पळा रे सत्या तुक्या आला.
स्वतंत्र पूर्व काळात शेती, रानभाज्या, कंदमुळे, विविध हंगामातील झाडांची फळे हे उपजीविकेचे खऱ्या अर्थाने साधन होतं.
त्याचबरोबर जोडधंदा म्हणून गावठी गायी, शेळ्या मेंढ्या, आणि कोंबड्या हा जोडधंदा म्हणून संसाराला हातभार लावत होता. त्यामुळे तेव्हा लोक खऱ्या अर्थाने सुखी होते. त्याच्यावरच अतिशय चांगली उपजीविका चालायची. माणसं आनंदी असायची निरोगी असायची माणसांची देवाण-घेवाण चालायची. धान्यरूपाने एकमेकांना मदत करायची. अन्याय विरोधात लढायची
माझं लहानपण आजोळी गेलं. माझे आजोबा तुकाराम कृष्णा तळपे हे मावळ तालुक्यातील तळपेवाडीचे रहिवासी. त्यांच्याकडे बरीच जमीन होती. पण इकडून तिकडून आलेले गरीब माणसं तिथे स्थायिक झाली. माझ्या आजोबांनी त्यांना त्यांच्या मालकी जमिनीतील काही जमीन कसायला दिली ती कायमचीच.
मी आजी आजोबाकडे वाढलो. त्यामुळे लहानपणापासूनच आजोबा बरोबर जंगलात फिरणं, शिकारीला जाणं, मोहोळ काढणे,आंबे, करवंद, टेंभ्र, तोरण, आळू, मोहाची फुलं आणि हिरडे जमा करण्याचं काम मी करत असे. कधी खेकडे धरायला तर कधी पागीर टाकण्यासाठी नदीवर तळ्यावर मासे पकडायला जाई. ते दिवस आठवल्या नंतर मन जुन्या आठवणीत रमून जातं.
माझा मित्र बाळू बोरसे आणि मी करवंद जमा करायचो.आंबे विकायला जायचो. जवळच खाली कर्जतला पाय वाटेने यायचं.
मोहाच्या मोहट्या घेऊन तेल काढण्यासाठी आजोबा बरोबर कोकणात जायचो. चढ उतार, पायीपीट करत दोन तास लागायचे.
दुकानदार लहान मुलगा म्हणून मला थोडे शेंगदाणे आणि गुळ खायला द्यायचा.
पायी चालत असताना म्हातारा जुन्या गोष्टी सांगायचा.
हिवाळ्यात अंगणात संध्याकाळी नेहमी शेकोटी पेटलेली असायची. शेकोटी जवळ अंगणात आम्ही झोपायचो. त्यावेळी आजोबा आम्हा मुलांना जुन्या गोष्टी सांगायचा. माझा चुलत आजोबा भीमा तळपे यांनी सांगितलेली माझ्या आजोबाची कहाणी आजही आठवते.
माझा आजोबा तुकाराम अन्याया विरोधात पेटून उठायचा. कोणी कोणाची जमीन लुबाडली. किंवा कोणाच्या शेतातली चोरी झाली, त्याला सहन होत नसे.
आमच्या भागामध्ये चांगलं भात यायचं आंबे फणसं असायची. कोकणातील काही इंग्रजाला सहकार्य करणारी दरडोखोर टोळी यायची आणि काढणीला आलेलं भात किंवा पिकायला आलेले आंबे रातोरात घेऊन जायचे.
हे माझ्या आजोबाला सहन झालं नाही. काही दिवस त्यांनी पाळत ठेवली. रात्र झाली. अंधाऱ्या जंगलातून बॅटरी चमकली. दरोडेखोर आंब्याच्या झाडावर चढले. चार-पाच दरोडेखोर आंब्याच्या झाडावरील आंबे खुडीच्या सहाय्याने उतरू लागले.
आजोबाच्या बरोबर दोन-तीन साथीदार होते. त्यांनी झाडामागे लपून दगडांचा मारा चालू केला. तसे दरोडेखोर पळू लागले. पण एकाकडे बंदूक होती. आजोबा त्याच्या मागे पळू लागला. अंधार, थोडसं चांदणं होतं. आजोबांनी आजोबांनी त्याच्या हातातील बांबूची काठी अशा पद्धतीने त्याच्या दिशेने फेकली आणि तो काठीत अडकून उलटा पालटा झाला. आजोबांनी पळतच जाऊन त्याला तिथे दाबून धरला. आणि त्याच्या हातातली हिसकावून बंदूक घेतली. दरोडेखोर कसाबसा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
इंग्रजांच्या काळात मावळ जमीन लढा व इंग्रजाना खंडाळाघाट रेल्वे मार्ग बनवण्यासाठी बहुमोल मदत करणारा तथा वाट दाखवणारा शिंग्रोबा हा सुद्धा मावळ तालुक्यातीलच होता.
खेड तालुक्यातील सत्तू मराडे त्यांचा इतिहास मोठा आहे.जुलम व अन्यायाच्या विरोधात लढणारे ते बंडखोर होते. त्यांनीही मावळाच्या लढ्यासाठी मोठं काम केलं. त्यामध्ये माझा आजोबा तुकाराम तळपे होता. तेव्हापासून त्या लोकांची दहशत निर्माण झाली. त्यांना बंडकरी संबोधलं जाई. मावळ लढ्यामध्ये सतु मराडे यांना माऊच्या डोंगरावर अटक झाली.
अशा गोष्टी ऐकून मन सुन्न व्हायचं.
मी आठ नऊ वर्षाचा असेल आजोबा बरोबर शिकारीला जंगलात जायचो. रात्री डुकरे, सांबरे, भेकरे भाताची खूप नुकसान करायची.
आजोबांकडे बंदूक होती. रात्री नका नेत जाऊ पोराला आजी म्हणायची. पण मी हट्ट करायचो आजोबा मला अंगावर पोत द्यायचा. मी त्याच्या मागे टुणु टुणु पळत जायचो.
एकदा असेच आम्ही एकदा रात्री शेतावर गेलो. एका झाडावर बसऊन आजोबा डुकर येणाऱ्या रस्त्याला गेला.
अंधारी रात्र घनदाट जंगल मी झाडावर बसलो होतो. थोड्याच वेळात डुकरं आली. शेतातील भात खाऊ लागली आणि शेतातच लोळू लागली.
तेवढ्यात बंदुकीचा ठों..ठो. आवाज माझ्या कानावर आला. आजोबांच्या बंदुकीतून गोळी सुटून डुकराच्या आरपार गेली होती. डुक्कर शेतातच आडवं पडलं होतं.
आजोबांनी रक्त लागलेलं एक फर माझ्याकडे दिलं. बाकीचं आजोबांनी उचलल आणि घरी आलो. तेवढं घेतलं
अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या सतु तुका यांची नुसती चोरांना किंवा सावकारांना नाव जरी कळाली किंवा ते आलेत म्हणून असं जरी समजलं तर त्यांना धडकी भरत असे.
आजोबा जंगलात एकटाच जायचा. दोन दोन तीन दिवस तिकडेच राहायचा. कातकरी, धनगर यांच्या पाडाळीवर शिकार विकून घरी यायचा.
अशाप्रकारे नाव समजली तरी लोक घाबरून म्हणायचे आरे पाळा अरे पळा सत्या तुक्या आला.
वास्तव हे आहे की हे लोक खऱ्यासाठी लढायचे. अन्याय सहन करायचे नाहीत. समाजासाठी हिताचं काम करायचे. गोर गरिबांना मदत करायचे.
आता ती माणुसकी राहिली नाही व तशी माणसंही नाहीत. आपण यातून बोध घेतला पाहिजे.
सुदाम मदगे (किवळे मावळ)




तुमच्या कथा खरोखरच वाचनीय असतात. वाचताना जुने दिवस आठवतात. असेच छान लिहित रहा.
उत्तर द्याहटवा