जंगली जीवन
जंगली जीवन
अहो साहेब,
आम्ही इथं पडलेल्या खोपटात,
उघड्या पथरावर
कायमच उलट–पालट पडायचं काय?
या पोटाची खळगी भरायला
करायचं तरी काय?
इथं नाही कसलंच काही हातात,
नाही दमडी माय,
म्हणून काहीच सुचत नाही.
सकाळीच उठून शिकारी जाई,
उंदरांनी पळवलेलं
शेतीतलं धान्य
आम्ही खोदून खाई.
अहो साहेब,
इथं कशाचं काय करायचं काय?
आम्हाला कशाची वस्त्र?
म्हातारा नव्वदी पार झाला,
तरी तो लोंगटीवरच राही.
मूलबाळ उघडी,
काहीच नाही अंगावर.
अहो साहेब,
इथं कशाचं काय
हानी करायचं काय?
म्हणे सरकारनं काहीतरी दिलं,
ते साहेबांच्या पोटात गेलं.
कागदावर अंगठा गेला,
मिळालं तर काहीच नाही.
अहो साहेब,
इथं कशास काय
करायचं काय?
मुलाबाळांना शिक्षण नाही,
ते सकाळीच
फासा–भिंगरी घेऊन
जंगली जाई.
जे काही मिळेल
ते भाजून खाई.
अहो साहेब,
इथं कशाचं काय
करायचं काय?
मुलीला दिवस गेलं,
तिच्या पोटात उठलं,
म्हणून दूरकोशात झोळीत घालून
दवाखान्यात नेलं.
पण मधेच तिचं
सर्व काही गेलं.
अहो साहेब,
इथं कशास काय
आणि करायचं काय?
म्हणे स्वातंत्र्य मिळालं,
पण आम्हाला काहीच नाही मिळालं.
मतासाठी आम्हाला फसवलं,
राब–राब राबवलं.
डोळ्यात अश्रू,
पोटाला चिमटा देऊन
तुमच्या दारात
आम्हाला लोळवलं.
अहो साहेब,
इथं कशाचं काही
आणि करायचं काय?
बोलायला जातो
तर पाटलाची लाथ खातो.
त्यांचं लाकूड–फाटा तोडून देतो,
गुराढोरांना वैरण देतो.
एखादा फुटका मणी देऊन
पाटील घरी धाडतो.
अहो साहेब,
इथं कशाचं काय…
आहे अशीच आमची जिंदगी,
मग सांगा—
आम्ही तरी करायचं काय?
सुदाम मदगे (किवळे वडगाव मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा