यामुळे जंगल बरंच नष्ट झालं आणि प्राणिमात्रही कमी झाले. म्हणून आज माणूस आणि प्राणी यांची अस्तित्वाची लढाई आपण पाहतो.
एक दिवस मी शांतपणे माझ्या गावाबाहेर पडवीत झोपलो होतो. पडवीत गाई-म्हशी खाल्लेला चारा खाऊन रवंथ करीत होत्या.
वर कारव्याच्या मांडणीवर चार-पाच शेळ्या बसल्या होत्या. खुराड्या मध्ये कोंबड्या होत्या.
मी आतील लाकडी फळ्यांच्या माचोळीवर झोपलो होतो.
अचानक, माझ्या स्वप्नात एक साप आला आणि मला इशारा करू लागला
“आमच्यावर अत्याचार होतोय, तू आम्हाला मारायला उठलाय!”
मी घाबरलो आणि जागा झालो.
पाहतो तर कोल्हा-लांडग्याची कुही-कुही चालू होती. जणू तेही म्हणत होते
“तू आमच्यावर अतिक्रमण केलंय. आता तुझी खैर नाही.”
मी घाबरलो. तोच सकाळ झाली आणि पुन्हा तोच धंदा. गुराढोरांना चारायला सोडलं. दोन-तीन शेळ्या टेकडीवरील झाडांच्या पाला-खुरपाडा लागल्या.
नेहमीप्रमाणे अंगावर घोंगडी, कंबरेला आकडी, त्यात कोयता अडकवला, हातात काठी आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेतली आणि जंगलाच्या दिशेने चालू लागलो.
पूर्वीचं जंगल आणि आताचं जंगल यामध्ये खूप अंतर दिसू लागलं होतं. खरंच ते स्वप्न सत्य होतं की काय असं वाटू लागलं. जंगल तोडून माळरानं रिकामी झाली, टेकड्या उघड्या पडल्या, डोंगर उघडे झाले. वातावरण भयावह झालं होतं.
पायवाटेवर एक मोठा खेकडा मला आडवा झाला. जसा काय दोन सु-या घेऊन उभा! मी त्याला पकडायला गेलो तर त्याने माझा अंगठा धरला आणि चावून बिळात निघून गेला.
मी पुढे गेलो तर एक टणटणीचं झुडूप. त्यात बारीक पक्ष्याचं घरटं. मला पाहताच पक्षी माझ्या डोक्यावर घिरट्या घालू लागले. जणू म्हणत होते
“हे झुडूप तोडू नको, आमची पिल्लं इथे आहेत.”
त्यांच्या चिवचिवाटाने आणि लढण्याच्या तयारीने मी पुढे गेलो.
आत पुढे गेलो तर आंबा-उंबर, तोरण, कंदमुळे, हिरड, आळू, टेंभ्र—अशा फळ-फुल-औषधी वनस्पती माझं स्वागत करत होत्या.
“या दादा, जे हवं ते घेऊन जा. पण आम्हाला तोडू नको, आमची मुलं बाळ नष्ट करू नको,”
असा मला भास होऊ लागला. मी जे हवं ते घेतलं आणि पुढे गेलो.
पण माझं लक्ष कामावरच. मला लाकूड-फाटा न्यायचाच होता. गवत काढायला गेलो, आणि झाडावर कुऱ्हाड उगारून ठोका मारला इतक्यात आग्या-मोहोळ उठलं आणि मला चावू लागलं.
मी पळत एका दगडातील पाण्याच्या कुंडाकडे गेलो आणि त्यात बुडून घेतलं. तेव्हाच मला उमगलं—जंगलावर अत्याचार केला तर ते लढायलाही तयार असतं आणि संरक्षण द्यायलाही!
थोडं पुढे गेलो तर दोन-तीन माकडं झाडावर बसलेली. त्यांनी माझ्यावर एक वाळलेली फांदी फेकली. जणू म्हणत होती
“दादा, ही जंगलसंपत्ती तुझीच आहे. पण योग्य वापर कर. आम्हाला संरक्षण दे, आम्ही तुझं संरक्षण करू. ही वाळलेली फांदी, सुकलेलं लाकूड वापर. नवीन झाडं-झुडुपं लाव.”
त्यांचंच मी ऐकलं. आणि माझ्या हातातील हत्यार कोयता आणि कुऱ्हाड त्याच क्षणी तिथे टाकून दिली. जंगलातील वनस्पतींची नुकसान न करता, पडलेली, सुकलेली झाडं-फांद्या यांचा उपयोग करायला सुरुवात केली.
आपण सर्वांनी हाच बोध घ्यावा. आपल्या जल-जंगल संपत्तीची आपणच सुरक्षा केली तरच हे जग वाचू शकतं, जगू शकतं यामध्ये तिळमात्र संशय नाही.
धन्यवाद
आपला,
सुदाम मदगे (किवळे, अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा