सह्याद्रीच्या कुशीत दडलेली विकासाची हाक....
सह्याद्रीच्या कुशीत दडलेली विकासाची हाक....
सह्याद्रीच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये वसलेले मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले आणि सिन्नर हे तालुके म्हणजे निसर्गाची खऱ्या अर्थाने संपत्तीच. उंच उंच डोंगर, खोल दर्या, गगनभेदी धबधबे, शेतांमध्ये डुलणारा ऊस, भात आणि भाजीपाला या सर्वांमुळे हा परिसर महाराष्ट्राचा नैसर्गिक खजिना आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा परिसर तर महाराष्ट्राचं पर्यटन रत्न आहे. पावना, पानशेत, टाटा, आंध्रा अशी अनेक धरणं आणि डोंगरकड्यांवरील गुफा येथे पर्यटकांना आकर्षित करतात. कार्ला देवीचं मंदिर असलेली लेणी, देहू-आळंदीचा भक्तीमार्ग, कोण संत तुकाराम महाराजांचा भंडारा. आणि जगप्रसिद्ध मावळचा गुलाब उद्योग या सर्व गोष्टींमुळे हा भाग जागतिक स्तरावर ओळखला जातो.
खेड तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वाढलेली सुपीक शेती, एमआयडीसी मुळे वाढलेला औद्योगिक विकास, तसेच भाजीपाला आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन हे या भागाचे बलस्थान आहे. चाकण, वरसुबाई, खंडोबा मंदिर अशा अनेक सांस्कृतिक आणि औद्योगिक वैशिष्ट्यांनी हा तालुका महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा उचलतो. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी याच खेड तालुक्यातील आळंदी येथे आहे.
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक धार्मिक आणि पर्यावरणीय दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. हिरड्याचे उत्पादन, शेकरू सारखे दुर्मीळ प्राणी, डिंबा धरण, ऊस आणि भात शेती, औषधी वनस्पती आणि शैक्षणिक संस्था या सगळ्यांनी हा तालुका समृद्ध झाला आहे.
जुन्नर तालुक्याचा विचार केला तर तो म्हणजे इतिहास आणि पर्यटन यांचा संगमच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, माळशेज घाटाचा अप्रतिम निसर्ग आणि आंबाघाटासारखी ठिकाणं आजही पर्यटकांच्या मनावर राज्य करत आहेत.
अकोले तालुका देखील कळसूबाई शिखर, भंडारा धरण आणि भव्य डोंगरदऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. निसर्गाने या सह्याद्रीच्या कड्या भागांवर आपल्या संपत्तीचं सोनं ओतलं आहे.
पण, दुर्दैवाने या सगळ्या निसर्गसंपन्न भागातील ग्रामीण आणि आदिवासी जनता आजही विकासापासून वंचित आहे. रस्ते, रेल्वे, पाणी, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत गरजांवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कर्जत-शिरूर रस्ता अपूर्ण आहे, आसखेड विमानतळाची घोषणा फसली, नाशिक–पुणे रेल्वे मार्ग अजून स्वप्नच आहे.
या सर्वामुळे सह्याद्रीच्या कुशीत राहणारा शेतकरी आणि कामगार वर्ग शहरांकडे रोजगारासाठी धाव घेतोय. आपण जिथे पाणी साठवतो, तिथेच दुसऱ्यांची शेती फुलते, त्यांच्याकडे उत्पन्न वाढतं आणि आपण मात्र आपल्या भूमीतच उपाशी राहतो हा किती मोठा अन्याय आहे!
म्हणून आता वेळ आली आहे जागृत होण्याची.
या भागातील खासदार, आमदार आणि सर्व राजकीय नेत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. या सह्याद्रीच्या भागाचा विकास झाला तर तो केवळ ग्रामीण भागासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरेल.
आपण सगळ्यांनी मिळून एकत्र उभं राहून सांगायचं आहे
"आमच्या सह्याद्रीचा विकास आमच्या हातात हवा!"
कारण आता आमच्या पदरातील भाकरी आम्हाला मिळालीच पाहिजे.
सुदाम मदगे (किवळे वडगाव मावळ)







अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख
उत्तर द्याहटवा