जीवदानी आसरे
ग्रामीण भागातील आदिवासी गावाला त्यावेळेस कसल्या शाळा आणि कसलं काय? त्यावेळी शिक्षणाच्या कोणत्याच सुविधा वाड्यावसत्या आणि दुर्गम भागात झालेल्या नव्हत्या. शिक्षण घ्यायचा असेल तर खूप लांबच्या एखाद्या गावी शाळा असलेल्या ठिकाणी घ्यावे लागे. दुसऱ्याचे एखादं पोरगं बाहेरगावी शाळेत गेलं तर आई-वडिलांचा उर भरून यायचा.
माझ्या बाबतीत तसंच घडलं. कदाचित पाच सहा वर्षाचा असेल आजी म्हणाली किसना याचं नाव आश्रम शाळेत घाल.
मी लहानपणी आजोळी वाढलो किसना माझा मामा. दुसऱ्या दिवशी मामा दूरवरच्या आश्रम शाळेत गेला. दिवसभर चालून संध्याकाळी शाळेत माझे नाव घालून आला.
मग एके दिवशी शाळेत जायचं माझं निश्चित झालं. मला शाळेत घातलेली आश्रम शाळा ही खूप लांब होती. चार तास पायपीट करावी लागायची.
आजीने माझी पिशवी भरली आणि दुसऱ्या दिवशी पोरगं शाळेत जाणार म्हणून कोपऱ्यात रडत बसली. म्हातारा म्हणाला शिकायला जाणार आहे ना तो मग कशाला रडते. मग आजीने पदर लगेच सरकावून डोळे पुसले.
सकाळी म्हातारी लवकर उठली शाळूच्या दोन-तीन भाकरी केल्या. त्याच्यावर दोन-तीन बेसनाची थापलेले डांगर तयार केले. थापलेले डांगर पाहिल्यवर मला आनंद झाला.पूर्वी कधीतरी मला ते खायला भेटले होते.
माझी पिशवी मामाने घेतली आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून मी मामाच्या माग निघालो. म्हातारीने भाकरीचा तुकडा माझ्या अंगावरून ओवाळून फेकून दिला. दृष्ट लावू नये म्हणून डोक्यावरून बोटं मोडली.
आणि आमचा पायी प्रवास चालू झाला डोंगर दर्या, नाले नदी ओलांडून आम्ही चालत होतो. पाऊस चालू होता.
मामाच्या अंगावर घोंगडी होती तर माझ्या अंगावर एक प्लास्टिकचा कागद. मी लहान असल्याने मला चालताना दम भरला की मामा उचलून घेत असे.
असे करता करता उंबऱ्याचा पाण्याचे स्थळ आलं. भूक लागली होती. म्हातारीने फडक्यात बांधून दिलेली भाकरी काढली आणि त्यातील एक तुकडा मामाने जमिनीवर फेकला.
मी त्याला विचारलं, मामा हे का बरं असं करतो?
यावर मामा म्हणाला.अरे डांगर तळीव आहे. भुतंख्यतं असतात. शिवाय मुंग्या जीव जंतू असतात, त्यांना दोन घास द्यावे लागतात. त्यावेळी निसर्गातील जीव जंतूंची सुद्धा गरीब लोकांना काळजी असायची.
मला तेव्हा ते काही समजलं नाही. करता करता डांगर आणि भाकरीवर ताव मारला.
थोडा वेळ बसून परत प्रवास चालू झाला. आता शाळा जवळ आली.
आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा शाळेत मुलांचा किलबिलाट चालू होता. इतर पोरां बरोबर मामा मला तिथे सोडून जाणार होता. मास्तरांनी मला पकडलं. आणि मुलांच्या खोलीत सोडलं. मी रडू लागलो. मामा निघून गेला
पूर्वी गावी लोकांची लोकांची खूप गरीबी असायची. खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. चांगलं चुगलं काही खायला मिळायचं नाही. जंगलातल्या भाज्या, खेकडं, मासे असं इकडून तिकडून काहीतरी जमा करायचं आणि तेच गरिबांचं अन्न होतं.
आश्रम शाळेमध्ये मात्र मुलांना चांगलं खायला मिळायचं. दूध मिळायचं. त्यामुळे चांगले खायला मिळते म्हणून मन रमू लागलं. शालेय साहित्यही साहित्य मिळू लागलं. त्यामुळे डोंगर कपाऱ्यातील पोर त्या छत्राखाली शिकायला लागली.
दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की पोरं गावी जायची. सुट्टी संपली की पुन्हा आश्रम शाळेत दाखल व्हायची.
आश्रम शाळेत राहून आम्ही एकेक इयत्ता पार करत पुढच्या टप्पा गाठू लागलो. आजूबाजूच्या गावाच्या यात्रेला आम्ही मुद्दाम जायचो.
यात्रेला गेल्यावर तिथे गोडा धोडाचे जेवायला मिळायचे. रेवड्या खायला मिळायच्या. भजन, भारुड, तमाशे पाहायला मिळायचे.
दुसऱ्या दिवशी आखाड्यात कुस्ती देखील करायचो. कुस्ती निकाली केल्यावर रुपया दोन रुपये मिळायचे. इनाम मिळालेले पैसे पाहून मन हरकून जायचं. एक वेगळाच उत्साह अंगात वाहू लागायचा.
ती मजा वेगळीच होती. पहिली ते पाचवी व पाचवी ते दहावी त्या आश्रम शाळेत कधी झाली ते कळालच नाही. समजदार झालो.
माझ्यासारखी भरपूर मुलं शिकली. मोठी झाली. नंतर कालांतराने तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागली. तेथेच असलेल्या शासकीय वसतीगृहा मध्ये शिकायला गेली.
अनेक मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण झालं. पदवी, पदवीका मिळाल्या. स्पर्धा परीक्षा झाल्या.
नोकरीसाठी तेव्हा घोडेगाव तालुका आंबेगाव आणि पुणे, त्याचप्रमाणे गोरेगाव मुंबई येथे एम्प्लॉयमेंट कार्ड काढली. बऱ्याच मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्यांचा परिवार सुखी झाला. त्यामध्ये मी ही एक होतो.
ही शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा जर नसती तर कित्येक गरीब मुलांना शिक्षण मिळालं नसतं. गरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहिली असती. आणि ती गरिबीतून कधीच वर आली नसती. त्या वेळेचा काळ वेगळाच होता खाण्याचीच मारामात तर शिक्षण कसलं?
पण आश्रम शाळा असल्याने आज आपण शिकलो, वाढलो. आपली पुढची पिढी सुशिक्षित झाली. आणि आपण आता कसेतरी पायावर उभे आहोत.
अनेक गावामध्ये सुधारणा झाल्या हे वास्तव आपल्याला नाकरता येणार नाही. गरिबीतून आपण पुढे गेलो असल्यामुळे आपल्यापेक्षा जे जास्त गरीब आहेत त्यांना अशीच यापुढे मदत करा, मार्गदर्शन करा. आणि समाजाची प्रगतीसाठी हातभार लावा. धन्यवाद
लेखक :- सुदाम बबन मदगे (किवळे ता.मावळ जि.पुणे)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा