जंगलातील पशुपक्ष्यांची आपत्कालीन बैठक
अग ये चिऊताई! चिऊताई तुझं घरट कुठे असतं. कावळा चिमणीला म्हणाला. चिमणी कावळ्याला म्हणाली.
कावळे दादा आता कसलं घरटं आणि कशाचं काही आता काहीच नाही राहिलं बघ.
अरे!आपलं झाडा झुडपात घरटं असायचं. आता ह्या लोकांनी झाडं झुडप ठेवलीच नाहीत. मी कुठेतरी गवताची कापसाची बोळे, काड्या कुड्या आणून एखाद्या इमारतीच्या गच्चीत किंवा एखाद्या खिडकीच्या बोळात किंवा एखाद्या पत्र्यामध्ये घर बांधते.
माझी पोर त्याच्यामध्ये उकड्याने कधीकधी गुदमरतात. कधी घर चांगलं नसल्यामुळे खाली पडतात. अगदी नकोस झालय बघ.
दादा बर ते जाऊ दे. पण पूर्वी शेतीवाडी व्हायची. सर्व काही व्हायचं. त्यामुळे खाचरा, वावरामध्ये अन्न मिळायचं. खाली पडलेलं धान्य वेचून पोटभर पशुपक्षी खायचे. आता ते पण नाही राहिलं बघ.
आता काय सिमेंट खायचं? अरे कुठेतरी कचऱ्यामध्ये काहीतरी भेटलं तर तेच उचलून आणायचं आणि तेवढेच पोराला द्यायचं. नाही गांडूळ, नाही किडामुंगी त्यामुळे ते पण अन्न गेलं. आता काढायचं कसंतरी.
अरे दादा, तू मला सर्व विचारलं. पाहिला तू माझ्या दारात यायचा. अन्न खायचा, विचारून जायचा, आता तसं मला काहीच तुला देता येत नाही. ना बसायला आसरा देता येईना तुला. आता हे आहे ते भोगायचं.
ह्या लोकांनी पार मेटकुटीला आणले बघ. अरे, बर ठीक आहे. हे सर्व झालं पण तुझं काय चाललंय.?
काय सांगू ताई, तू तरी कुठेतरी घर बांधते आम्हाला तर आता कुठेच घर बांधता येईना. पुढे काही घर बांधलं तर लगेच कोणतरी दगड मारतं किंवा कोणीतरी उपसून टाकतं. त्यामुळे माझा प्रपंच असा फिरता झालाय बघ. असाच गरागरा फिरतो, कुठेतरी माळावर जाऊन पडतो, पोर इकडे तिकडेच पडलेली असतात.
एखाद्या दिवशी चोचीने माशा वाल्याच्या टोपलीतील मासा आणायचा किंवा एखादा माणसाचा तुकडा उचलायचा, एखाद्याने खरकटं टाकलं असेल ते खायचं.
आहे ते बर चाललयं. बाई काय सांगू तुला त्यामुळे बायको पण आता जवळ राहत नाही.
हे संभाषण कोकत्री, लांडोरी, खेकडं, माकड, सरडे, साप यांनी ऐकलं. त्यांचं एकमत झालं. लगेच सर्व एकत्र बसले आणि कावळेदादा, चिमणीताई तुमची जशी परिस्थिती आहे आमची काय वेगळी नाही. माणसांनी सर्व जमिनी लाटल्या. पुढे झाडं राहिली नाहीत, कुठं कुंपण राहिले नाही, कुठं गवत राहिलं नाही त्यामुळे आता राहणं व जगणं मुश्किल झाले आहे. आपण आता एक होऊया आणि ही बातमी लगेच गरुडाला गरुड दादाला सांगूया.
गरुडदादा कडे कावळा, चिमणी आणि सरपटणारे सर्व पशु पक्षी गेले. गरुड दादांनी त्यांची सर्व हकीगत ऐकून घेतली.
ही गंभीर बाब आहे आमच्यावर हल्ला करत आहात, आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशा प्रकारची उपस्थित सर्व पशु प्राणी यांचे एकमत झाले.
ही सर्व मंडळी राष्ट्रपती म्हणजे हत्ती दादाकडे गेली हत्ती दादाने जंगलातील सर्व जिराफ, काळवीट, सांबर, भेकर, ससे, चित्ते, वाघ, सिंह, बिबटे, कोल्हे, लांडगे, सुसर, बेडुक,अजगर या सर्वांना बोलवण्याची व्यवस्था केली.
सासा दादा, लांडोर आणि कबूतर हे पक्षी बातम्या द्यायला चहुकडे गेले आणि या सर्व पशु पक्षांची प्राण्यांची एक संयुक्तिक राष्ट्रीय मीटिंग झाली देश प्रदेशातील सर्व पशुपक्षी एक झाले.
वाघोबा,सिंह, मोर हे प्रतिष्ठित सर्व पशु, पक्षी बैठकीमध्ये बसले. माकडं माणसासारखी उभी होती, जिराफाने मान फिरवून सर्वांचं स्वागत केलं आणि गरुडाने उंच बसून भाषण केलं.
मित्रहो ऐका. आता हा मनुष्यप्राणी पूर्वी आपला मित्र होता. आम्ही त्याला मदत करायचो, ते आपल्याला मदत करायचे. आता ह्या लोकांचं अति झालंय. जंगल तोडतात गवत जळतात. जंगलाला आग लावतात. आम्हाला जागा राहायला राहिली नाही. आमची पोरं बाळ मरायला लागली. त्यांना वेळेवर खायला मिळत नाही.
आता आपण सर्वांनी जगायचं कसं काय? याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. यांची वाढलेली वस्ती, यांचे वाढलेले रस्ते, यांची वाढलेली लोकसंख्या ही आपल्या मुळावर उठली. ना मासे राहिले, ना खेकडे राहिली, ना डुकरं, सांबर, ससे राहिले. यांनी एकेक करून आपले कुळच नष्ट करायला चालवले आहे.
आम्ही कुठेतरी जातो तर हे आपल्यावर गोळ्या झाडतात. आता हे किती सहन करायचं? आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
हत्ती दादाने उंच आवाजामध्ये डरकाळी फोडली. आता मनुष्याची व प्राण्यांची लढाई चालू होईल. आता बघूया जे होईल ते होईल.
मग प्राणी जिकडे तिकडे सुटले. सिंह दादांनी चित्ते आणि बिबटे यांना आदेश काढला की,
आता तुम्ही गावात घुसा. वाटेल ते करा. माणसं मारा, रक्त प्या. कुत्री मारा आणि यांना सर्वांना जर्जर करून सोडा. आमची जागा तुम्ही हडप केली. आमचं अन्न हडप केलं, त्यामुळे आता बिबटे आणि चित्ते गावात घुसून माणसावर हल्ला करू लागले.
तात्पर्य एवढं आहे मित्रहो, जल, जंगल, संपत्ती, प्राणी, पशु, पक्षी हे आपले वैरी नाहीत तर आपले ते मित्र आहेत त्यांना त्यांची जागा, त्यांचं खाद्य त्यांना मिळालं पाहिजे म्हणून काय आता शेळ्या सोडायच्या असा आदेश निघालाय. हे सरकारचे अनाकलनीय आहे.
अहो शेळ्या सोडल्या तर ती माणसंच पहिली पळून नेतील. कुठं बौद्धिकतेचा विचार आहे का? त्यांना त्यांचं नैसर्गिक अन्न मिळू द्या. त्यांना खेळू द्या, बागडू द्या. असं जर झालं नाही तर इथून पुढचा काळ मुख्य प्राणी आणि मनुष्य यामध्ये निश्चितच लढाई होईल माणसा माणसाची बाजूलाच राहिली.
राष्ट्रपती महोदया द्रोपदी मुर्मू मॅडम, आपण आदिवासी आहात. दुर्गम, डोंगरी भाग तेथील लोकांचे राहणीमान पशुपक्ष्यांचे राहणीमान हे आपल्याला चांगले ज्ञात आहे. अहो, तो एक अंबानीचा मुलगा अशा पशुपक्ष्यांसाठी वनतारा बांधतो काय, आणि करोडो रुपये कमवतो काय, असं वन्य प्राण्यांना कोणी बंदिस्त करतं का? हे काय चाललंय समजण्या पलीकडे आहे समाज कल्याण असेल स्वागत आहे.
राष्ट्रपती महोदया आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन देशाची मुख्य संपत्ती जल जमीन जंगल असेल तरच शेती उद्योग असेल तरच अन्न वस्त्र निवारा आहे यासाठी आपण प्रयत्न करावेत सर्व न्यायालयाने यासाठी प्रयत्न करावेत अशी एक ग्रामीण खेडूत लेखकाची तळमळीची विनंती आहे
धन्यवाद,
सुदाम बबन मदगे किवळे अंदर मावळ



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा