गावाकडची शेती आणि प्राणी मित्र
गावाकडची शेती आणि प्राणी मित्र
माझं गाव अगदी डोंगर कपाऱ्याला वाडी होती. आमच्या वाडीच्या वरच्या बाजूला आमची वडीलोपार्जित जमीन होती.
भाताची शेत, ज्वारीचा माळ, गवताचा माळ, नाचणीचे दळे, गुराढोरांची पडाळ त्या शेजारी आणि पाठीमागे काकडी, आळवड, डांगर भोपळा, कारली, दोडका इत्यादीचे वाडगे असायचे. शेजारीच वांगी, आणि मिरच्या लावलेल्या असत.
आजी तिच्या शेतीवाडीला खुप जीव लावायची. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूमध्ये वाड्यामधील हा सर्व भाजीपाला, फळ फळावर फुलत राहायची.
तेथेच आंब्याची एक दोन झाडं होती. पेरूचे झाड होतं. आम्ही लहान असताना आम्हाला हे सर्व खायला मिळायचं. त्यामुळे तिथंच आमच्या आजोबांनी सहा खणाचे जंगली लाकडं व कौलाचं.घर बांधलं होतं.
आमचा परिवार साधारण मोठा होता. सर्व माणसं गुण्यागोविंदाने नांदायची. घरामध्ये दूध, भुईमुगाच्या शेंगा, गूळ, मध दही, तूप कायम असायचं.
माझा मामा पैलवान होता. पूर्वी हेच सर्व ओरिजनल व चांगलं खायला मिळायचं. त्यामुळे माणसं निरोगी असत. भाकरी दुधात चुरून खाण्याची मजा और होती. लसणाची पाट्यावर वाटलेली मिरची, बेसन भाकरी जे मिळेल ते गोड लागायचं.
आमच्याकडे जैसा व सुरत्या नावाची बैलजोडी होती. आजोबा त्यांना अगदी ताटातील भाकरी खायला घालीत. पेंड, वैरण असं त्यांना कधीच काही कमी पडू दिलं नाही. पावसाळ्यामध्ये बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालणं, त्यांच्या अंगावरील गोचड्या काढणं ही काम आम्ही लहान मुलं करायचो. बैलांना मुलासारखं आजोबांनी जपलं होतं.
एकदा आजोबांना चालताना ठेच लागली आणि ते खाली पडले. ते पाहताच जैसा बैल धावत त्यांच्याजवळ आला आणि त्यांना चाटू लागला. अशी ही जोडी भरपूर काम करायची, आणि आनंदी घर ठेवायची
गंगी, पारी, नंदी नाव लोक आवडीने गाई म्हशीला ठेवायचे. आमच्याकडे दोन म्हशी व एक गाय कायमच होत्या. त्यामुळे घरामध्ये सतत दूध, दही, तूप राहायचं. आम्ही लहान मुलं भरपूर खायचो. नंदी ही गाय. तिचं एक वासरू होतं. ते आमच्याबरोबर खेळायचं. अंगणात आम्ही हातातला भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडात द्यायचो. ते अजून आनंदाने उड्या मारायचं. त्याचं नाव आम्ही बब्या ठेवलं होतं.
खंड्या नावाचा बरेच दिवसापासून एक आजोबाकडे कुत्रा होता. कुत्रा कसला तो जसा काही वाघच म्हणा ना. त्याच्यासमोर गावातील इतर कुत्री उभी राहायची नाही. अतिशय चपळ व ताकद वान हा खंड्या कुत्रा होता. त्याला खायला दूध भाकरी कधीकधी मटन असायचं. त्यामुळे तो नेहमी तेज असे.
शेताच्या परिसरामध्ये तो पहारेकऱ्या सारखा फेरफटका मारत असे. तो जंगली प्राणी पाळऊन लावायचा. काही पक्षी सुद्धा त्याच्या आवाजाने उडून जायचे.
जर कधी एखादा हिंस्र प्राणी आला असेल तर घरातल्या माणसांना सावध करायचा. असा हा आमचा जिवलग खंड्या मित्र होता.
आमच्याकडे आमच्याकडे एक मनीमाऊ पण होती. ती सतत माणसा जवळ येऊन सेपटी हलवायची. घरात उंदीर तर तिच्यापुढे कधीच आले नाहीत.
एकदा दारात साप आला होता. तिने पंज्यानेच त्याचा कार्यक्रम केला. ती आजी पाशी झोपायची. काही दिवसानंतर तिला छोटी दोन पिल्लं झाली. ती पिल्लं म्हणजे आमची खेळणीच झाली. घरामध्ये आनंद झाला होता. माऊची सतत घरामध्ये हालचाल चालूच असायची.
आमच्या घरी तेव्हा दोन-तीन कोंबड्या सुद्धा होत्या.कोंबडे पण होते. त्यांनाही नाव वेगवेगळी होती. सुरी व सूर्या असा ही कोंबड्यांची जोडी होती.यांच्यापासून ही वंशावळ झाली होती. सूर्या वयस्कर झाला होता.एकदा नातव अंगणात खेळत होता. त्याच्या जवळ विंचू आला.तसा सूर्याने धावत जाऊन त्या विंचवाला चोचीनेच टिपला. कधी आकाशातून घार घिरट्या घालू लागली किंवा काही मोठे पक्षी आले तर सूर्य मोठे ने ओरडून आवाज द्यायचा. आणि सर्व कोंबड्यांना सावध करायचा. सूर्या पहाटे थोड्या थोड्या अंतराने मोठ्याने आरवायचा. आणि लगबगीने स्रिया दळण कांडण करायला उठायच्या.
गावकऱ्यानो मुके प्राणी माणसाला किती मदत करतात हे आपल्याला जाणवतच आहे. त्यांना तुम्ही मुलाबाळासारखी वाढवा, त्यांना जीव लावा म्हणजे ते आपले उपकार विसरत नाहीत केवळ त्यांचा गैरफायदा घ्यायचा असं केल्यास तेही आपल्याला फळ मिळते.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यानंतर विभक्तीकरण सुरू झाले. कुटुंबे छोटी झाली. अनेक लोक रोजगारासाठी शहरात गेले. त्यामुळे गावे ओस पडू लागली. घरादारांना कुलपे लागली. त्यामुळे शेतकरी प्राण्यांपासून वेगळा झाला. शेती सुद्धा कमी झाली. बैल ऐवजी ट्रॅक्टर आली.
परंतु काहीही म्हणा, जुने दिवस खूपच सुंदर होते. तसे दिवस पुन्हा येणार नाहीत. ज्या लोकांना गावाकडे राहण्याचे भाग्य मिळाले त्यांना नक्कीच पूर्वीचे दिवस, पूर्वीची आपल्यातुन निघून गेलेली माणसे पुन्हा यावीत असे नक्कीच वाटत असेल.
प्राण्यांकडे एवढी माणुसकी आहे की जीवाच्या माणसापेक्षा हे प्राणी निश्चितच चांगले ठरतात. असा अनुभव व प्रसंग आपण पाहत आहोत आणि हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून मुक्या प्राण्यांची आपण सेवा करूया एवढेच मी याप्रसंगी सांगू इच्छितो.
सुदाम मदगे (किवळे मावळ)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा