कान उघड

समाजामध्ये माणसांच्या अनेक इच्छा-आकांक्षा दडलेल्या असतात. 



त्या पूर्ण करण्याच्या नादात आपण कुठे थांबायचे आणि कुठपर्यंत जायचे, याचे भान अनेकदा राहत नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की सर्व काही हातातून निसटून जाते आणि शेवटी पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. अशाच काही उदाहरणांमधून ही कथा सांगते — अतिरेक किती घातक ठरतो याची जाणीव करून देणारी.

आमच्या गावात एक माणूस होता. तो सकाळीच अड्ड्यावर जायचा, एखादी अर्धी-चपटी हाणायचा आणि मग कामाला जायचा. संध्याकाळी परत येताना गावाच्या हद्दीपर्यंत येईपर्यंत त्याच्या तोंडाची माशीही उडायची नाही. पण गावाच्या हद्दीत पाऊल टाकताच त्याचा आवाज बदलायचा. जाताना कोणाला भावकीत, कोणाला गावातल्या लोकांत —

“मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी अख्खा समाज विकत घेईन”

अशी नको ती बडबड सुरू व्हायची.

हा गर्व, हा अतिरेक इतका वाढला की शेवटी त्याच्याच मुलाशी वाद झाला. घरात शांतता राहिली नाही आणि अखेरीस त्याला घराबाहेर काढले गेले. अतिरेकाने माणूस स्वतःचं घरही गमावतो, हेच यातून दिसून आलं.

आपल्याकडे कोरडवाहू शेती आहे. शेतीवर सतत सेंद्रिय खतांचा मारा केला, किंवा बारा महिने पिकं घेण्याचा अट्टहास केला, तर शेतीचा कस निघून जातो. शेतीला विश्रांती हवी असते — ती तापली पाहिजे, फुटली पाहिजे, मशागत झाली पाहिजे. केवळ हव्यासापोटी सतत पीक घेतले, तर उत्पन्न येत नाही. म्हणूनच वर्षातून दोनच पीक घ्या आणि मग बघा — पीक कसं कसदार येतं. इथेही अतिरेक चुकीचाच ठरतो.

वडिलोपार्जित इस्टेटीच्या अति लोभातून कितीतरी कुटुंबं उद्ध्वस्त झाली. माया संपली, माणुसकी संपली. छोट्या-छोट्या कारणांवरून मोठे वाद होतात. हे समाजासाठी अतिशय घातक आहे. इथेही अतिरेक टाळायला हवा.

राजकारणी सच्चा, प्रामाणिक आणि मदतीला वेळीच धावणारा असावा. निवडणुकीपुरताच नव्हे तर पाच वर्षे लोकांच्या सोबत उभा राहणारा असावा. एक-दोन वेळा जनता सहन करते, पण काहीच बदल झाला नाही तर शेवटी तोच राजकारणी फसतो — हे अर्धसत्य नाकारता येत नाही.

आजचे पालक बदलत्या काळानुसार मुलांना मोठे शिक्षण देतात, त्यासाठी कर्जबाजारी होतात. पण मुलं कुठे राहतात, काय करतात, कशी जगतात याकडे दुर्लक्ष होतं. मुला-मुलींचं वय ३०-३५ वर्षांपर्यंत जातं, तरी लग्न होत नाही. पूर्वी वेळेत लग्न व्हायची, आता ते चित्र दुर्मिळ झालं आहे. हेही समाजासाठी घातक संकेत आहेत आणि इथे जागृती होणं गरजेचं आहे.

आज मुलं रडायला लागली की आई थेट मोबाईल हातात देते. अंगाई गीत, गोष्टी, संवाद — सगळं संपलं. मोबाईलच्या अति वापरामुळे कितीतरी मुलांना डोळे, कान आणि मेंदूचे विकार जडले आहेत. पालकांनी इथे वेळीच सावध व्हायला हवं.

बदलत्या काळात माणूस माणसाला विचारत नाही. एखाद्याने गाडी घेतली की तो स्वतःला फार मोठा समजू लागतो. गावातला एखादा म्हातारा रस्त्याने चालत असेल तरी गाडीवर बसवणार नाही — कारण ‘कमीपणा’ वाटतो. धन-दौलत मिळाली तरी माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. माणुसकी नसेल तर त्या इस्टेटचा काय उपयोग?

डॉक्टर आणि शिक्षक हे देवमाणूस मानले जातात. शिक्षकांनी प्रामाणिक शिक्षण द्यावं; केवळ स्वतःचा क्लास चालावा म्हणून वर्गात कमी शिकवणं आणि क्लासला बोलावणं ही शिक्षणव्यवस्थेला घातक गोष्ट आहे. डॉक्टरांनीही देव म्हणूनच वागावं. एखाद्या रुग्णाकडे पैसे नसतील तरी त्याचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन उपचार करावेत — पैसे आज ना उद्या मिळतील.

आज गावागावांत गटबाजी वाढली आहे. माणसं माणसापासून दूर जात आहेत. पूर्वी आदर-प्रेम होतं, आता सगळेच शत्रू वाटू लागलेत. “मी कुठे आणि ते कुठे” अशी गर्विष्ठ भावना समाजहिताला मारक आहे.

काही लोक कितीही जेवण दिलं तरी थांबत नाहीत. पण दुसरीकडे काही ठिकाणी मुलं उपासमारीने मरत आहेत. अन्न फेकू नका, अन्नदान करा — ही जाणीव ठेवणं गरजेचं आहे.

आजची तरुण पिढी नैसर्गिक व्यायाम करत नाही. जिममध्ये जाऊन फुगवलेली बॉडी ही टिकाऊ नसते. चालणं, पोहणं, मैदानी खेळ — हेच खरे आरोग्यदायी मार्ग आहेत.

आमच्या गावात काही लोकांना वाटायचं — “माझ्यासारखा ड्रायव्हर नाही”, “माझ्यासारखा पोहणारा नाही”. पण जिथे अति गर्व असतो, तिथे गर्वाचं घर खाली येतंच. कधी तो माणूस पाण्यात बुडतो, कधी दरीत कोसळतो. ही लक्षणं ध्येयपूर्तीची नसतात.

आजची काही मुलं लग्न झाल्यावर लगेच आई-वडिलांपासून दूर होतात. त्या वृद्ध माणसांनी पुढचं आयुष्य कसं जगायचं, याचा विचार होत नाही. वडिलोपार्जित शेतजमीन विकून शहरात मौज करण्याआधी तरुणांनी थोडा तरी विचार करायला हवा.

अशा अनेक गोष्टी आहेत. माणूस आहे म्हणून चुकतो — मीही वेगळा नाही. पण जे वाटलं ते लिहिलं. किती घ्यायचं आणि किती सोडायचं, याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा.

धन्यवाद.

आपला,

सुदाम मदगे (किवळे, आंदर मावळ)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था