खापर-खापर पंजोबा यांचं गावाबाहेर पडलेलं मोडकं घर
एक सामूहिक आत्मचिंतन आणि आवाहन
नमस्कार गावकरी मंडळी,
पूर्वी आपली गावं वाड्या-वस्त्या दर्या-खोऱ्यांमध्ये वसलेली होती.
जंगल, धनसंपदा, गुरं-ढोरं, धान्य, दूध-दही-ताक—सर्व काही मुबलक होतं. लोकांना फारसं दवाखान्याचं नावही घ्यावं लागत नव्हतं. जंगल, हवा, पाणी आणि तेथील औषधी वनस्पती यांवरच जीवन चालायचं.
लोक फार शिकलेले नसले, तरी चावडीवर बसायचे, अंगणात शेकोटी पेटवायचे, आकाशालाच घर मानून झोपायचे. एकमेकांची विचारपूस, जत्रा-कात्रा, सुख-दुःखाला एकत्र जमणं—या सगळ्यातून जीवनाचा खरा आनंद घेतला जायचा.
माणसं गरीब होती, पण मनाने फार मोठी होती. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुत्व आणि आदर यांची श्रीमंती होती.
काळ बदलला. संपर्काची साधनं वेगवान झाली. तांत्रिक यंत्रणा वाढली. दोन सेकंदांत देश-विदेशात संवाद होऊ लागला. मुलं शिकली, मोठी झाली, मोठ्या पदावर पोहोचली. घरी गाड्या-घोड्या उभ्या राहिल्या. माणसाची प्रगती झाली—यात शंका नाही.
आपल्या माणसाची प्रगती व्हावी, ही सात्विक भावना आपण कायम ठेवायलाच हवी.
परंतु सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील दर्या-खोऱ्यात वसलेली आपली अनेक गावं धरणांमुळे विस्थापित झाली. गावं-वाड्या माळावर, डोंगरपाशी हलली. लोक प्रगतिशील झाले, हे खरं; त्याचा आनंदही आहे.
पण या बदलामध्ये काहीतरी मागे पडत गेलं.
पूर्वी गावठाणातील घरं, मुलं-बाळं सगळीच दुसऱ्या ठिकाणी गेली. मात्र गावाचं पालन-पोषण करणारी ती ग्रामदेवता—ती मात्र जागच्या जागीच राहिली.
आज तिच्या भोवतीचं घर तुटलेलं, मोडलेलं आहे. भीतीला तडे गेले आहेत. तिथे सरपटणारे प्राणी वावरतात. कधी दिवाबत्ती होते, कधी नाही—याकडे आपण लक्षही देत नाही.
अहो मंडळी, त्या मंदिरांनी कितीतरी पिढ्या पाहिल्या आहेत. उन्हा-पावसाळ्यात, थंडी-वार्यात त्यांनी आपल्याला, आपल्या गाई-गुरांना आसरा दिला.
पण बदलत्या काळात आपण इतके आधुनिक झालो आहोत की वर्षातून एखाद्यावेळीच तिकडे पाहतो. ही व्यथा फक्त एका गावाची नाही—अनेक गावांची आहे.
खापर-खापर पंजोबा, म्हणजेच आपला भैरोबा—तो आजही तिथेच आहे. त्या मोडक्या खोपटात, कुठलीही तक्रार न करता उभा आहे.
आपल्या अडचणी दूर करत आहे, आपली राखण करत आहे—आणि आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत.
आपण त्या वेळी आपल्या घरांची काळजी घेतली, आपली सुरक्षितता पाहिली. मग जो ग्रामदैवत आहे, त्याच्याकडे वेळीच लक्ष द्यायला नको का?
आज आपण सुज्ञ आहोत, कमावतो आहोत. पैसे मिळवण्याचे मार्ग अनेक आहेत—फक्त इच्छाशक्ती आणि एकजूट हवी.
जर सर्व ग्रामस्थांनी आणि तरुण मंडळाने एकत्र येऊन संकल्प केला, तर हे काम अवघड नाही.
चला, उठूया. जिज्ञासा ठेवूया. प्रतिज्ञा करूया—
पुढील वर्षाच्या यात्रेपूर्वी खापर-खापर पंजोबा, म्हणजेच ग्रामदैवत भैरवनाथाचं पडलेलं, मोडलेलं मंदिर आपण सर्वांच्या सहकार्याने नीट उभारूया.हे करताना आपलं काही कमी होणार नाही—उलट समाधान, शांती आणि एकात्मता मिळेल.
चांगलं काम करत राहा. आनंदी, सुखी, समाधानी आणि विचारशील राहा.
या संकल्पनेसह,
ग्रामदैवत कुलदैवत भगवान भैरवनाथाच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी
गुढी उभारूया!
सुदाम मदगे किवळे, आंदर मावळ


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा